बुद्धं शरणं गच्छाऽमि

0
241

– प्रा. रमेश सप्रे

आपलं देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून असलेलं ‘अणुशक्तिविषयीचं धोेरण’… आपला तेव्हापासून ध्यास आहे … शांततेसाठी अणुशक्ती (ऍटम्स फॉर पीस) विध्वंसासाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठी अणुशक्ती!
अन् हाच तर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा किंवा शिकवणुकीचा गाभा आहे. बुद्धाला शरण जाऊ या. त्याहीपेक्षा बुद्धाच्या तत्त्वांना शरण जाऊया. ‘युद्ध नको असेल (जे रात्रंदिन, आत बाहेर चालूच आहे) तर बुद्ध हवा’ असं म्हणून चालणार नाही तर बुद्ध व्हा! बुद्धाशी एकरूप .. एकात्म व्हा ..

‘युद्ध नको तर बुद्ध हवा’, हे आता काहीसे सवयीचे झालेले शब्द जेव्हा प्रथम ऐकले तेव्हा ते हृदयाबरोबरच मेंदूलाही स्पर्शून गेले. काय संदेश आहे या वाक्यात? विचार करु लागल्यावर डोळ्यासमोर आपल्या इतिहासातला एक मार्मिक प्रसंग उभा राहिला.
कलिंग युद्ध अशोकानं जिंकल्यावरचा प्रसंग. सम्राट अशोक युद्धभूमीकडे पाहतोय. स्मशान शांतता पसरलीय. रक्ताचे पाट वाहताहेत. मांसाचा चिखल झालाय. युद्धाचा उन्माद ओसरलाय. युद्धज्वर उतरू लागलाय. खरं तर विजयाच्या उन्मादात अशोकानं ‘जितं मया, जितं मया’ म्हणत रणभूमीवर नाचायला हवं होतं. पण तो विलक्षण गंभीर झालाय. ‘या रक्तामांसाच्या भूमीवर सिंहासन ठेवून राज्य करायचं?’ हा विचार त्याच्या अंतरात्म्याला बोचतोय. त्याच्या सद्सद्विवेकाला टोचतोय. एका भयाण सुन्न करणार्‍या अवस्थेत तो पुतळ्यासारखा निश्चल उभा आहे…
इतक्यात शेजारून जाणार्‍या भगवी वस्त्र धारण केलेल्या भिक्षुंच्या कंठातून बाहेर पडणारा घोष त्याच्या कानावर पडतो. कानातून मनात पाझरतो.
बुद्धं सरणं गच्छा ऽ मि|
संघं सरणं गच्छा ऽ मि|
धम्मं सरणं गच्छा ऽ मि|
शांतरसात ओथंबलेलं ते उदात्त शब्द अशोकासाठी आकाशवाणी ठरली. युद्धभूमीकडे पाठ फिरवून तो त्यांच्या दिशेनं… त्यांच्या मागे चालत राहिला तो कायमचाच. त्याला यापुढे कधीही युद्ध नको होतं कारण त्याला आता बुद्ध मिळाला होता. बुद्धाचा मार्ग मिळाला होता. उरलेलं जीवन तो बुद्धाचा संदेश जगभर पसरवण्यासाठी व मानवजातीला युद्धाऐवजी शांतीचा व मानवतेचा (माणुसकीचा) मार्ग दाखवण्यासाठी घालवणार होता.
या क्रांतिकारक परिवर्तनाला उद्देशून सर्व महान इतिहासकारांनी लिहिलंय…
‘युद्धात निर्णायक विजय मिळवल्यानंतर युद्धसंन्यास घेणारा मानवजातीच्या इतिहासातील एकमेव राजा म्हणजे सम्राट अशोक!’
युद्ध हरल्यावर ‘युद्ध नको’ म्हणून जीवनात युद्धविराम करणारे अनेक राजे आहेत. पण अशोकासारखा ‘देवानां प्रिय प्रियदर्शी’ सम्राट अशोकच.
एवढं काय सामर्थ्य आहे बुद्धाच्या जीवनचरित्रात नि अमर संदेशात? बुद्धजयंतीच्या (वैशाखी पौर्णिमा) निमित्तानं सहचिंतन करु या.
इथं सहज आणखी एका प्रसंगाचा उल्लेख करणंही उचित ठरावं. आपण पोखरणच्या वाळवंटात एकामागून एक असे दोन अणुशक्ति (चाचणी) स्फोट केले तो प्रसंग.
सार्‍या जगाचा विरोध पत्करून एकप्रकारे त्याला आव्हान देत जे स्फोट केले गेले त्याच्या यशस्वितेचा सांकेतिक संदेश (कोडवर्ड) कोणता होता माहित आहे?
पहिला स्फोट यशस्वी झाल्यावर राष्ट्रप्रमुखांना संदेश पाठवला-
‘द बुद्धा लाफ्ड‘ – ‘बुद्ध हसला’.
दुसर्‍या यशस्वी चाचणीनंतरचा संदेश होता-
‘द बुद्धा लाफ्ड अगेन’ – ‘बुद्ध पुन्हा हसला’.
अब्दुल कलामांसारखे द्रष्टे वैज्ञानिक प्रमुख असलेल्या संशोधक मंडळींनी अणुशक्तीच्या स्फोटासाठी बुद्धाचं नाव असलेला संदेश का पाठवला असेल? अन् तेही कविमनाचे विचारवंत पंतप्रधान देशाला लाभलेले असताना? .. असा विचार मनात येईल. पण त्याचं उत्तर म्हणजे आपलं देशाच्या पहिल्या पंतप्रधानांपासून असलेलं ‘अणुशक्तिविषयीचं धोेरण’… आपला तेव्हापासून ध्यास आहे.. शांततेसाठी अणुशक्ती (ऍटम्स फॉर पीस) विध्वंसासाठी नव्हे तर देशाच्या विकासासाठी अणुशक्ती!
अन् हाच तर बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा किंवा शिकवणुकीचा गाभा आहे. गौतम बुद्ध. मूळ नाव सिद्धार्थ. शुद्धोधन हे पिताश्री तर माता होती मायादेवी. शाक्य या राजघराण्यात सिद्धार्थाचा जन्म झाला. प्रसूतीसाठी आई माहेरी जात असताना वाटेत लुंबिनी उपवनात मायादेवी प्रसूत झाली. सातव्या दिवशी माता मायादेवीचा अंत झाला. पुढे सिद्धार्थाचं पालन पोषण गौतमीनं केलं. काही ठिकाणी ही गौतमी शुद्धोधन राजाची दुसरी पत्नी व मायादेवीची बहीण असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे मावशीनं बाळ सिद्धार्थाचं संगोपन केलं. तिच्या गौतमी या नावावरून त्याला गौतमही म्हणू लागले. पुढे तपश्‍चर्या करून, चिंतन करून ज्ञानाचा महाप्रकाश प्राप्त झाल्यावर सर्वजण त्याला बुद्ध म्हणजे ज्ञानाचं प्रबोधन – बोध झालेला – असं म्हणू लागले.
गौतम बुद्धांचा काळ इ.सनपूर्व ५६३ ते ४८३ असा सांगितला जातो. याचा अर्थ ऐंशी वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य त्यांना लाभलं.
स्वतः गौतम बुद्ध एक महान विभूती झाल्यामुळे त्यांच्या चरित्रात अनेक उद्बोधक प्रसंग (आख्यायिका) सांगितल्या जातात.
जन्मल्यावर शुद्धोधन महाराजांनी गौतमाचं जातक (भविष्य) ज्योतिषांकडून ऐकलं. ‘हा पुत्र महान होईलच पण सम्राट होईल किंवा असामान्य तपस्वी बनून मानवजातीला मार्ग दाखवील’. – हे ऐकल्यावर त्या क्षत्रिय राजानं पुत्र सिद्धार्थ गौतम महान् सम्राट बनावा या दृष्टीनं पावलं टाकायला सुरवात केली. जगातील किंवा जीवनातील दुःखाचा याला अनुभवच काय पण परिचयही होता कामा नये याची खबरदारी शुद्धोधन राजानं घेतली. पण मानवजातीच्या कल्याणासाठीच जन्मलेल्या गौतमाची नियती अटळ होती. त्याचं शिक्षण, राजपुत्र म्हणून आचार विचारांना लावायचं वळण हे सारं योजनेनुसार राजगृहातच होत गेलं. कालांतरानं त्याचा यशोधरा नावाच्या राजकन्येशी विवाह झाला. त्यांना एक राजस पुत्र झाला. त्यानं नाव ठेवलं राहुल म्हणजे शृंखला (साखळी) म्हणजे बंधन. पण गौतम विवाहाची बेडी नि पुत्रस्नेहाची साखळी यात अडकणार नव्हता. राजानं गौतमानं विलासी, उपभोगी जीवन जगावं म्हणून गौतमाला तीन ऋतूत सुखावह होतील असे तीन महाल बांधून दिले. तेथील सर्व वातावरण विलासी राहील याची व्यवस्था केली. त्याप्रमाणे गौतमाचं जीवन सुरूही होतं. पण नियतीचा संकेत वेगळाच होता.
एकदा नगरसंचाराला निघालेल्या गौतमाला तीन दृश्य दिसली. रथातून जाताना मार्गावर एक खोकत खोकत थांबत थांबत जाणारा रोगी दिसला; नंतर पूर्ण वाकलेला देह काठीच्या आधारानं सावरत चालणारा वृद्ध दिसला; नंतर लोकांच्या खांद्यावरून आडवं जाणारा मृतदेह (प्रेत) दिसला… ते पाहून गौतमानं एकच प्रश्‍न सारथी छन्न याला विचारला ‘हा असं का चालतोय?’ छन्नानं कारण सांगितलं व हेही सांगितलं की सर्वांना असंच जावं लागणार आहे. अस्वस्थ झालेल्या गौतमानं रथ दुसर्‍या मार्गानं वळवायला सांगितला. त्याला एका वृक्षाखाली वृद्ध झालेला पण ध्यानमग्न अवस्थेत शांत बसलेला योगी दिसला. त्याच्या चेहर्‍यावरचं तेज पाहून गौतमानं विचारलं, ‘हा कोण? हा इतका आनंदात कसा?’ छन्नानं सांगितलं की तो संन्यासी साधू आहे. सर्व बंधनातून मुक्त होऊन तो समाधी ध्यानाचा आनंद अनुभवतोय. महालात गौतम परतला तो आपणही त्या साधुसारखं सर्वसंगांचा त्याग करून सर्व मानवजातीच्या दुःखाचं मूळ शोधून काढायचं- हा संकल्प करूनच. त्याच रात्री त्यानं निग्रहानं पत्नी – पुत्र – राजगृह सारे भोग, ऐश्‍वर्य सार्‍यांचा त्याग करून अरण्याचा मार्ग धरला.
गौतमाचा बुद्ध होण्यासाठीचा प्रवास सुरू झाला होता.
आपली राजवस्त्र, सुंदर रेशमासारखे केस यांचा त्याग करून एकटाच तो तपश्चर्येसाठी निघाला. गौतमाच्या या गृहत्यागाला ‘महाभिनिष्क्रमण’ म्हटलं जातं. एका नव्या युगाचा तो आरंभ-क्षण होता.
आरंभी नगरात भिक्षा मागून तपोचिंतनात गढून राहण्याचा अभ्यास त्यानं सुरू केला. पण मनाचं समाधान होईना. शांतीचा अनुभव दूरच राहिला. अखेर निर्धारानं तो गयेजवळच्या उरूवेला नावाच्या अरण्यात एकांत स्थळी गेला. कठोर उपासनेमुळे तो अस्थिपंजर झाला. पण ज्ञानाचा प्रकाश दिसेपर्यंत अन्नोदकाचा त्याग करण्याचा संकल्प केला. देह अगदी जर्जर झाला. त्या भागात राहणारी वनराजकन्या सुजाता त्याच्यासमोर क्षिरपात्र ठेवायची. तो ती खीर खायचा नाही. ती प्रसाद म्हणून स्वतः भक्षण करायची.
एकदा एक राजकन्या आपल्या सखींसह वनविहारासाठी तिथं आली. जलविहारानंतर नृत्य करतेवेळी सतार वाजवणार्‍या सखीनं तारा एवढ्या घट्ट केल्या की एक तार तुटली. आता संगीतसुर निघेनात. ते पाहून वैतागून ती राजकन्या उद्गारली, ‘तूही त्या झाडाखाली बसलेल्या संन्याशासारखीच मूर्ख आहेस.’ बुद्धानं डोळे उघडून नम्रपणे तिला विचारलं, ‘मला राग नाही आला. पण मला मूर्ख का म्हणालीस ते कृपा करून सांग.’ राजकन्या पटकन म्हणाली, ‘तार किती आवळायची हे तिला कळत नाही तसं शरीर किती कष्टवायचं हे तुम्हालाही कळत नाहीये. ज्या हेतूनं तुम्ही हे तप करताय तो हेतू साध्य होण्यापूर्वीच तुमचा देह पडला तर काय उपयोग?’ मनोमन तिला नमस्कार करून गौतमानं प्रथमच ती द्रोणातली खीर प्राशन केली. सुजाता धन्य झाली.
आता अधिक तीव्र व उग्र चिंतन सुरू झालं नि तो दिवस उजाडला. सिद्धार्थ गौतमाचा बुद्ध होण्याचा दिवस वैशाखी पौर्णिमा! बुद्धजयंती किंवा बुद्धपौर्णिमा!
पण हे अंतिम ज्ञान होण्यापूर्वी एका दिव्यातून त्याला जावं लागलं. देवांचा, दैवी संपत्तीचा नि संस्कारांचा शत्रू असलेल्या मार यानं गौतमाभोवती वादळ निर्माण केलं; वणवा पेटवला; अत्यंत सुंदर अप्सरांचं नृत्य सुरू केलं; अंतिम उपाय म्हणून मायावी यशोधरा गौतमासमोर उभी केली जी गौतमाला परत चलण्याविषयी काकुळतीनं विनवणी करु लागली. पण गौतम ना घाबरला ना विचलित झाला. अखेर मारानं काढता पाय घेतला.
साधक – तापस जीवन संपून सिद्ध-बुद्धाचं जीवन सुरू झालं. आता उरलेलं सारं जीवन गौतम बुद्ध आपल्याला झालेल्या ज्ञानाच्या प्रसारासाठी घालवणार होता. आजुबाजूच्या विद्वान लोकांना त्यानं पहिला उपदेश (धर्मप्रवचन) केला. तो त्याच्या सार्‍या सार्‍या अनुभवाचं सार होता. बुद्धाचं अनुभवामृत होतं. त्यातील प्रत्येक शब्द मोलाचा होता. भावी जीवनाचा मार्गदर्शक होता.
‘साधूंनो, असे जवळ या. मी सांगत असलेल्या धर्मज्ञानाच्या मार्गानं जाऊन समस्त दुःखांचा शेवट करा. मला चार आर्यसत्यांची प्रचीती झाली आहे. – दुःख, दुःख-समुदय, दुःखनिरोध व निरोध-गामिनी प्रतिपद्! त्यांच्या सम्यक् ज्ञानानेच ‘संबोधी’ प्राप्त होते’.
पुढे बुद्धानं जीवनातून दुःखाचा समूळ नाश करण्यासाठी दुःखाचं मूळ कशात आहे हे सांगितलं. एका शब्दात हे दुःखमूळ म्हणजे ‘तृष्णा’ – तहान. भोगांची, उपभोगांची तहान; पैसा-प्रसिद्धी-सत्ता-सामर्थ्य यांची तहान.
यावर मात करण्यासाठी, या कधीही तृप्त न होणार्‍या तृष्णेवर विजय मिळवण्यासाठी बुद्धानं जी जीवनचर्या सांगितली तिच्या आठ पैलूंना अष्टांग मार्ग (जीवनशैली) म्हणतात. विषय संपूर्ण टाळणारी कठोर व्रतं वैकल्ये किंवा विषयांच्या अतिसेवनानं आलेली विकलता या दोन्ही टोकांचा त्याग करून सुवर्णमध्य साधणारी जीवनपद्धती म्हणजे बुद्धानं स्वतः जगून शिकवलेला ‘सम्यक् अष्टांग मार्ग.’ हा बुद्धाच्या जीवनसंदेशाचा किंवा तत्त्वज्ञानाच्या आचाराचा महामार्ग आहे. कोणती आहेत ही आठ अंगं? या सुवर्णमध्य साधणार्‍या पैलूंना बुद्धानं ‘सम्यक्’ असं म्हटलंय. – १. सम्यक् दृष्टी, २. सम्यक् संकल्प, ३. सम्यक् वाक् (वाणी), ४. सम्यक् कर्म, ५. सम्यगाजीव, ६. सम्यक् व्यायाम, ७. सम्यक् स्मृती, ८. सम्यक् समाधी.
आपल्या शिष्यांकडून बुद्धानं या मार्गानुसार जगून घेतलं व नंतर आत्मप्रचीती झाल्यावर सर्व दिशांना मानवजातीच्या कल्याणासाठी या तत्त्वांचा प्रसार करण्यासाठी पाठवलं. यावेळी बुद्धाचं सूत्र होतं- बहुजनहिताय, बहुजनसुखाय.
पुढे बिंबिसार राजा बुद्धाला शरण आला. त्याच्या प्रजेनंही बुद्धमार्ग स्विकारला. पुढे बुद्धज्ञानाच्या प्रभावाखाली सम्राट अशोक आला. तो पूर्णपणे भारून व भारावून गेला. त्यानं सर्वप्रकारची हत्या वा हिंसा आपल्या राज्यात बंद केली. गोरगरीबांसाठी अन्नसत्रे सुरू केलीच पण त्यांच्याबरोबर जनावरांसाठीही स्वतंत्र रुग्णालये व सेवा केंद्रे उभारली. बुद्धाचा उपदेश सर्वदूर पसरण्यासाठी आपला पुत्र महेंद्र व कन्या संघमित्रा यांना नेपाळ, श्रीलंका, ब्रह्मदेश यासारख्या देशात पाठवलं. अनेक भिक्षू व भिक्षुणी यांच्या संघासाठी विहार बांधले.
बुद्धसंदेश सर्वकाळी मार्गदर्शक ठरावा म्हणून ठिकठिकाणी शिलालेख कोरले, ताम्रपट लिहिले. माणसाला माणूस म्हणून माणुसकीनं जगण्यासाठी बुद्धसंदेशाला पर्याय नव्हता आणि नाहीही. गौतमबुद्ध आपल्या ज्ञानाचा प्रसार करत, मानवाला तृष्णेपासून दूर करून, अहिंसा व करुणा यांच्या माध्यमातून शांतीचा अनुभव करून घेण्यासाठी प्रेरणा देत अनेक वर्षं फिरत राहिला. आपली पत्नी, पुत्र, पिताश्री, प्रजाबांधव यांनाही त्यानं उपदेश करून सन्मार्गाला लावलं.
आनंद हा त्याचा प्रमुख शिष्य. पुढे बुद्धाचे जीवनप्रसंग व उपदेश शब्दांकित झाले. विशेषतः पाली या बोलीभाषेत हा उपदेश असल्यानं जनसामान्यांना, बहुजनसमाजाला तो आपल्या कल्याणासाठी वाटू लागला. त्यांना त्याचं आचरण सोपं झालं. त्रिपिटक, धम्मपद असे अनेक ग्रंथ बुद्धवाङ्‌मयाचे मार्गदीपक बनले.
आम्रपाली नावाची राजनर्तकी बुद्धाला शरण आली. उपेक्षित जनांचा आधारस्तंभ बनला बुद्ध नि त्याचा संदेश. बुद्धाचं महापरिनिर्वाण हा त्याच्या शिष्यांसाठी व अनुयायांसाठी महान् दुःखाचा तसाच दुःखमुक्तीचा मार्ग दाखवणारा प्रसंग ठरला.
सर्वं क्षणिकं क्षणिकं | सर्वं अनित्यं अनित्यं | सर्वं दुःखं दुःखं ॥
बुद्धाचे हे शब्द जीवनाचं स्वरुप सांगणारे होते. तर त्यानं सांगितलेला सम्यक अष्टांगमार्ग हा मानवाला मुक्ती व शांती देणारा होता.
आचार्य विनोबांनी बुद्धाच्या शरणसूत्रीचा सांगितलेला क्रम व त्यावर केलेलं चिंतन मार्मिक आहे.
* बुद्धं शरणं गच्छाऽमि| – बुद्ध नावाच्या महान व्यक्तीला शरण जा. पण कोणतीही व्यक्ती ही कायम ‘व्यक्त’ रूपात (जिवंत) राहू शकत नाही. म्हणून त्यांच्या उपदेशाचं अनुसरण करणार्‍या शिष्यांना शरण जा-
* संघं शरणं गच्छाऽमि|
पण संघही चिरायू नसतात. चिरंतन असतात ती तत्त्वं नि मूल्य. म्हणून शेवटी
* धर्मं शरणं गच्छाऽमि|
बुद्धाला शरण जाऊ या. त्याहीपेक्षा बुद्धाच्या तत्त्वांना शरण जाऊया. ‘युद्ध नको असेल (जे रात्रंदिन, आत बाहेर चालूच आहे) तर बुद्ध हवा’ असं म्हणून चालणार नाही तर बुद्ध व्हा! बुद्धाशी एकरूप .. एकात्म व्हा .. हे साध्य झालं पाहिजे. यासाठी बुद्धाचाच आदेश आहे … आतून मार्गदर्शन मिळवा.. आतून शांत व्हा .. तृप्त व्हा.. मुक्त व्हा… आत्मदीपो भव!