बीज प्रकल्प

0
844

– म. कृ. पाटील

आपल्या सर्वांच्या घरी अतिउत्कृष्ट आणि श्रेष्ठतम अशी रसायन प्रयोगशाळा अस्तित्वात आहे. ही रसायनशाळा म्हणजे सुसज्ज असे आपले स्वयंपाकघर आणि नियमित रासायनिक प्रक्रिया करणारे शास्त्रज्ञ म्हणजे आजी, आई, बहिण, वहिनी आणि आपली अर्धांगिनी. या सर्वजणी पौष्टिक आणि संतुलित आहाराची निर्मिती करण्यात तरबेज. ‘स्वस्थस स्वास्थ रक्षणं आतुरस्य व्याधि परिमोक्ष:’ आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिचे आरोग्य व्याधिमुक्त आणि सुदृढ राखण्याकरिता सातत्याने प्रयत्नशील असणार्‍या महिला. आता स्वयंपाक कसा करावा, मांडणी, रचना कशी करावी असे शिक्षण – प्रशिक्षण देणार्‍या संस्था आहेत. परंतु घरच्या सात्त्विक जेवणाची चव, रुची, आस्वाद वेगळाच असतो. आपल्या स्वयंपाकघरात कोणकोणती कडधान्ये, तृणधान्ये, शाकवर्ग, फलवर्ग आणि दुग्धवर्ग असतात याची जाणीवही आपणास नसते. वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य वस्तूचा उपयोग करून नैमित्तिक न्याहारी भोजन तयार केले जाते. या निर्मितीमध्ये घरातील आई, बहिण, वहिनी आणि अर्धांगिनीचे फार मोठे योगदान असते. स्वयंपाकघरात वृक्ष वल्लरीची, गुल्माची पाने, बिया, फुले, फळे आणि प्रकांडाचाही उपयोग केला जातो. यातूनच मानवी देहाला अत्यावश्यक कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे, क्षार आणि चोथायुक्त आदी पोषणमूल्ये मिळतात. षड्‌रसाची निर्मितीही होते, जी शरीराला आणि मनाला अत्यावश्यक असते. वरील सर्व प्रकारच्या अन्न घटकांतून मानवी मन आणि शरीराला ऊर्जा, तेल, बल, उर्मी, उत्साह आणि मानसिक संतुलन कायम मिळाल्यामुळे मानवी देह सुदृढ, निरोगी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यास व दीर्घायुषी होण्यास मदत करतात.

आपल्या आहारातील जे अन्न घटक येतात, त्या अन्न घटकांची माहिती आपणास क्वचितच असते. कर्त्या स्त्रीने सामानाची, भाजीची यादी दिली की आपण ते सर्व मान खरेदी करून आणून देतो. त्या अन्न घटकांबद्दल आपल्याला काडीचेही देणे घेणे नसते. आम्हांला हवे असते उत्तम प्रतिचे कडधान्य, तृणधान्य, बि-बियाणे, फळे आणि पौष्टिक संतुलित आणि स्वादिष्ट आहार. आहारातील प्रत्येक अन्नघटक वेगवेगळ्या वातावरणात, जमिनीत, तापमानात आणि परिसरात तयार झालेला असतो.
‘पॉझिटिव्ह थॉट्‌स आर नॉट प्रेडिक्शन्स, पॉझिटिव्ह आर सीड्‌स ऑफ फ्युचर’ होकारात्मक अथवा सकारात्मक विचार, पुढे काय घडणार याचा तर्क, अंदाज नसून सकारात्मक विचार, हे मानवी मनात रुजलेल्या उत्तम जाती – प्रजातीच्या वनस्पतीचं बियाणं. बी-बियाणं म्हणजे वृक्ष-वल्ली नव्हे. उत्तम, श्रेष्ठतम फळाकरिता केलेली निश्‍चयी ठाम सुरूवात, उज्ज्वल भविष्याची रूजवात. मानवाचे सकारात्मक विचार हे वृक्षवल्लीच्या बियाणासारखे असतात. मानवी अंतर्मनामध्ये ‘नेणीव’ मनाच्या भूमीत सकारात्मक विचारांचं बियाणं पेरलं, तर बाह्य मनाच्या पातळीवर, म्हणजेच ‘जाणीव’ मनामध्ये त्या बियाण्यापासून निर्माण झालेल्या उत्तम वर्तनाच्या सदाचाराची झाडं फुलतात. मानवी जीवनात आणि निसर्गात असच घडत असतं. संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा अभंगही तेच सांगतो. ‘शुद्ध बीजा पोटी| फळे रसाळ गोमटी|’ अशा प्रकारची सुंदर अर्थगर्भ सुभाषिते लहानपणी शाळेत शिकलो. शालेय परिपाठ आणि वार्ताफलकावर सुवाच्च अक्षरात लिहिले आणि वाचलेसुद्धा. अशाच सुभाषित आणि सुविचारावर कल्पनाविस्तार, निबंध लिहिले. शालेय जीवन संपले आणि सुंदर सुभाषिते, सुविचार काळाच्या पडद्याआड विरून गेले. आपल्या पाल्यांना आता दैनंदिन अभ्यासात मदत करताना त्यांची आठवण येते.
अन्न घटक किंवा बी-बियाणे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर शेतकरी उभा राहतो. विविध प्रकारच्या फळांच्या बिया दिसतात. बी-बियाणे शेतकरी शेतात पेरतो. आपण मात्र फळे खाल्ली की त्यातल्या बिया इतस्त: फेकून देतो. आपल्याला त्या बियांचा उपयोग काय? असा विचार (नकारात्मक) प्रत्येकाच्या मनात उमटतो. या बियांचे सृजन प्रक्रियेद्वारा नवीन वृक्षवल्ली निर्माण होतात. अशा सकारात्मक विचाराचे बीजारोपण झाले. विविध वृक्षवल्ली, गुल्म आणि झुडपांच्या बियांचा संग्रह करू शकतो. वृक्षवल्लींना मोहोर आला की सुमधुर रसाळ फळांचा आस्वाद घेतो. सर्वच फळे मानव सेवन करू शकत नाही. निसर्गातील पशुपक्षीही, त्या त्या मोसमात फळे खाऊन बीज प्रसार करून निसर्ग संवर्धनास हातभार लावतात. निसर्गात हे चक्र अव्याहत चालू असते. सृजन प्रक्रियेतून नववृक्षाची निर्मिती हा ‘बी’चा आद्य कर्तव्य आणि उपयोग आहे. या व्यतिरिक्तही बियांचे अनेक उपयोग आहेत. बियांच्या उपयुक्ततेविषयी आपण सर्व अनभिज्ञ असल्यामुळे मधुर फळांचा आस्वाद घेतल्यावर बिया कचरा म्हणून फेकून देतो. बिया फेकून देणे म्हणजे नैसर्गिक शक्तीचा अपव्यय नकळत करत असतो. ‘बी’ प्रचंड उर्जा स्रोताचे स्वयंचलित, आणि स्वयंभू अवकाशयान. निसर्गातील पृथ्वी, आप, तेज, वायू आदी पंचमहाभूताचा स्पर्श होताच, सुप्तावस्थेतील बीजांकुर भूमातेचे कवच भेदून अवकाशी झेप घेतो तेव्हा बीजांकुर जमिनीशी काटकोन करून लंब तयार करतो. तद्नंतर दोन दले (पानं) येतात गणिताची सुरूवात झाली. प्रत्येक पान पेपरावर अंकुरते तेव्हा काटकोन, तर सूर्य प्रकाश मिळविण्यासाठी ७० अंशाचा कोन करते. निसर्गातील परब्रह्म तत्त्वाचे आणि पंचमहाभूतांचे प्रतिक म्हणजे श्रीफळ. श्रीफळाला नारळ, ब्रह्मांड असेही म्हणतात. वृक्षवल्लीच्या बियांपैकी सर्वात मोठी ‘बी’ म्हणजे नारळ. त्रिगुण, तीन अंकाचे प्रतिक आहे. नारळाची सोंड, तीन, नारळावर उभ्या रेषा तीन. नारळाला तीन डोळे, सोण्ण, काथा, कट्टी असे तीन भाग. करवंटी, खोबरे आणि अमृतासम जल असे तीन भाग. नारळाचे फूल तीन पाकळ्या, तीन पूकेसर आणि तीन स्त्रीकेशर. ‘नारळ’ या वृक्षापासून भाषा, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, जमिनीचा कस व प्रकार, हवामान इत्यादी विषय सहजपणे हाताळता येतात. रसायनशास्त्राचाही समावेश करता येतो. वटवृक्ष (आधारवड), अश्‍वत्थ (पिंपळ), पायरी, नांदुरकी, तांबडी भाजी, मणेर, औदुंबर आदी वनस्पतीची ‘बी’ सर्वात लहान. भाषेतील पूर्णविरामासारखी. चुडताचे ‘हीर’ समांतर रेषा, पिराटा म्हणजे अंतर्गोल व बहिर्गोल. भिंगाचे उदाहरण, याचप्रमाणे केळीच्या पानावरही असते. मानव, पशु-पक्षी आणि कीटक यांच्या जीवनात विविध प्रकारच्या बी-बियाणांचे स्थान आणि महत्त्व अनमोल आहे.
वृक्षवल्ली आणि वृक्षाचा अधिवास व परिसंस्थाच्या छत्रछायेत प्राचीन ऋषि-मुनींनी १४ विद्या आणि ६४ कलांचा शोध लावला. १४ विद्या आणि ६४ कलांची साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक ज्ञानगंगा वेदकालापासून प्रवाहित आहे. दिवसेंदिवस नवनवीन शोध, संशोधन करत मानव त्यामध्ये भर घालत आहे. निसर्गात अतिउत्कृष्ट दर्जाची पुन:निर्मितीची प्रक्रिया सतत चालू असते. स्वयंपाक घरातील ओला कचरा बाहेर टाकतो. तो सडतो, कुजतो आणि दुर्गंधी सुरू होते. हाच कचरा हा वृक्षवल्लीचे सेंद्रिय खत आहे. निसर्गाने उदारहस्ते दिलेले निसर्गालाच परत देत असतो. पशुपक्षी व मानव यांची रक्ताभिसरण क्रिया वरून खाली अशी आहे. वृक्षवल्ली मात्र या उलट रक्ताभिसरण क्रिया करतात. वृक्षवल्लीचे पाय म्हणजे त्यांची मुळे मूळ पाण्याचा शोध घेत अतिखोल आणि दूरवर जातात. मुळांनी शोषलेले पाणी आणि जमिनीतील जीवनसत्त्वे वृक्षाच्या शेंड्यापर्यंत जातात म्हणून वृक्षवल्लींना ‘पादप’ म्हणतात. पायाने (मूळं) पाणी शोषून घेणारी वनस्पती म्हणजे ‘पादप.’
शिबिधान्ये : शेंगातून मिळणार्‍या द्विदल धान्यास शिबिधान्ये म्हणतात. मूग, रानमूग, मसूर, रानमसूर, तूर, हरभरा, वाटाणा, मटकी, उडीद, राजमा, वाल, पावटा, घेवडा, चवळी, अळसांदे इ.
तृणधान्ये : गवतासारख्या वनस्पतीपासून मिळणारी ही धान्ये एकदल असतात. गहू, भात, ज्वारी, बाजरी, मका, सावा, पाकळ, नाचणी (रागी), ओट, राजगिरा, वरी आणि सातू.
शार्कवर्ग : पालेभाजीमध्ये येणार्‍या सर्व वस्तू. उदा. अळू, अबईची भाजी, कोबी, कोहळा, काकडी, भोपळा, गाजर, मुळा, घोसाळे, दोडकी, तोंडली, नवलकोल, फुलकोबी, तांबडी भाजी, आणि अंबाडी, सुरण, हादका, चूका, चाकवत, कोथंबिर, घोळ, पालक, टाकला, माठ, मेथी, शेपू इ.
फलवर्ग : डाळिंब, आवळा, द्राक्षे, खजूर, फालसा, रायणी, अक्रोड, पिस्ता, बदाम, आंबा, फणस, संत्री, मोसंबी, चिकू, अननस, अंजीर, करवंद, चारा, जांभळा, चूर्णा, कण्हेरी, वावडिंग, कवठ, बेलफल, कलिंगड, लिंबू, केळे, टरबूज, जर्दाळू, पपई, पपनस, पेरु, बोरे, रामफळ, सीताफळ, लक्ष्मणफळ, लीची, रासबेरी, सफरचंद, स्ट्रॉबेरी, हिरडा इ.
मसाले वर्ग : आले, सुंठ, जायफळ, मायफळ, त्रिफळा, दगडफूल, दालचीनी, मीरी, केशर, नागकेशर, जीरे, शाहजिरे, ओवा, कडू ओवा, लवंग, वेलदोडा, खसखस, तीळ (सफेद व काळे), जवस (अळशी), मेथी, मोहरी, धने, पुदीना, मिरची, लसूण, चिंच, नारळ, कोकम, ओटम, हळद, हिंग, बडीशेप, बाळतशेप इ.
शालेय अभ्यासक्रमाचा आणि स्वयं अध्ययनाचा गाभा म्हणून इयत्ता ५ वी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना विषयानुरूप शालेय प्रकल्प पुरा करावा लागतो. या प्रकल्पांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा वर्गानुसार बी-बियाणे जमविण्याचा प्रकल्प हाती घेता येतो. या प्रकल्पातून परिसरात उपलब्ध असलेल्या वृक्ष, वल्ली गुल्म वनस्पतीच्या बिया म्हणजे अन्न घटक एकत्र करता येतात. शिकत असताना संपादित केलेल्या ज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनाशी किती घनिष्ट आणि दृढ संबंध आहे याची जाण विद्यार्थ्यांना खचितच येईल. बीज प्रकल्पाप्रमाणे, फूल प्रकल्प, पर्ण प्रकल्प, प्रकांड प्रकल्प, फळ प्रकल्प असे शालेय स्तरावर प्रकल्प तयार करवून घेता येतात.
……