बार्देश, सासष्टीला वादळी वार्‍याचा तडाखा

0
141

वादळी वार्‍यामुळे काल बार्देश आणि सासष्टी तालुक्यात झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बार्देश तालुक्यात वार्‍याच्या तडाख्यात सुमारे २ लाखांपेक्षा नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. सासष्टी तालुक्यात रावणफोंड येथे घरावर वृक्ष पडल्याने कार व घराची हानी झाली.

बार्देश तालुक्यात नादोडा येथील लक्ष्मण मांद्रेकर यांच्या घरावर सकाळी माड पडून १० हजारांचे नुकसान झाले. दुपारी ३ च्या दरम्यान नादोडा येथील कॉर्पोरेशन बँकेजवळ गेटवर माड पडला. मधलावाडा, शिवोली येथे एका बंद घरावर आंब्याचे झाड पडून सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले. सदर दुर्घटना दुपारी १२.३० वाजता झाली. ओशेल, शिवोली येथे संध्याकाळी ४.३० वा. कुंपण व रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळले. तर म्हापसा येथील फुटबॉल मैदानावर झाड पडून विजेचे खांब मोडले. यामुळे वीजतांरा तुटून नुकसान झाले. रावणफोंड येथे वृक्ष कोसळून सर्जिओ मोंतेरो यांच्या घरावर व कारवर पडल्याने ५० हजारांचे नुकसान झाले. माहिती मिळताच अग्निशमन दलाने घरावर व कारवर पडलेल्या झाडाच्या फांद्या कापून घराचा भाग मोकळा केेला.