बाळासाठी समयोचित पूरक आहार

0
1064
  •  रुकसार बानु कुक्नूर (गोवा कॉलेज ऑफ होमसायन्स)

पूरक आहाराची सुरुवात करताना तो किती मात्रेत आणि कोणत्या दर्जाचा द्यायचा हे फार महत्त्वाचे ठरते. अन्नपदार्थ बाळाच्या घशात अडकू नये याची खबरदारी घेणे गरजेचे असते आणि म्हणून बाळाचं पहिलं अन्न हे घरी बनवलेलं, मऊ, कुस्करलेलं किंवा लापशीसारखं आणि पचनास हलकं असावं.

बाळाचा आहार बनवून जास्त वेळ तसाच ठेवू नये. एकतर त्याला लगेच द्यावा किंवा त्याने जर तो खाल्ला नाही तर दुसर्‍या वेळेस ताजा बनवून द्यावा. कारण त्यात सूक्ष्म जीवजंतूंचा प्रादुर्भाव होऊन बाळ आजारी पडू शकते.

 

पहिले सहा महिने बाळाचे पालन-पोषण हे संपूर्णपणे आई आणि आईच्या दुधावरच होते. पहिले सहा महिने ‘केवळ स्तनपान’ दिल्यामुळे माता तसेच शिशुच्या शारीरिक आरोग्यास ते खूप लाभदायक ठरते. जेव्हा आईचे दूध हे बाळाच्या शरीराच्या गरजा वाढवण्यास अपुरे पडते तेव्हाच मग पूरक अन्नाचा अंतर्भाव बाळाच्या आहारात करावा.
‘केवळ स्तनपान’वरून कौटुंबिक अन्न ज्याला ‘पूरक आहार’ किंवा ‘विनिंग’ म्हणतात, यांमध्ये जवळजवळ ६ ते २४ महिन्यांचा कालावधी संपतो, आणि हा काळ अतिशय नाजूक किंवा अतिसंवेदनशील असतो. स्तनपानाबरोबरच पूरक आहार हा सक्रीयपणे पाळला जावा.

पूरक आहाराची सुरुवात करताना तो किती मात्रेत आणि कोणत्या दर्जाचा द्यायचा हे फार महत्त्वाचे ठरते. अन्नपदार्थ बाळाच्या घशात अडकू नये याची खबरदारी घेणे गरजेचे असते आणि म्हणून बाळाचं पहिलं अन्न हे घरी बनवलेलं, मऊ, कुस्करलेलं किंवा लापशीसारखं आणि पचनास हलकं असावं. उदा. कुस्करलेलं केळ, उकडलेलं सफरचंद, चांगल्या वाफवलेल्या आणि कुस्करलेल्या भाज्या जसे गाजर, बटाटा, बीन्स. डाळींचं सूप किंवा वरणाचं पाणी आणि मऊ शिजवलेला भात इ. बाळाला जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही, पण योग्य घनता असलेला आहार द्यावा जो त्याला सहज चावताही येईल आणि सहज गिळता येईल.
निरनिराळ्या वयात द्यावयाचे पूरक पदार्थ ः
* कुठलाही नवीन आहार सुरू करताना प्रथम तो अगदी थोड्या प्रमाणात द्यावा कारण बाळाला कुठल्याही पदार्थाची ऍलर्जी पण असू शकते.
* ६-८ महिन्याच्या वयात लापशीसारखं मऊ केलेला, कुस्करलेला आहार त्याला द्यावा.
* ९ – ११ महिन्यांच्या वयात बारीक चिरलेला किंवा कुस्करलेले पदार्थ जे बाळा आपल्या हाताने सहज खावू शकेल असा असावा. जर तुम्ही मांसाहारी असाल तर या वयात तुम्ही मासे किंवा शिजवेलेलं मांस देऊ शकता.
* १२ – २३ महिन्याच्या वयात, आपल्या घरात शिजणारा सर्व प्रकारचा आहार चालू करावा. टोमॅटोचं साल आणि बिया तसेच लाल भोपळ्याच्या बियांमुळे बाळाला त्रास होत असेल तर त्या देऊ नये.
* हळुहळू आहाराची घनता, डाळी व कडधान्ये आहारात समाविष्ट करून वाढवावी जेणेकरून बालकाला जास्त ऊर्जा मिळू शकेल.
माल्टींग म्हणजे काय?
संपूर्ण कडधान्ये प्रथम भिजवून त्यांचे मोड काढावेत. मग ते वाळवावेत. नंतर त्याची पावडर करावी. त्यामध्ये अमायलेझची निर्मिती होते जे ६ महिन्याच्या बाळाला सहज पचवण्यास मदत करते.
बाळाला कोणत्या वेळेस आहार द्यावा?
* ६-८ महिन्याच्या वयात बाळाला दिवसातून २-३ वेळा जेवण द्यावे.
* ९-२४ महिन्यांच्या वयात बालकाला दिवसातून ३-४ वेळा भोजन द्यावे.
मातांनी किंवा आयांनी ध्यानात ठेवायच्या गोष्टी….
– दिवसातून ५-६ वेळा बाळाला आहार द्यावा.
– तेलकट किंवा मसालेदार आहार टाळावा.
– स्थानिक उपलब्ध असलेले घरगुती डाळी किंवा कडधान्ये वापरून केलेला आहारच निवडावा.
– लोहयुक्त पदार्थ, आयोडाईज्ड मीठ आणि विटामिन-ए असलेले पदार्थ म्हणजे पिवळे किंवा केशरी फळे आणि भाज्या खाण्यास बालकाला प्रेरित करावे.
– बाजारातले प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ टाळावेत.
– पूरक आहार देताना कधीही अन्नसुरक्षेच्या दृष्टीने स्वच्छतेचा अवलंब करावा.
– बाळाचा आहार बनवून जास्त वेळ तसाच ठेवू नये. एकतर त्याला लगेच द्यावा किंवा त्याने जर तो खाल्ला नाही तर दुसर्‍या वेळेस ताजा बनवून द्यावा. कारण त्यात सूक्ष्म जीवजंतूंचा प्रादुर्भाव होऊन बाळ आजारी पडू शकते.
लहान वयापासूनच मुलांना आरोग्यदायी आहार खाण्याचीच सवय लावून तुम्हाला जो बदल अपेक्षित आहे तो तुम्ही स्वतः बना.