बालशिक्षणाचा अश्वमेध

0
731

– डॉ. नारायण भास्कर देसाई

‘बालपणाचा काळ सुखाचा’ असं ऐकत, मानत आणि अनुभवत मोठे झालेल्यांना बालशिक्षण या शब्दातही विसंगती दिसण्याची शक्यता आहे. कारण बालपणात ‘स्वस्थ बसे तोचि फसे’ हे अगदी खरं असतं, आणि आपल्या पठ्ठीबद्ध शिक्षणात स्वस्थ, गप्प, शांत, शिस्तीत बसणं अभिप्रेत असतं. त्यामुळे बालशिक्षण मुलांच्या सुखाच्या आड येतं असं म्हटलं तर ते अगदीच चूक म्हणता येणार नाही. पण बालशिक्षण हवेच का? बालशिक्षण म्हणजे कोणत्या वयातले आणि कसले शिक्षण? बालशिक्षणांत काय काय असावं? बालशिक्षण कसे असावे? या प्रश्‍नांची उत्तरे सरळ आणि नेमकी देण्याची गरज आणि जबाबदारी शिक्षणक्षेत्रातील लोकांना टाळता येणार नाही.

‘बाल’ कुणाला म्हणावे याबद्दलच मुळात मतभिन्नता आहे. कायद्याने सज्ञान होण्याआधीचे १८ वर्षे वयापर्यंत येण्याआधीचे – सगळे बालवय! तर वैद्यकीय शास्त्रात बालवयाची सीमा १२ वर्षे ही आहे. या शास्त्रांच्या स्वत:च्या व्याख्या आहेत. शिक्षण घेते ते बालक, शिकवतात ते शिक्षक असा विचार केला तर सगळ्याच स्तरांवरील विद्यार्थ्यांना बालक या संज्ञेत बसवता येईल. पण शिक्षणशास्त्रात बालशिक्षण म्हणजे शाळा-पूर्व शिक्षण असे मानतात. शाळेत जाण्याचे वय सहा वर्षे पूर्ण असे मानले तर आयुष्याच्या पहिल्या सहा वर्षांचा काळ बालशिक्षणाचा मानावा लागेल. औपचारिक शिक्षण शाळेत सुरू होते, त्याआधीचे शिक्षण अनौपचारिक आणि मुक्त असावे. असे शिक्षण बालशिक्षण म्हणता येईल.
बालवयात मुलांना काहीच कळत नाही असे सगळ्यांनाच वाटते. कळत नाही म्हणून शिकवायचे, असा विचार केला तर मोठ्यांना जे योग्य, गरजेचे आणि महत्त्वाचे वाटते ते शिकवणे ओघाने आलेच. आणि त्यासाठी शाळेत शिकवतात ‘ते’ आणि ‘तसेच’ बालशाळेतही शिकवण्याकडे कल वाढतो. म्हणजे ‘बालशिक्षण’ हे मुलाच्या दृष्टीने ‘हाल शिक्षण’ होत जाते.
खरे तर आपल्या लहानमुलांबद्दलच्या काही धारणा वा समजुती या सगळ्या प्रकाराच्या मुळाशी आहेत. मुलाला शिकवायचे असते, त्याला काही कळत नाही, तो मातीचा गोळा असतो, आकार द्यावा तसा घडतो हे सारे मोठ्यांना ऐकून, वाचून पाठ झालेले असते. पण विज्ञानयुगात आणि आजच्या ज्ञानयुगात याचा पुनर्विचार झाला पाहिजे. पालक, शिक्षक, समाज, शासन सर्वांनीच तो केला पाहिजे. ज्ञानरचनावाद स्वीकारून शिकण्यात ज्ञानाची रचना आणि निर्मिती अतर्ंभूत असते हे मान्य करून ते प्रत्यक्षात आणायला हवे.
काळ बदलला आहे. आजवर अज्ञान असलेल्या अनेक गोष्टी आता उजेडात आल्या आहेत. मानवी जीवनातील अनेक बाबी आजवर गूढ-गहन वाट, त्यांचा खुलासा विज्ञानाने केला आहे. याच्या आधारे आपले आजवरचे ज्ञान, विश्‍वास, श्रद्धा, निष्ठा यांचाही पुनर्विचार होणे स्वाभाविक आहे. आणि या सर्वात प्राधान्यक्रमाने विचार व्हायला हवा तो मूल आणि त्याचे मोठे होणे, विकसित होणे, शिक्षित आणि ज्ञानी होणे, कृतिशील आणि स्वतंत्र होणे या बाबींचा. यासाठीच बालशिक्षण वा शाळापूर्व शिक्षण या विषयांकडे गांभिर्याने पाहाण्याची गरज आहे.
बालशिक्षणात मूल महत्त्वाचे. म्हणून ज्या मुलाला ‘शिकवायचे’ असे आपण म्हणतो, ते प्रत्येक मूल ‘विशिष्ट’ म्हणजे इतर मुलांपेक्षा वेगळे असते, हे आधी कळले पाहिजे. ‘मुलं ती मुलंच’ हे जरी खरे असले तरी एक मूल दुसर्‍यासारखे नसते, अगदी जुळी भावंडे असली तरी! म्हणून मुलाचा विचार प्रत्येकाचा वेगळा व्हायला हवा. एकदा प्रत्येक मूल स्वतंत्र आहे हे मान्य केले, तर मुला-मुलातील फरकही मान्य व्हायला हवा, आणि तो करताना मोठ्यांच्या फूटपट्ट्या चालणार नाहीत. निसर्गदत्त जे आहे, त्याचा स्वीकार आणि त्याआधारे मुलाचा विचार हा बालशिक्षणात महत्त्वाचा!
‘शिकवणे’ हा आपण महत्त्वाचा भाग मानतो. पण ‘शिकणे’ ही उपजत मिळालेली देणगी आहे. मूल स्वत: शिकतं. मुलाचं ‘शिकणं’ हे शिक्षणांत जास्त महत्त्वाचं आहे, शिकवणं नव्हे. मूल आपलं आपण शिकतं, त्यासाठी मेंदू हा अवयव आहे. मेंदूची जडणघडण कशी होते हे आता स्पष्ट झाले असल्याने मेंदू-आधारित शिक्षण हा विचार सर्वमान्य व्हायला हरकत नाही. व्यक्तीचा मेंदू विकसित होण्याचा काळ आयुष्यातील पहिल्या दहा-बारा वर्षांचा असतो. आठव्या वर्षापर्यंत सुमारे ऐंशी टक्के मेंदूची वाढ पूर्ण होते. या काळात वाढीची गती प्रचंड असते. मुलाला जग समजून घेण्याची उत्कंठा अपार असते ती याच काळात. म्हणून मुलाला दिसते ते सगळे बघण्याची, हाताळण्याची ओढ असते, जी मोठ्यांच्या दृष्टीने खोड असते. प्रत्येक हालचालीतून, वस्तूतून काहीतरी शोधण्याचा म्हणजेच शिकण्याचा मुलाचा प्रयत्न असतो. त्याला अनुभव घ्यायचा असतो. त्यातून त्याचे शिक्षण होते. म्हणून मेंदू आधारित आणि अनुभव देऊ शकणार्‍या अशा विविध कृती तो/ती करतो ते. आणि या सगळ्या कृती बहुतांश पालक आणि शिक्षकांच्या तक्रारीचा विषय ठरतात. यासाठीच ‘बाल’, ‘शिक्षण’ आणि ‘बालशिक्षण’ यांचा विचार पद्धतशीरपणे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून होणे गरजेचे.
हालचाली आणि खेळ ही मुलांच्या शिक्षणाची साधने आहेत. म्हणून त्यांना भरपूर हालचाल करता यावी अशी मोकळी जागा, आणि त्यांच्या मेंदूला शिकण्याची भूक भागवता येईल अशा प्रकारचे विविध खेळ यांची व्यवस्था बालशिक्षणात अभिप्रेत आहे. त्यांच्या हालचालींवर निर्बंध घालणे म्हणजे त्यांच्या विकासात बाधा आणणे ठरेल. सतत ‘नाही, नको, नव्हे’, अशी नकारघंटा वाजवत राहिल्याने मेंदूघडणीत ‘न-ना’चा पाढा पक्का होईल. त्यातूनच नाकर्तेपणा, निष्क्रीयता, नीरसता असा प्रवास होईल, जो व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र अशा सर्वांनाच घातक ठरेल.
आज बालशाळांतून शिस्तीच्या नावाने ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ हा प्रकार चालतो. आधुनिकतेच्या नावाने टाय आणि बूट, बाक, खुर्ची, टेबल आणि शिकवण्यासाठी चित्रवाणी संच, संगणक असा सारा थाटमाट असतो. यातून मूल शिकते काय? गप्प बसणे, हालचाल न करणे, मनात येते ते व्यक्त न करणे, म्हणजेच मेंदूला काम नसणे; असेलच तर : ‘हे मोठे असे का वागतात, यांना टाळायचे वा चकवायचे कसे, यातून सुटका कशी होईल, खेळायला कधी मिळेल, शाळा कधी सुटेल’ हा विचारच जास्त! यात मुलाची काय चूक? आपण मोठे करतो ते चुकीचे आहे, हे अनेक अभ्यासांती सिद्ध झाले आहे. यासाठीच ‘मूल शिकते कसे?’ याचा अभ्यास आवश्यक ठरतो.
मूल स्वत: शिकते ते आपल्या गतीने आणि आपल्या पद्धतीने! त्याला त्याच्या आवडीच्या संधी देणे हे मोठ्यांचे काम. यासाठीच सहा वर्षे वयापर्यंत मुलाला सतत आणि विविध, विधायक आणि सृजनात्मक अनुभव घेता यावेत यासाठी पालक आणि बालविकासकेंद्रातील ताई-दीदी, मावशी यांच्याकडून प्रयत्न व्हायला हवेत. मुलाच्या व्यक्त होण्याच्या विविध प्रकारात बोलणे, गाणे, नाचणे, खेळणे, रेखाटणे यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सभोवतीचे ऐकणे-बघणे घडत जाते. त्याचे अनुकरण होणारच. म्हणून मुलाला ऐकायला आणि बघायला चांगले, सुंदर, आकर्षक, वेधक-तितकेच विचारप्रवृत्त करणारे, नवनवीन – काही देण्याचा प्रयत्न मोठ्यांकडून जाणीवपूर्वक होणे महत्त्वाचे. त्याचबरोबर मुलांचे बोलणे, हसणे-खिदळणे, नाचणे-बागडणे, रेखाटणे या सार्‍या कृतींना मोकळीक हवी.
बहुविध बुद्धिमत्तेचा विचार आपल्याला नवीन आहे. पण तो समजून घेतला तरच बालशिक्षणाची दिशा सुनिश्‍चित होईल. बुद्धिमत्ता म्हणजे केवळ लेखन-वाचन-गणन-भाषण कौशल्यच नव्हे. व्यक्तीगणिक बुद्धिमत्तेचे रूप वेगळे असते. आजवर आठ-दहा प्रकारच्या बुद्धिमत्तांचा अभ्यास झाला असून प्रत्येकाचा बुद्धिमत्तापट समजून घेता येतो हे स्पष्ट झाले आहे. यासाठी मूल स्वत: शिकते, त्याला शिकायची संधी देत देत मोठ्यांनी ‘प्रत्येक मूल शिकणे’ हे आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. मेंदूला शिकणे हा सुखद अनुभव वाटला तरच मुलाचे शिक्षण आवडीने होईल. मुलाच्या नैसर्गिक बुद्धिमत्तेनुसार त्याला शिकता आले तर त्याची वाढ आणि विकास निकोप आणि निर्दोष होतील. जीवन समाधानी आणि वृत्ती प्रसन्न होण्यासाठी असे आवडीचे आणि आनंददायी शिक्षण हाच मार्ग आहे. आणि बालजीवनात ‘आनंददायी शिक्षण’ ही बालकाची केवळ गरज नव्हे, तर आजच्या युगात तो त्याचा हक्क आहे.
आनंददायी बालशिक्षणाचे प्रयोग भारतात पूर्ण विसाव्या शतकात गिजुभाई बधेका, ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी गुजरात आणि महाराष्ट्रात केले. त्यांच्या नूतन बालशिक्षण संघाचे काम अविरतपणे चालू आहे. गेली दोन दशके बालशिक्षणाचा जागर महाराष्ट्रभर महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या रूपात चालू आहे. त्यातून प्रेरणा घेऊन गोव्यात गेली सात वर्षे गोमंतक बालशिक्षण परिषद कार्यरत आहे. या दोन्ही बालशिक्षण परिषदांचे संयुक्त अधिवेशन आज आणि उद्या साखळी येथील रवींद्र भवन परिसरात भरत आहे. सुमारे दीड हजार प्रतिनिधींची उपस्थिती लक्षात घेऊन व्यवस्था करण्याचा प्रयत्न आयोजकांनी केला आहे. महाराष्ट्रातून सुमारे तीनशे प्रतिनिधी अपेक्षित आहेत.
बालपण सुखाचे होण्यासाठी त्या काळातील अनुभव विविध आणि आनंददायी हवेत. आजकालच्या मुलांच्या वाट्याला दोन-अडीच-तीन या वयात घर सोडून परक्या जागी तीन वा पाच तास, काही बाबतीत पूर्ण दिवसही, आई-वडिलांविना घालवण्याची परिस्थिती आली आहे. नोकरी-उद्योग करणार्‍या पालकांना आपल्या मुलांसाठी वेळ आणि प्रेम देणेच कठीण झाल्याने त्यांची परपाई पैसे आणि वस्तूंनी करणे त्यांना सोयीचे वाटते. त्यातून एकच मूल असेल तर आपले वैभव, प्रतिष्ठा, प्रतिमा आणि महत्त्वाकांक्षा यांचे ओझे त्याच्या डोक्या-खांद्यावर ठेवून त्याचे बालपण हिरावण्याचा प्रमाद नकळत घडणे सार्वत्रिक झाले आहे. या उलट ‘एकेरी पालकत्व’ हा प्रकारही वाढत आहे. सामाजिक, शारीरिक सुरक्षेचे प्रश्‍न जटिल बनत आहेत. आत्मविश्‍वास, स्वयंनिर्णय, आत्मनिर्भरता, सहकारिता यांचेही प्रशिक्षण आता अनिवार्य ठरते.
अशा स्थितीत बालशाळा म्हणजे बालविकास केंद्रे या प्रश्‍नांना किती जाणीवपूर्वक भिडतात, ही आव्हाने किती समर्थपणे पेलतात, मुलांचे बालपण जपण्यासाठी किती कसोशीने प्रयत्न करतात, आनंदाचे – उल्हासाचे – उत्साहाचे वातावरण बालशाळेत निर्माण करून वाढवण्याचे कोणते मार्ग काढतात यावर केवळ त्या मुलांचे नव्हे तर या समाजाचे आणि देशाचे भवितव्य ठरणार आहे.
आनंददायी शिक्षणासाठी अंगणवाडी, बालवाडी, नर्सरी, किंडरगार्डन, प्ले-स्कूल यांपैकी कोणतेही नाव असले तरी त्यामागील विचार आणि व्यवहार यात एकसूत्र हवे, ते पक्के करण्यासाठी एक संघटित व्यासपीठ हवे. तशी संधी या संयुक्त अधिवेशनाने निर्माण केली आहे. आपल्या मुलांसाठी हा शनिवार-रविवार पालक-शिक्षक देतील अशी खात्री आहे. त्यांच्या प्रयत्नांनीच बालशिक्षणाचा अश्वमेध प्रस्थान ठेवणार आहे.
………..