बीसीसीआयला ५२ कोटींचा दंड

0
86

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने (कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया) बुधवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) ५२ कोटी रुपयांचा दंड ठोठावला. आयोगाने बुधवारी ४४ पानांचा निकाल दिला असून यात बीसीसीआयला ५२.२४ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बीसीसीआयच्या गेल्या तीन वर्षांमधील आर्थिक उलाढालीच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आला आहे. ६० दिवसांत हा दंड भरण्याचा आदेशही देण्यात आला आहे. आयपीएलने प्रक्षेपण हक्काच्या लिलाव प्रक्रियेत आर्थिक हितसंबंध जपण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका आयोगाने ठेवला आहे.

नोव्हेंबर २०१२ मध्ये दिल्लीतील उद्योजक सुरिंंदर सिंग बार्मी यांनी बीसीसीआयविरोधात भारतीय स्पर्धा आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. यावर निर्णय देताना आयोगाने बीसीसीआयने आयपीएलच्या माध्यमातून प्रचंड नफा कमावला, असे निरीक्षण नोंदवले होते. तसेच कोणताही स्पर्धक निर्माण होऊ न देण्याचे बीसीसीआयचे धोरण असल्याचे आयोगाने निकालात म्हटले होते. २००८ पासून सोनी पिक्चर्स नेटवर्ककडे आयपीएलच्या प्रक्षेपणाचे हक्क होते. यावेळी करार करताना जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ असलेल्या बीसीसीआयने आपली ताकद वापरून आयपीएलला कोणताही प्रतिस्पर्धी निर्माण होणार नाही याची शाश्‍वती प्रसारणकर्त्यांना दिल्याचे २०१३ साली सांगत बीसीसीआयला ५२ कोटींचा दंड आयोगाने ठोठावला होता. त्यावेळी बीसीसीआयने न्यायालयाकडून या प्रकाराची पुन्हा चौकशीचा आदेश मिळविला होता. आता आयोगाने पुन्हा त्याच निष्कर्षापर्यंत पोहोचत दंडाची रक्कम कायम ठेवली आहे.