‘बिम्ब’ आणि त्याचा एकोडा ‘शिलेदार!’

0
219

– दिलीप बोरकर

मी कोंकणीसाठी मार खाल्लेला आहे. कोंकणीतून सातत्याने लिहिलेले आहे. तिची शान राखणे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी तिच्या अंगावरील लक्तरे दूर करत ‘बिम्ब’ नावाचा एक अलंकार चढविण्यासाठी धडपडतो. त्यात मी यशस्वी झालेलो आहे. एकोडा शिलेदार बनून.

 

पाहता पाहता ‘बिम्ब’ मासिकाला १६ वर्षे सरत आली. येत्या जानेवारी २०१८ ला ते १७ व्या वर्षात पदार्पण करणार आहे. ‘अबब! कोंकणी मासिक आणि एव्हढी वर्षे चालू शकते..!’ नक्कीच कुणाच्या तरी तोंडून हे उद्गार आले असतील. कारण दैनिकं, मासिकं याबाबतीत कोंकणीचा इतिहासच तसा आहे. कोंकणी भाषेला मान्यता देण्यासाठी, तिला तिच्या हक्काची जागा देण्यासाठी कोंकणी भक्त कसले दिव्य करील ते सांगता येत नाही. त्याच्या याच वेडापाई कित्येक कोंकणी भक्तांनी आपली शक्ती न ओळखता कोंकणीचे एखादे दैनिक असावे, कोंकणीचे निदान एक तरी मासिक चालावे म्हणून प्रयत्न सुरू केले. त्यांच्या आरंभशूरपणाला तोड नव्हती. ‘वेडात दौडले वीर मराठी सात’ असं एका मराठी पोवाड्यात गायल्याप्रमाणे एखादं मासिक अथवा दैनिक सुरू करण्यासाठी कोंकणी चळवळीतही ‘वेडात’ दौडणार्‍यांची कमतरता नव्हती. परंतु अत्यंत धडपड करून काही महिने अथवा दिवस ते दैनिक, साप्ताहिक अथवा मासिक चालवून ते बंद करण्याच्या प्रक्रियेतही त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता. अनुभवांती कोंकणी दैनिक, साप्ताहिक अथवा मासिक सुरू होते ते बंद होण्यासाठीच असे समीकरण होऊन गेले होते. आणि खरोखरच ती काही काळाने बंद पडायची. त्यामुळे ती काढणार्‍यांचेच नव्हे तर कोंकणी भाषा आणि एकंदर कोंकणी चळवळीचे हसे व्हायचे. तो एक थट्टेचा विषय बनायचा. कोंकणीविरोधकांना त्यामुळे बोलायची आयतीच संधी लाभायची. कोंकणी ही भाषाच नव्हे, ती बोली. बोली भाषेतील नियतकालिके चालणार तरी कशी… मराठी ही भाषा आहे, त्यात ती गोमंतकीयांची मातृभाषा आहे. म्हणून ती गोव्यात वाचली जातात. त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढतच जाते. कारण काय तर सगळे गोंयकार मराठीप्रेमी आहेत, असा जावईशोध काही जणांनी लावला होता आणि वरकरणी त्यात तथ्य दिसत होते.

गोव्याची राजभाषा, लोकभाषा कोंकणी असूनही, गोव्यात ८०-९०% लोक कोंकणी बोलत असूनही गोव्यात एकही कोंकणी दैनिक तग धरू शकत नाही हे सत्य आहे. त्याउलट या लहानशा गोव्यात चार-पाच इंग्रजी आणि सात-आठ मराठी दैनिकं चालतात आणि त्यात उत्तरोत्तर भर पडत जाते हे सत्य नाकारता येत नाही. मात्र एखादं कोंकणी दैनिक सुरू करण्याचे धाडस कोणीच करायला जात नाही आणि ते केलेच तरी काही काळाने ते बंद करण्याशिवाय पर्याय राहत नाही हा आजपर्यंतचा इतिहास आहे. याचा अर्थ मराठी, इंग्रजी दैनिकं बंद पडत नाहीत का? असा होत नाही. या आधी ‘वेस्ट कोस्ट’सारखे इंग्रजी दैनिक त्याच्या मालकाना बंद करावं लागलेलं आहे. गोव्याचा राजकीय, सामाजिक, भाषिक इतिहास रचलेले मराठी दैनिक ‘राष्ट्रमत’ बंद पडलेलं आहे. गोव्यातील दोन-तीन मराठी आणि एक इंग्रजी दैनिक आज शेवटचा श्‍वास घेत आहे.

तर सांगायचा मुद्दा म्हणजे, एखादे दैनिक अथवा मासिक न चालण्याचे कारण निव्वळ आर्थिक मुद्दा राहत नाही. त्याची इतरही बरीचशी कारणं असतात. गोव्यातील काही दैनिकं ङ्गक्त सरकारी जाहिराती मिळतात अथवा मिळाव्यात म्हणून चालवली जात आहेत. त्यामागे त्या दैनिकाला बहुराज्यस्तरीय दर्जा मिळावा असा त्यांच्या मालकांचा हेतू असतो. सर्वाधिक खपाची दैनिकं अशी दवंडी जरी या दैनिकांकडून पिटवली जात असली तरी त्यातली काही दैनिकं गोवा आवृत्तीच्या नावाने मोजक्याच प्रती ङ्गक्त नावापुरत्या काढत असतात हे सत्य नाकारता येत नाही. एखादं दैनिक चालतं याचा अर्थ त्या दैनिकाला वाचकांचा पाठिंबा आहे असा होत नाही तर त्यामागचे अर्थकारण आणि राजकारण वेगळेच असते. कोंकणी दैनिकं अथवा मासिकं सुरू करून ती बंद पडण्यामागे यापैकी बरीचशी कारणे आहेत.

कोंकणी ही गोव्याची लोकभाषा आहे म्हणून तिला राजभाषेचा दर्जा द्यावा. कोंकणीचा समावेश भारतीय संविधानातील आठव्या परिशिष्टात व्हावा म्हणून कोंकणी भक्तानी बराच मोठा लढा दिला. हा लढा व्यावहारिक दृष्टिकोनातून नव्हे तर भावनिक दृष्टिकोनातून चालविला गेला. त्यामुळे गोव्यात एखादं कोंकणी दैनिक आणि मासिक सुरू झालं तरी टीकू शकलं नाही. दैनिक हे व्यावहारिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून चालवायचे असते याचे भान न ठेवता ते भावनिक तत्त्वांवर चालविल्यानेच ही कोंकणी नियतकालिकं चालू शकली नाहीत. आता त्यांना व्यवहार कळत नव्हता असे नाही. या लोकांना व्यक्तिगत व्यवहार कळत होता आणि अजून कळतो. आपण कोंकणी चळवळीसाठी योगदान दिलेले आहे तेव्हा त्याचा ङ्गायदा आपल्याला मिळायला पाहिजे या एकाच हट्टामुळे कोंकणी दैनिकं बंद करण्याची पाळी आलेली आहे. कारण एखाद्या दैनिकाच्या वृध्दीसाठी पत्रकारितेची आणि व्यावसायिक बैठकीची जाण असलेल्या संपादकाची आणि व्यवस्थापकाची नेमणूक करायची असते हा मुद्दा लक्षात न घेता कोंकणी चळवळीतील योगदान लक्षात घेऊन त्याना पद मिळावे, त्याना चार पैसे मिळून आर्थिक मदत मिळावी हाच दृष्टिकोन ठेवल्याने आणि अजूनही ठेवत असल्याने कोंकणी नियतकालिकांच्या जन्म-मरणाचा सोहळा कोंकणी भक्ताना पाहावा लागत आहे.

दैनिक चालणे अथवा चालविणे शक्य नसल्यास एखादे दर्जेदार मासिक चालवणे काही कठीण नव्हते. तसा प्रयत्न कोंकणी चळवळीतल्या प्रत्येक नेत्याने केलेला आहे. निदान ते दिवाळी अंक तरी काढायचे. पण त्यात त्यांचा स्वार्थी व्यवहार गुंतलेला असल्याने ती चालवणे त्याना शक्य झालेले नाही. कारण आपल्या कोंकणी त्यागाचा दाखला पुढे करून सरकारी जाहिराती घ्यायच्या, मंत्र्यांपुढे हाजी हाजी करत जास्तीत जास्त रक्कम उकलायची आणि त्यातून आपल्या गाठीला चार पैसे लावायचे हेच धोरण या लोकानी अवलंबिले होते. कोंकणी ही राजभाषा आहे, ती तुमचीही भाषा आहे, जाहिरती म्हणजे काही भीक नाही. त्या देणे तुमचे कर्तव्य आहे असे खडसावून सांगण्याची धमक कुणाला नव्हती. त्यामुळे मंत्र्या-संत्र्याचे ङ्गावले गेले. अजूनपर्यंत त्यांना जाहिरातीसाठी साहित्यिकांना आपल्या दारात बसलेले पाहणे आवडते. या आणि इतर कारणांसाठी कोंकणी मासिकं, वार्षिक अंक बंद पडत गेले. यातच त्या याचकांचे वय होत गेल्याने त्यानी तो नाद सोडून दिलेला आहे. ‘बिम्ब’ मासिक सुरू करून ते सातत्याने सोळा वर्षे मी कसं काय चालवलं हे सांगायचं असेल तर इतिहासाचा हा धावता आढावा आवश्यक होता.

एखादं मासिक चालवताना भावनिक बाजू असणे आवश्यक आहेच. तो महत्त्वाचा भाग आहे. परंतु त्याला व्यावसायिक जोड नसली तर ते मासिक जास्त काळ टीकू शकत नाही हा माझा स्वानुभव आहे. ङ्गक्त कोंकणी भाषेतील आहे म्हणून त्याला जाहिरात द्या, विकत घ्या, वर्गणी भरा अशी भिक्षांदेही करण्याचे दिवस कधीच सरलेले आहेत याचे भान मी मासिक सुरू करतेवेळी ठेवले. पण ते सर्वमुखी व्हायचे असेल तर तो कुटिरोद्योग होता कामा नये तर चार जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यता आहे याची मला जाणीव होती. २००२ साल जेव्हा उजाडले तेव्हा मागची पंचवीस वर्षे मी दर्जेदार दिवाळी अंक प्रसिद्ध करत होतो. एका अर्थाने तो कुटिरोद्योगच होता. जाहिरातीतून मिळालेल्या पैशातून छपाईचा खर्च निघून एक पुस्तक छापण्याचा खर्च सुटावा आणि त्याचबरोबर कोंकणीचा एक दिवाळी अंक वाचकांसमोर यावा एव्हढीच माझी माङ्गक अपेक्षा असायची. पण मासिक सुरू करतेवेळी, त्याला अकाली मृत्यू न येता काहीकाळ तरी ते जगावे हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेऊन मला मासिक सुरू करायचे होते. त्यासाठी काही मदतीच्या हातांची आवश्यकता होती. याच काळात कोंकणी साहित्यिक चळवळीतील तीन बुजुर्ग साहित्यिक आपल्या नोकरीतून निवृत्त होणार होते. निवृत्तीनंतर त्याना एखाद्या कामाचा व्याप हा हवाच असणार आणि मासिक सुरू करण्याच्या कामाला गती देण्यास हाच काळ योग्य असल्याचा विचार करून मी या बुजुर्गांशी संपर्क केला. त्यांची बैठक घेतली. या तीन बुजुर्गांमध्ये मी, प्रशांती तळपणकर यांचाही समावेष करून पाचामुखी परमेश्वर तसा पाचाहाती मासिकाचा परमेश्वर असा विचार पक्का केला.

दोन-तीन बैठका झाल्या. मासिकाची संकल्पना सर्वाना आवडली. पण त्यासाठी पैसा कुठून आणावा यावर गाडी अडली. मी मासिक सुरू करण्यासाठी जागा तयार ठेवली होती. पैसा कमी पडायला देणार नाही याची ग्वाही दिली होती. या चार दिग्गजांनी ङ्गक्त अंक तयार करायचा होता. मी अर्थव्यवस्था आणि वितरणव्यवस्था सांभाळणार होतो. परंतु माझ्यावर यातल्या एकाचा अजिबात विश्वास नव्हता. या आधी कोंकणी नियतकालिके सुरू होऊन बंद पडली होती. आमचे मासिक त्याच मार्गाने जावे असे त्याना वाटत नव्हते. तसे घडून नामुष्की ओढवून घेण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. मासिक तर हवेच होते; पण ते चालविण्यासाठी पैसाही हवा होता. तेव्हा प्रथम मी पैसा जमवावा आणि नंतर मासिक सुरू करण्याचा विचार करावा असा बहुमोल सल्ला देऊन पाचातील एक परमेश्वर चालता झाला. त्याच्या मागोमाग दुसराही गेला. आता राहिले कवी रमेश वेळुस्कर आणि प्रशांती तळपणकर. त्यांना म्हटले, मी मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तेव्हा त्या दोघांनी सहकार्य देण्याची तयारी दर्शवली आणि ‘बिम्ब’चा पहिला अंक देशाच्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २००२ रोजी सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार रेमो फर्नांडिस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आला. आरंभास ङ्गक्त चाळीस पानांपासून सुरू करण्यात आलेले हे साहित्यहोत्र करता करता शंभर पानांवर पोहोचले. कधी सोळा वर्षे सरली तेच कळले नाही.

या सोळा वर्षांत मी बरेच काही कमावले आणि गमावलेही. पैसा कमाऊ शकलो नाही. कारण मासिक चालविण्यासाठी जाहिराती हव्या असतात. त्यातून जो काही पैसा येतो तो मासिकाचा दर्जा सांभाळण्यासाठी, लेखकांना मानधन देण्यासाठी वापरावा की सुमार दर्जाची निर्मिती करून स्वतःच्या चरितार्थासाठी तो वापरावा हा माझ्यासमोर नाही म्हटल्यास प्रश्न उभा राहायचा. पण जे कोण जाहिरातींच्या स्वरुपात मासिक चालविण्यासाठी पैसा देतात तो समाजाचा पैसा असतो. तेव्हा त्याच दर्जाचे मासिक समाजापर्यंत पोहोचविणे माझे कर्तव्य आहे असे मला वाटायचे. म्हणूनच जाहिराती कमी मिळाल्या तरी मी मासिकाच्या निर्मितीदर्जात कोठेच तडजोड केली नाही. सरकार आणि उद्योजकांकडून जाहिराती घेऊन त्या पैशांची बचत करण्यासाठी ङ्गक्त नग म्हणून पांढर्‍यावर काळे करून जाहिरातदारांपुरतेच अंक छापणारे महाभाग मी पाहिलेले आहेत. एक किस्सा मला आठवतो. त्या काळी कुटुंब नियोजनाचा प्रचार जोरात चालायचा. जाहिरात देणारा विभाग ‘लाल त्रिकोण’ची छपाई अनिवार्य करत असायचे. पण रंगीत छपाई केली तर ङ्गायदा काहीच उरत नव्हता. तेव्हा मासिक काढणारे महाभाग बटाटा कापून त्याचा ‘त्रिकोण’ करायचे आणि लाल रंगांत तो बुडवून ङ्गक्त दोन प्रतींवरील जाहिरातींत त्या लाल त्रिकोणचा ठसा उमटवायचे. सरकारी अधिकार्‍याना ‘लाल’ दिसल्याशी कारण. हा प्रकार मी पाहिल्याने तसा खोटारडेपणा माझ्याकडून घडून येऊ नये म्हणून मी प्रकर्षाने भान ठेवले. त्याचं ङ्गळ मला मिळालं.

मासिक चालवणे हे सामान्य काम नव्हे. एक दिवस कुमार केतकर मला म्हणाले होते, ‘मासिक चालवणे सामान्य काम नाही, ज्यांना आपली साखर आणि रक्तदाब वाढवून घ्यायचा आहे त्यानी या ङ्गंदात पडावे.’ त्याचबरोबर त्यांनी म्हटले होते, ‘मासिक चालवणे हे थोर समाजकार्य आहे. त्यासाठी कुणाकडे हात पसरावा लागला तर कमीपणाचे वाटून घेऊ नये.’ मी या पंधरा-सोळा वर्षांच्या काळात कित्येक उद्योजकांना भेटलो. कोणीच कधी नाही म्हटले नाही. अवधूत तिंबलो यांनी माझ्या मासिकासाठी महिन्याला किती खर्च येतो याची चौकशी केली. मी आकडा सांगितला. त्यांनी एक सल्ला दिला, हे सगळे पैसे एकटा कोणी देणार नाही. वीस लोक निवड जे महिन्याला ठरावीक रक्कम देतील. त्यानीच काही नावं दिली. त्यात नियतकालिक प्रकाशनाचा अनुभव असलेले धेंपो उद्योग समूहाचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, नाना बांदेकर वगैरेंचा सहभाग होता. काहीच प्रश्‍न न करता या लोकांनी माझी विनंती मान्य केली. अशा सकारार्थी लोकांच्या सहकार्यानेच मी ‘बिम्ब’ मासिकाची एक स्वतंत्र ओळख निर्माण करू शकलो. आज ‘बिम्ब’चा वाचकवर्ग ङ्गक्त गोव्यातच नाही तर तो कोचीन, मगळुरू. बंगळुरू, मुंबई इथल्या कोंकणी समाजाच्या घराघरांत आहे. हजारभर वर्गणीदार आहेत. इंद्रजित घुलेसारखे कित्येक मराठी लोक या मासिकातून कोंकणी लिहितात. कित्येक लोकांना ‘बिम्ब’ मासिकाने लिहिते केले. ‘बीम्ब’ पुरस्कारही देण्यात आले. कित्येक लेखकांची पुस्तकं ‘बिम्ब’तर्फे प्रकाशित करण्यात आली. ‘बिम्ब’ मासिकाचे सातत्य आणि दर्जाची दखल घेऊन गोवा चेम्बर्स ऑङ्ग ट्रेड ऍण्ड कॉमर्स संस्थेने पुरस्कार देऊन गौरविले आहे.

‘बिम्ब’ मासिकाची खरोखरच गरज होती काय..? माझे उत्तर आहे ‘होय.’ कोंकणी राजभाषा झाली, कोंकणीला राजमान्यता मिळाली. कोंकणीचा संविधानाच्या आठव्या परिशिष्टात समावेश केल्याने तिला राष्ट्रमान्यता लाभली. ती गोमंतकीयांची मातृभाषा आहे. कितीही नाही म्हटले तरी गोंयकार हा कोंकणीच असणार. गोव्याबाहेर गेल्यावर तरी त्याना ते मान्य करावेच लागते. गोव्यात तो भाषिक राजकारण भलेही खेळो, पण अस्तित्वाचा प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा तो आपण कोंकणी माणूस हेच सांगणार. ‘बिम्ब’सारख्या मासिकांना खरं म्हणजे सरकारने प्राधान्य तत्त्वावर जाहिराती द्यायला हव्यात. पण माझ्या दिवाळी अंकालासुद्धा माहिती खात्याची जाहिरात मिळत नाही.

मी कोंकणीसाठी मार खाल्लेला आहे. कोंकणीतून सातत्याने लिहिलेले आहे. तिची शान राखणे माझे कर्तव्य आहे. म्हणूनच मी तिच्या अंगावरील लक्तरे दूर करत ‘बिम्ब’ नावाचा एक अलंकार चढविण्यासाठी धडपडतो. त्यात मी यशस्वी झालेलो आहे. एकोडा शिलेदार बनून.