बिल्डरसाठी तिसवाडीची जनता २० तास अंधारात

0
176

>> ‘देखभाली’च्या नावाखाली वीज खात्याच्या पायघड्या

>> कॉंग्रेसचा अधिकार्‍यांना घेराव

पावसाळापूर्व देखभालीच्या नावाखाली रविवारी दिवसभर राजधानी पणजीसह तिसवाडी तालुक्यातील वीज पुरवठा खंडित ठेवण्याची वीज खात्याची कृती प्रत्यक्षात कदंब पठारावरील बड्या बिल्डरांच्या भूखंडांवरून जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी हटवण्यासाठी होती असे चौकशीत स्पष्ट झाले आहे. कॉंग्रेसने काल यासंदर्भात वीज खात्याच्या उच्च अधिकार्‍यांना घेराव घातला.

रविवारचा संपूर्ण दिवस व रात्र उन्हाळ्याच्या उष्म्यात वीजेशिवाय काढावी लागल्याने संतप्त बनलेल्या पणजी, सांताक्रुझ, ताळगाव व आसपासच्या लोकांना जेव्हा हा वीजपुरवठा पावसाळापूर्व देखभालीसाठी खंडित ठेवण्यात आला नव्हता असे कळले तेव्हा लोकांमध्ये संतापाची लाट पसरली. एका बड्या बिल्डराच्या भूखंडांवरून जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी हटवण्यासाठी हा वीज पुरवठा खंडित ठेवण्यात आला होता असे कळल्यानंतर काल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वीज खात्याचे मुख्य अभियंते एन. नीळकंठ रेड्डी यांना त्यांच्या केबिनमध्ये जाऊन सुमारे तासभर घेराव घातला व एका बिल्डरसाठी वीज खात्याने तिसवाडीतील लोकांना वेठीस कसे धरले असा प्रश्‍न त्यांना विचारला. ऍड. यतीश नाईक, सिद्धनाथ बुयांव, अमरनाथ पणजीकर, सुरेंद्र फुर्तादोंसह सुमारे ५० कार्यकर्त्यांनी रेड्डी यांना घेराव घातला.

रेड्डींची कबुली
अन् सारवासारवही
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अचानक घातलेल्या घेरावामुळे गोंधळून गेलेल्या रेड्डी यांनी प्रथम पावसाळापूर्व देखभालीसाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता, असे सांगितले. मात्र, एका मागोमाग एक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी प्रश्‍नांचा भडीमार केल्यानंतर भांबावून गेलेल्या रेड्डी यांनी बिल्डराच्या भूखंडावरून जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी हटवण्यासाठी वीजपुरवठा खंडित केला होता हे मान्य केले. मात्र, केवळ त्यासाठीच नव्हे तर पावसाळापूर्व देखभालीचेही काम हाती घेण्यात आले होते अशी सारवासारवही करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

बिल्डरकडून खात्याकडे
४ कोटींचा भरणा
आपल्या भूखंडावरून जाणारी उच्च दाबाची वीजवाहिनी हटवण्यासाठी ‘मंगलम्’ या बांधकाम कंपनीने वीज खात्याकडे ४ कोटी रुपये भरले होते, अशी माहितीही रेड्डी यांनी यावेळी दिली. यावेळी एका बिल्डरसाठी तुम्ही २४ तास वीज पुरवठा बंद ठेवून पणजी शहर व तिसवाडीतील जनतेला वेठीस कसे धरले असा प्रश्‍न सुरेंद्र फुर्तादो, यतीश नाईक, सिद्धनाथ बुयांव आदींनी रेड्डी यांना विचारला व या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची त्यांच्याकडे मागणी केली.

वीजमंत्री, मुख्य अभियंत्याच्या
राजीनाम्यांची मागणी
वीजमंत्री पांडुरंग मडकईकर व मुख्य वीज अभियंते एन. निळकंठ रेड्डी यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणीही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यावेळी केली. वीज खात्याचे कार्यकारी अभियंते मयुर हेदे हे यावेळी रेड्डी यांच्या मदतीला धावून आले व महापालिकेचा कचरा प्रकल्प ज्या ठिकाणी आहे त्या प्रकल्पावरूनही उच्च दाबाची वीजवाहिनी गेलेली असल्याने महापालिकेनेही ही वाहिनी हलवण्याची मागणी केली होती, असे सांगितले. मात्र, महापालिकेने कधी मागणी केली होती हे कागदोपत्री पुराव्यासह सांगा असे आव्हान फुर्तादो यांनी यावेळी हेदे यांना दिले.

आश्‍वासनानंतर घेराव मागे
रेड्डी यांनी शेवटी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला घेराव मागे घेतला. या घटनेविषयी काल समाज माध्यमावरूनही लोकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

पावसाळापूर्व कामांसाठी खंडित केला वीजपुरवठा : वीजमंत्री
रविवारी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा कदंब पठारावरील ११० केव्ही वीज उपकेंद्रावर पावसाळापूर्व कामे हाती घेण्यासाठी करण्यात आला होता, असे वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी काल या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या दरम्यानच वीजपुरवठा खंडित ठेवण्याचे ठरवून काम हाती घेण्यात आले होते. हे काम करण्यासाठी बेंगळुरहून एक पथक आले होते. ठरलेल्या वेळेत हे काम पूर्ण झाले असते पण ४ वाजता पाऊस आल्याने काम करताना अडथळा आला. नंतर खाली उतरविलेल्या तारा पुन्हा वर चढवणे जोरदार पावसामुळे शक्य झाले नसल्याचे ते म्हणाले. काही गावांना पर्वरी येथून वीजपुरवठा करण्यात आला. लोकांची जी अडचण झाली त्याबाबत आपण दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे ते म्हणाले.

कदंब पठारावरील वीज उपकेंद्रावरून अन्य वीज उपकेंद्रांना जोडणी नसल्याने वीजेची समस्या झाली. सांतआंद्रे, कुंभारजुवे, पणजी व अन्य भागांत त्यामुळे रविवारी रात्री वीजपुरवठा होऊ शकला नसल्याचे ते म्हणाले. काल केलेल्या पावसाळापूर्व कामामुळे आता तिसवाडीतील लोकाना चांगला वीजपुरवठा देणे शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.

पर्रीकरांकडून मडकईकरना सूचना
वीज खात्याने नियोजनाच्या अभावी कदंब पठारावरील उच्च दाबाची वीज वाहिनी बदलणे आणि दुरूस्तीकाम हाती घेऊन राजधानी परिसरातील जनतेला रविवारी वेठीस धरले. याचे तीव्र पडसाद सोमवारी उमटले आहेत.

राज्यातील खंडित वीज पुरवठ्याच्या समस्येच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेणारे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याशी संपर्क साधून वीज प्रश्‍नी विचारणा करून वीज पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत मौलीक सूचना केल्या आहेत.

वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अधिकार्‍यांना सूचना करण्यात आल्या आहेत. वीज खात्याकडून तूर्त एचटीएल कनेक्शन दिली जाणार नाही. तसेच कुठल्याही भागात १ तासापेक्षा जास्त काळ वीज पुरवठा खंडित राहणार नाही, असे वीज मंत्री मडकईकर यांनी सांगितले.