बुद्धीने सर्वही होते… – परम स्नान –

0
221

– प्रा. रमेश सप्रे

सध्याच्या काळाला कलियुग किंवा कलिकाल म्हणतात. याचा विशेष म्हणजे सर्वप्रकारचं प्रदूषण, भ्रष्टाचार. यातून जो कलिमल, मनोमल निर्माण होतो, तो दूर करायला नामस्मरण खूपच प्रभावी ठरतं. पावन करणारं परमस्नान बनतं. यामुळे योग्य चिंतन घडून चिंतांचं निरसन होतं. जीवन आनंदानं भरून जातं.

यम ही मृत्यूची देवता किंवा मृत्यूचा देव. त्याला काल, कृतांत अशीही नावे आहेत. कृतांत म्हणजे आपण जन्मभर जे केलेलं (कृत) असतं, म्हणजे पुण्य-पाप, सत्कर्म-दुष्कर्म जे करण्यासाठी- त्याचं सुख-दुःख भोगण्यासाठी आपण जन्मलेलो असतो, त्याचा अंत.

काळाच्या ओघात सारे चराचर जन्माला येतात, आकाराला येतात. ते तसेच काळाच्या ओघात मरतात नि मोडतात. हे सारं घडवणारी जी शक्ती असते तिचंच नाव काळ किंवा यम. हे सारं सार्‍या विश्‍वात इतकं अचूक योजनेनुसार (नियतीनुसार) घडत असतं की तिथं चूक, प्रमाद, अपघात यांना स्थान नसतं. जे घडणार त्याची कल्पना नसल्यामुळं ते अकस्मात घडल्यासारखं वाटतं. काही योगायोग घडल्यासारखे वाटतात. पण प्रत्यक्षात सारे योगच असतात. संयोग असतात. याला अतिशय अर्थपूर्ण शब्द आहे- ‘कर्मधर्मसंयोग!’
अशा अचूक कार्यप्रणाली किंवा कार्यवाहीमुळे यमाला म्हटलं जातं धर्म-अधर्म किंवा धर्मराज! युधिष्ठिरालाही धर्मराज म्हणतात. कारण, एक म्हणजे तो यमाचा पुत्र समजला जातो अन् तो सतत धर्मानुसार वागतो. त्याच्या जीवनाचं मुख्य सूत्रच आहे- ‘धर्मो रक्षति रक्षितः|’ म्हणजे जो धर्माचं (कर्तव्याचं) पालन करतो त्याचं रक्षण धर्मच करतो. यानुसार वागणार्‍या राजाचं नि प्रजेचं राज्य हे रामराज्य किंवा धर्मराज्य म्हणून ओळखलं जातं. आदर्श राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था म्हणजे असं रामराज्य किंवा धर्मराज्य. ज्या व्यवस्थेत अधिकारांपेक्षा आधी येणार्‍या कर्तव्याला अधिक महत्त्व असतं. कर्तव्यपालनातून अधिकार आपोआप निर्माण होतात. त्यांना केवळ हक्कप्रधान स्वार्थाचं रूप नसतं तर अशा अधिकारांचा पाया नैतिकता, सदाचरण हाच असतो.
उदाहरणार्थ, आईवडिलांनी आधी मुलांच्या संगोपनाचं कर्तव्य योग्यप्रकारे (शक्यतो निरपेक्षपणे, निष्काम भावनेनं) पार पाडलं तर पुढे मुलांच्याकडून सेवा करून घेण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. मुलंही तो आनंदानं मान्य करतात नि त्याप्रमाणे वागतातसुद्धा. उगीचच आपल्या मातापित्यांना वृद्धाश्रमात पाठवत नाहीत. तसेच शिक्षकांनी शिक्षकधर्माचं पालन केलं की विद्यार्थी ‘शिष्य’धर्माचं पालन करतात. नेत्यांनी नेतृत्वधर्मानुसार आचरण केलं तर अनुयायीही आपल्या धर्मानुसार वागतात. दुर्दैवानं सध्या परिस्थिती एवढी पालटलीय की अशी काही व्यवस्था असू शकते यावर आपला विश्‍वासच बसत नाही. यात परिवर्तन हवं असेल तर पुढाकार अर्थात वडीलमंडळीनी म्हणजे घरी पालक, शाळेत शिक्षक नि समाजात नेतेमंडळीनीच घ्यायला हवा. यासाठी खरी गरज असते चिंतनाची, विचारपूर्वक आचरण करण्याची. म्हणजे बुद्धीचा उपयोग करून जीवन आनंदानं भरून टाकण्याची. खरोखर बुद्धीने सर्वही होते….

महाभारतातील यक्षप्रश्‍न प्रसंगात या वस्तुस्थितीचं मनोज्ञ दर्शन होतं. पुत्र युधिष्ठिराची बुद्धी म्हणजे विचारशक्ती बारा वर्षांच्या वनवासानंतर अज्ञातवासाची अवघड योजना तयार करण्यासाठी तेजस्वी बनवण्याचं कार्य या प्रसंगातून पिता यमानं साधलं. त्यासाठी यक्षाचं रूप घेऊन त्यानं सार्‍या पांडवांची परीक्षाच घेतली. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे पराक्रमी, बुद्धिमान असूनही या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. एवढंच नव्हे तर सारे मरून पडले. युधिष्ठिरानं मात्र संस्कार, चिंतन, धर्मानुसार वर्तन यातून घडलेल्या आपल्या सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाचा, सुशील वर्तनाचा तसेच तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा परिचय देत या संकटावर मात केली. आपल्या भावांची जीवनं परत मिळवली नि अज्ञातवास यशस्वी होण्यासाठी पिता यमधर्माकडून आशीर्वाद प्राप्त केले. भविष्यकाळात घडणार्‍या अज्ञात घटना आपल्याला अनुरूप, अनुकूल व्हाव्यात यासाठी सर्वात महत्त्वाचे आशीर्वाद अर्थातच काळाचे म्हणजे मृत्युदेव यमाचेच असतात.

बुद्धीचा उपयोग करून जीवन सुखरूप, आनंदरूप बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शन अशा प्रसंगातून घडतं.
काही प्रश्‍नोत्तरे पाहून त्यावर सहचिंतन करूया.
परमस्नान कोणतं? ः
या प्रश्‍नाचं सामान्य उत्तर ‘गंगास्नान.’ तीर्थक्षेत्रात स्नान हेच असतं. पण युधिष्ठिर चिंतनशील आहे. सर्व प्रकारच्या जीवनातील अनुभवांचा त्याला परिचय आहे. म्हणून त्याचं उत्तर निराळं आहे. तो म्हणतो ः परमस्नान म्हणजे मनाचं स्नान. देहाच्या स्नानानं शरीरावरची धूळ, घाण स्वच्छ होते; पण मनोमल? मनातले काम-क्रोधादी विकार, विकृत वर्तन दूर करण्यासाठी मनालाच स्नान घातलं पाहिजे. सतत असं मनोस्नान करत राहिले पाहिजे.
दत्तात्रेयांना आपण ‘अवधूत’ म्हणतो. याचं कारण ते सततच्या विचरणामुळे म्हणजे संचार किंवा प्रवासामुळे मलीन झालेलं शरीर (धुलिदूसरगात्राणि), खरे तर मन चिंतनातून धूत असतात. वाटेवरच्या जलाशयात स्नान करून शरीर स्वच्छ करणं खूप सोपं, पण उलटसुलट विचारांनी नि थैमान घालणार्‍या विकारांनी मळलेलं, अस्वच्छ, अशुद्ध झालेलं मन स्वच्छ, पवित्र करण्यासाठी चिंतनाचा म्हणजे बुद्धीचा उपयोग करतात.

भूतकाळातील आठवणी नि भविष्यकाळासंबंधी चिंता यांचं ग्रहण आपल्या मनाला ते कधीही लागू देत नाहीत. त्यामुळे ते अखंड वर्तमानकाळात (अव) राहून सदैव शुद्ध, पवित्र (धूत) राहू शकतात. म्हणून आपण त्यांना म्हणतो- ‘अवधूत!’ हे खरं परमस्नान आहे. गंगेच्या पवित्र जलात स्नान करून देह स्वच्छ करणंही सध्या अवघड झालंय. कारण गंगा स्वतःच खूप मलीन (मैली) नि प्रदूषित बनलीय. यासंदर्भात एक प्रसंग फार बोलका आहे. येरवडा येथील कारागृहात (तुरुंगात) लो. टिळक नि समाजसुधारक आगरकर एकाच वेळी राजकीय कैदी होते. त्याकाळी प्रचंड थंडीतही त्याहून थंड पाणी आंघोळीसाठी दिलं जाई. पाण्यात बोट बुडवून ते प्रचंड गार आहे हे जाणून आगरकर अंघोळ करावी की करू नये यावर विचार करू लागतात. त्याचवेळी लो. टिळक मात्र ‘गंगाभागीरथी’ म्हणत डोक्यावर ते थंड पाणी ओतून मजेत स्नान करतात. दोघांच्यात चर्चा होते. लो. टिळक म्हणतात, ‘‘तुम्ही ‘एचटूओ’वाले पाण्याकडे फक्त पाणी म्हणूनच पाहता. यामुळे तुम्हाला पाणी थंड, कोमट, गरम असं वाटत राहतं. आम्हाला ते गंगोदकासारखं पवित्र तीर्थ वाटतं. मनानं गंगेकाठी पोचून ‘गंगाभागीरथी’ म्हणत आम्ही मजेत स्नान करू शकतो.’’ मनाला बुद्धीनं समजावलं की अशक्य वाटणार्‍या गोष्टी सहज शक्य होऊन जातात. यालाच युधिष्ठिर म्हणतो, ‘मनाचं स्नान परमस्नान.’
असं स्नान करायचं कसं? संतमंडळीनी याला उपाय सांगितलाय ‘नाम’ म्हणजे नामजप, नामस्मरण. ‘मना’ची धाव बाहेर असते. त्यामुळे ते जगातल्या वस्तूंना, अनुभवांना चिकटून जातं व मलीन होतं. अशा बहिर्मुखी मनाला अंतर्मुखी करण्यासाठी ‘मना’विरुद्ध असलेलं ‘नाम’च उपयोगी पडतं. याचा अनुभव मात्र प्रत्यक्ष नामसाधना करूनच घेतला पाहिजे.

सध्याच्या काळाला कलियुग किंवा कलिकाल म्हणतात. याचा विशेष म्हणजे सर्वप्रकारचं प्रदूषण, भ्रष्टाचार. यातून जो कलिमल, मनोमल निर्माण होतो, तो दूर करायला नामस्मरण खूपच प्रभावी ठरतं. पावन करणारं परमस्नान बनतं. यामुळे योग्य चिंतन घडून चिंतांचं निरसन होतं. जीवन आनंदानं भरून जातं.
क्षमा कशाला म्हणतात? ः
सर्वसाधारणपणे क्षमेचा संबंध अपराधाकडे जोडला जातो. असंही म्हटलं जातं की, चुकणं, अपराध घडणं हे मानवाकडून होणारच. परंतु क्षमा करणं हे मात्र दिव्य कर्म असतं. असंही सांगितलं जातं- ‘क्षमा करा अन् विसरून जा.’ यातच मनाचा मोठेपणा, दिलदारपणा आहे. आपण क्षमा केली हे तर विसरून जायचंच, पण ज्याला क्षमा केली त्यालाही त्याची आठवण करून द्यायची नाही. पण हे सामान्य माणसाचं चिंतन झालं. युधिष्ठिराचे यासंदर्भातले विचार अगदी वेगळे आहेत. त्याच्या मते, जीवनातील द्वंद्व सहन करणं म्हणजे क्षमा होय. द्वंद्व म्हणजे दोन टोक्याच्या, परस्परविरुद्ध अवस्था. अशा अवस्था अनुभवताना मनाचा तोल राखायचा, आनंदात राहायचं. तक्रार, निंदा पूर्णपणे टाळायची. यासाठी बुद्धीचाच उपयोग करावा लागतो.

द्वंद्व मुख्यतः तीन पातळ्यांवरची असतात- देह, मन, बुद्धी. देहाच्या पातळीवर जी द्वंद्वं जाणवतात ती शीत-उष्ण अशासारख्या अनुभवाची असतात. सर्वसाधारणपणे जरा जास्त गर्मी वाढली, पाऊस पडला, थंडी पडली की आपण तक्रार करतोच. खरं तर यावर आपलं नियंत्रण नसतं. मग ते शांतपणे का नाही स्वीकारायचं? आपण ठरवलं तर साधना करून उघड्या अंगानं गोठवणार्‍या थंडीत, तसेच वितळणार्‍या गर्मीत उघड्या अंगानं बर्फावर किंवा रेतीवर झोपू शकतो. बुद्धीनं निश्‍चय मात्र केला पाहिजे. कोणत्याही इंद्रियाच्या- म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध- अशा टोकाच्या अनुभवात आपली मनोवृत्ती स्थिर ठेवली पाहिजे. तसेच ‘ऋतुं न निंद्येत’ म्हणजे कोणत्याही ऋतूची, नैसर्गिक परिस्थितीची निंदा करू नका, या ऋषींच्या आदेशाचंही पालन केलं पाहिजे तरच युधिष्ठिराच्या मते खरी क्षमा केल्यासारखं होईल. विचार करण्यासारखं हे उत्तर आहे निश्‍चित. दुसर्‍या पातळीवरचं द्वंद्व आहे मानसिक. त्याचा अनुभव सुख-दुःख स्वरूपात आपल्याला येतो. बुद्धी वापरली तर सुख-दुःख नावाची वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही हे लक्षात येईल. आपण कल्पनेनं हे निर्माण करत असतो. एकच परिस्थिती एकाच्या सुखाला तर दुसर्‍याच्या दुःखाला कारण होते.

तिसर्‍या पातळीवरच्या द्वंद्वाला बुद्धी कारण असते. मान-सन्मान, निंदा-स्तुती अशा रूपात हे द्वंद्व मानसिक अशांतीचं प्रमुख कारण बनू शकतं. म्हणून स्थितप्रज्ञ, ज्ञानी, भक्त, कर्मयोगी अशा व्यक्तींची लक्षणं वर्णन करताना गीतेसारख्या ग्रंथात ‘लाभालाभौ, जयाजयौ, मानापमान अशा सारख्या परस्पर विरुद्ध परिस्थितीतही आपल्या मनःस्थितीचा तोल जो जाऊ देत नाही’ असे शब्द वापरले जातात.
शांत, प्रसन्न, स्थिर मनाला सरोवराची उपमा दिली जाते; सागराची नव्हे. सदैव हेलकावणारा, तरंगायमान (लाटा असलेला) कितीही महा असला तरी महान नसतो. तो तरूनच जावा लागतो. याउलट निस्तरंग, स्थिर, स्तब्ध पृष्ठभाग असलेलं सरोवर मात्र प्रतीक ठरतं शांत मनाचं. स्थिर बुद्धीचं नि शुद्ध चित्ताचंसुद्धा. अशा सरोवराच्या पाण्यातून तर कमळ (सरोज, अंबुज) उमलतंच, पण खालच्या तळाच्या चिखलातूनही कमळच (पंकज) फुलतं. अशी व्यक्ती मग ‘अंतर्बाह्य जग आणि मन| रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग’ अशा परिस्थितीत जगत असली तरी या सतत चालू असलेल्या युद्धातही स्थिर, शांत असते. युधिष्ठिरासारखी!