बारबंदी : तालुकास्तरीय समित्या २८ पर्यंत अहवाल देणार

0
62

>> समित्यांवर विविध सरकारी प्रतिनिधी

 

राष्ट्रीय व राज्य महामार्गंपासून ५००मीटरच्या अंतरावर असलेली राज्यातील दारूची सर्व दुकाने बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर ५०० मीटरांच्या आत असलेली दुकाने शोधून काढण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्थापन करण्यात आलेल्या समित्यांनी १५ फेब्रुवारीपासून हे काम सुरू केल्याची माहिती अबकारी आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी काल दिली.
या समित्यांना येत्या २८ पर्यंत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली असल्याचे डिसोझा म्हणाले. या समित्यांवर भूसर्वेक्षण खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, अबकारी खाते, पोलीस खाते, महसूल खाते आदी खात्यातील प्रतिनिधी असल्याचे ते म्हणाले.
आपापल्या तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांपासून ५०० मीटरपर्यंतच्या अंतरावर असलेल्या दारूच्या दुकानांची यादी तयार करून ती सदर समितीला अबकारी खात्याकडे सुपूर्द करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे, असे डिसोझा म्हणाले.
येत्या ३१ मार्चनंतर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांपासून ५०० मीटरपर्यंतच्या अंतरावर जी दारूची दुकाने आहेत त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे.