बारावीचा निकाल २६ जून रोजी

0
168

गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवार २६ जून रोजी संध्याकाळी ५ वा. जाहीर केला जाणार असून ७ जुलैपासून विद्यालयात गुणपत्रिका उपलब्ध असतील, अशी माहिती मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी काल दिली.

येत्या २९ जून २०२० रोजी विद्यार्थ्यांची निकालपत्रे संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात ईमेलच्या माध्यमातून पाठविण्यात येणार आहेत. ७ जुलै पासून गुणपत्रिका विद्यालयात उपलब्ध करण्यात येणार आहेत. मंडळाच्या वेबसाइटवर निकाल उपलब्ध केला जाणार आहे, अशी माहिती शेट्ये यांनी दिली.

बारावीची परीक्षा १७ केंद्रातून घेण्यात आली. या परीक्षेला २६ फेब्रुवारीपासून प्रारंभ झाला होता. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर तीन विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. सदर परीक्षा २० ते २२ मे २०२० दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेला एकूण १८,१२१ विद्यार्थी बसले आहेत. त्यात ८८०४ मुलगे आणि ९३१७ मुलींचा समावेश आहे. कला शाखेतून ४५१९, वाणिज्य शाखेतून ५५८२, विज्ञान शाखेतून ५०१७ आणि व्यावसायिक शाखेतून २९१३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. गतवर्षी २०१९ मध्ये बारावीच्या परीक्षेला १६९५२ विद्यार्थी बसले होते. गतवर्षी बारावीचा निकाल ८९.५९ टक्के एवढा लागला होता, अशी माहिती सचिव शेट्ये यांनी दिली.