बाहुल्यांचे खेळ

0
620

खरंतर तुम्ही-आम्ही तशा कळसूत्री बाहुल्याच. कुण्या अनामिक, अज्ञात शक्तीने सूत्रे हलवावी, त्याबरहुकूम आम्ही नाचावं. आपल्या मनाप्रमाणं, मनाला येईल तसं नाचतो आहोतचा दंभ मिरवीत. मी यंव केलं, त्यंव केलं हा भ्रम कायम जोजवीत ङ्गुशारक्या मारतो आपण. पण या सजीव, सशरीर बाहुल्यांची सूत्रे दुसर्‍या कुणाच्या तरी नाचविणार्‍या हाती. त्यानं ‘नाच गं घुमा’ म्हणायचं. त्या अनाम शक्तीचे सोडाच; आमच्या बालपणी आम्हाला वडीलधारी माणसे नाचवत होती. तरुणपणी बायको खेळवते, असं म्हणतात. अनुभव नाही, कारण वडिलांसकट नात्या-गोत्यातल्यांनी ‘नाचरा’ ही उपाधी आम्हाला चिटकवली होती. त्याकाळी ती भूमिका पार पाडण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
शतक नव्हे, सहस्रकांचं संचित घेऊन वावरणारी, ‘कळसूत्री बाहुल्या’ ही समृद्ध परंपरा त्या तिथे पलीकडे, तिकडे ङ्गाटक्या झुल्यावर हिंदकळत होती, कुणाला काही सोयरसुतक असल्याचे जाणवत नव्हते. युद्धे, लढाया, तह, किल्ले यांत गुरङ्गटून गेलेल्या, राकट, कणखर, दगडांचा देश असलेल्या महाराष्ट्रदेशी इतिहासाला पिंगुळीतील या सांस्कृतिक वारशाशी काही देणं-घेणं नसावं अशीच अवस्था होती.
मोडतोड झालेल्या, त्यांच्या वारसानीच भंगारात काढायला ठेवलेल्या या तिन्ही प्रकारांचा एक खेळ आयोजित केला, जुन्ता हाऊसमधील विवेकानंद सोसायटीच्या सभागारात. बाहुल्यांची ङ्गाटकी-तुटकी अवस्था पाहून नाके मुरडणारा (सु)संस्कृत पणजीकर यात आघाडीवर होता. महाराष्ट्रातील हा दळभद्री कलाप्रकार आमच्या गोव्याच्या कला अकादमीनं करावा याचे तिडीक आणणारे शेरे ऐकू येत होते. पण या पारंपरिक खेळाचे संस्कृतीतील स्थान, त्याचे महत्त्व आम्हाला ठावूक होते.
त्याकाळचे दै. ‘गोमन्तक’चे संपादक माधवराव गडकरी यांनी हे सारं समजून घेतलं. भारावलेल्या त्यांनी या प्रकाराची पूर्ण माहिती देणारा, दैनिकाचे अख्खे पान भरून इतरत्र वाहणारा एक लेख लिहिला. वास्तविक पत्रकारितेतील आमच्या काही उपद्व्यापांनी गडकरी वैयक्तिकरीत्या माझ्यावर खूपच नाराज होते. पण उमद्या मनानं त्यांनी आमची पाठ थोपटली. डिस्कव्हरी ऑफ इंडिया, पं. नेहरूंच्या नावावर असली तरी, ही डिस्कव्हरी त्यांनी खुलेपणी आमच्या खात्यावर बहाल केली. उपेक्षित कलाकार, दुर्लक्षित कलाप्रकार लोकांसमोर आणल्याच्या कवतिकासोबतच महाराष्ट्र शासनाची हजेरीही घेतली. मुंबईत हे वृत्त गेले व यंत्रणा हलू लागली.
बाबुराव सडवेलकर नावाची एक गुणी व्यक्ती कला संचालक म्हणून वावरत होती. गोवा कॉलेज ऑङ्ग आर्टचे प्रिंसिपल म्हणून येण्याचे कबूल करूनही ऐनवेळी कला अकादमीला ठेंगा दाखवणारे. त्यांनी मुंबईत यातील ‘चित्रकथी’ डिस्कव्हरी आपल्या नावावर ओढवून घेतली. त्यातील काही चित्रे उचलली. गाजावाजा खूप झाला. पण शोध करत येणार्‍या ङ्गुकट्या धंदेवाईक संशोधकांना तोंड देण्याव्यतिरिक्त गुडीवाडीतील त्या बापड्या कलाकारांच्या हाती काहीच लागले नाही.
आम्ही स्वस्थ नव्हतो. दिल्लीतील संगीत नाटक अकादमी या केंद्रीय संस्थेत असलेली वट वापरली आणि ‘गुरू-शिष्य परंपरा’ या योजनेखाली यातील कत्रसूत्री व चामड्याच्या-लेदर वा शॅडो पपेट्‌स हे यांचे शास्त्रीय नाव, यांना दरमहा आर्थिक मदतीची तरतूद झाली. यावर देखरेख ठेवण्यासाठी महिन्यातून एकदा पिंगुळीला जाणे-येणे, त्यासाठी भाड्याची टॅक्सी, एवढी व्यवस्था करता आली.
गोव्यानजीक पारंपरिक कळसूत्री बाहुल्यांचा खजिना व पिढ्यान् पिढ्या त्या नाचविणारे पारंपरिक कलाकार ठाकर जमात हे एव्हाना जगातल्या अनेक देशांतून माहीत झालं होतं. भारतीय स्तरावरील बलाढ्य वृत्तपत्रांनी याची दखल घेतलेली. रशिया व अमेरिका या दोन महासत्तांच्या भूमीत हे वृत्त पोचलेलं. आम्ही स्थानिक मराठी दैनिकं वाचणारे. इंग्रजीचा धसका असला तरी अभ्यास म्हणून ‘नवहिंद टाईम्स’ भीत भीत चाळणारे. पण मागाहून समजलं त्यानुसार आंतरराष्ट्रीय नियतकालिकांतून प्रसिध्द, जगजाहीर झालेल्या वृत्तात ‘विनायक खेडेकर, गोवा’ झळकलं होतं. यात ‘टाइम’ ही होतं म्हणे. पिंगुळीसोबतच आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचलो होतो.
थोडी आडकथा. आम्हीच सूचिबध्द केलेलं काणकोणचं लोककला पथक, भारत महोत्सवात रशियाचा दौरा करून आलेलं. अलीकडच्या वृत्तपत्रीय परिभाषेत रशिया गाजवून आलेलं. या पथकात मधुकरमाम हा सनईवादक होता. मल्लिकार्जुन मंदिरात ‘शेनायकार’ म्हणून सेवा बजावणारे. मर्यादित वादन करताना सूरासोबतच असुराशीही सलगी करणारे, याची ङ्गारशी तमा न बाळगणारे. या पथकासाठी परंपरेनं सनईची साथ करणारे असल्याने त्याना वगळता येत नव्हतं म्हणून स्वीकारलं. तसा छान, प्रेमळ माणूस. ठराविक, आवश्यक तेवढे वाजविणारा. गोवा भाषेत ‘कलाकार.’ या गृहस्थांचं निधन झालं त्यावेळी वर्तमानपत्रात छापून आलेलं; ‘आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच देहावसान.’ आम्हीही असेच आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती बनून राहिलो होतो, असं मी म्हटलं तर कुणाच्या पोटात का दुखावं?
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील श्री. मेल हेलस्टेन नावाचे एक अङ्गलातून गृहस्थ. एक दिवस विनायक खेडेकर नावाच्या गृहस्थाला शोधत गोव्यात आले. मांडवीत उतरले. त्यानी हॉटेलात चौकशी केली. त्याकाळी मांडवीत आमचा बराच राबता. बहुतेकजण ओळखणारे. त्यानी चक्क मला ङ्गोन लावूनच त्यांच्या हाती दिला. त्यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त करताच आम्ही तत्काल होकार दिला. ते अकादमीत आले. पहिल्याच भेटीत कळलं की ते आमच्या जातीचे. नातेसंबंध लगेच जुळले. अडचण थोडी भाषेची. त्यांचे अमेरिकन उच्चार, आमची गोव्याच्या भाषेत ‘तांबडी इंग्लेज.’ पण एका शाखेतले असल्याने अडचण आलीच नाही. ‘चारियोट ऑङ्ग रामा’ असे मी म्हणताच, ‘यू मीन रथा?’ ‘जनकाच्या दरबारात रामानी शिवधनुष्य उचललं’ हे सांगण्यासाठी योग्य इंग्रजी शब्दांचा शिवधनू धाडकन आमच्या उरावर आदळण्याची शक्यता निर्माण होताच, ‘यू मीन धनुर्भंगा एट द टाइम ऑङ्ग सीतास्वयंवरा’ म्हणत त्यानीच आम्हाला कष्ट, भयमुक्त केलं.
कळली माहिती अशी. गृहस्थाने मुळात ‘पारंपरिक बाहुल्या’ या विषयात भारताच्या काही भागात काम केलेलं. पश्‍चिम सागर तटावर असे एक प्राचीन केंद्र असल्याचे कळले होते. नक्की ठिकाण सापडत नव्हते. अमेरिकेत कुठल्या तरी नियतकालिकात त्याना ही माहिती, सोबतच माझे नाव, गोवा, एवढ्यावर ते इथे पोचले. वृत्तीने संशोधक असल्याने नावावरून माणसाचा शोध घेणे सोपे असल्याचे त्यांचे मत. ‘इंटरनॅशनल ट्रॅडिशनल पपेटियर्स कॉंग्रेस’ अशा एका संस्थेचे ते प्रमुख होते.