बायबल आणि त्यातील ईश्वरी अस्तित्व कथन

0
245

– लुईस भालेराव, सोलापूर
येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये स्वतःचे अस्तित्व कथन केले आहे. तो म्हणतो ‘‘मी आहे.’’
नुकतेच पोपने विश्वनिर्मात्याबद्दल खोडसाळपणाचे विधान केले. जर सोन्याला चिखलात फेकले, तरी त्याचा दर्जा कमी होत नाही. ते सोनेच असते. तसेच बायबलचे आहे. विश्वाची निर्मिती परमेश्वरानेच केली असे बायबलमध्ये लिहिले आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वास्तूचा कोणीतरी निर्माता असतो, त्याचप्रमाणे या प्रचंड विश्वाचा कोणीतरी निर्माता आहे. हे निर्विवाद आहे. विश्वाच्या निर्मात्याने त्याच्या निर्मितीचे वॉरंटी कार्ड म्हणून बायबल प्रकाशित केले आहे. या बायबलला ‘देवाचा शब्द’ म्हणतात. म्हणून पोपच्या विज्ञान समर्थक विधानामुळे बायबल खोटे ठरत नाही किंवा सोन्याला पितळ म्हटले तरी ते सोनेच असते.प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता, सर्व काही (विश्वाची, स्वर्गाची उत्पत्ती) त्याच्याद्वारे झाले. त्याच्या ठायी जीवन होते. शब्द देही झाला. त्याने इस्राएलमध्ये वस्ती केली.
प्रभू येशूला बायबलमध्ये ‘देवाच्या शब्दा’ची उपमा देण्यात आली आहे, किंवा त्याचे वास्तव स्वरूप वाचकांसमोर प्रकट करण्यात आले आहे. ग्रीक भाषेत शब्दाला बिबलॉस म्हणतात. यावरूनच त्याचे ‘बायबल’ असे नामकरण करण्यात आले आहे. त्याला अनुक्रमे जुना करार व नवा करार असे म्हणतात. जुन्या करारात एकूण चाळीस व नव्या करारात सत्तावीस पुस्तके आहेत. जुना करार हिब्रु व नवा करार ग्रीक (लॅटिन) भाषेत लिहिला गेला. बायबलचे मूळ लिखाण हे ताम्रपत्रांपासून तयार केलेल्या गुंडाळ्यांवर लिहिले आहे. त्यापैकी शेकडो प्रती इस्राएलमध्ये केलेल्या उत्खननात सापडल्या आहेत. त्यांना ‘‘डेड सी स्क्रोल्स’’ असे म्हणतात.
मूळ हिब्रू व लॅटिन भाषेतील बायबलचे, इंग्रजी भाषेत भाषांतर करून इंग्रजी बायबल, किंग जेम्सने १६११ मध्ये इंग्लंडमध्ये प्रकाशित केले.
भारतात आलेले मिशनरी ‘विल्यम केरी’ यांनी अनेक भारतीय भाषांत बायबल प्रकाशित केले होते. पंडिता रमाबाई या ख्रिस्त शिष्येने, मूळ हिब्रू व लॅटिन भाषेतील बायबल वाचून मराठी बायबल प्रकाशित केले. मानव सज्ञानी व चाणाक्ष असल्यामुळे त्याला सत्य-असत्य, बरे – वाईट यामधील फरक समजला आहे. साहजिकच बायबलच्या सत्यतेबद्दल त्याच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण होऊ शकतात, अशी शक्यता गृहित धरून, बायबल सत्य असल्याचे अनेक पुरावे जतन करून ठेवले गेले आहेत. मानवांना हे पुरावे दाखविताना परमेश्वराला कसलाही कमीपणा वाटत नाही, याचे कारण मानवावर असलेली त्याची निस्सीम प्रीती. ते पुरावे पुढीलप्रमाणे ः-
पहिला सिद्धान्त ः
(विश्व सृष्टी) परमेश्वराने निर्माण केलेले विश्व हे मानवांना दिसते. बायबल सांगते की, परमेश्वराने स्वतःच्या शब्दाने हे विश्व उत्पन्न केले.
दुसरा सिद्धान्त ः
(मानवांचा मृत्यू) आदिमानवाने आज्ञाभंग केल्यामुळे त्याला मृत्यूचा शाप मिळाला. म्हणून त्याच्या वंशजांनाही मरण प्राप्त होते. त्यामुळे जन्मणारा प्रत्येक जण मरतो.
तिसरा सिद्धान्त ः
(मानवाची उत्पत्ती माकडापासून नाही तर मातीपासून आहे.) मानव बुद्धिमान असल्यामुळे आणि वैद्यकीय प्रगतीमुळे त्याला स्वतःच्या शरीरातील सर्व मूल्यद्रव्यांची माहिती झाली. ती सर्व मूलद्रव्ये मातीमध्ये आढळतात. बायबल सांगते की परमेश्वराने मानवाला मातीपासून तयार केले.
चौथा सिद्धान्त ः
(सप्तरंगी धनुष्य) जेव्हा पृथ्वीवर लोकसंख्या वाढू लागली, तेव्हा मानवांच्या अनैतिकतेमध्येही लक्षवेधी वाढ होऊ लागली. त्यामुळे मानवाला निर्माण केल्याचा परमेश्वराला पस्तावा झाला. तेव्हा त्याने ही दूषित मानवजात नष्ट करण्यासाठी चाळीस दिवस व रात्र प्रचंड पाऊस पाडला, परंतु नोहा नावाच्या देवभक्त असलेल्या मनुष्याला त्याच्या कुटुंबासहित व सर्व प्राणी पक्ष्यांच्या एक-एक जोड्यासहित तारवामध्ये वाचवले. जेव्हा पाऊस थांबला, पाणी ओसरले, तेव्हा परमेश्‍वराने नोहाबरोबर करार केला की मी पुन्हा जीवसृष्टीचा पाण्याने नाश करणार नाही. या कराराचे प्रतीक व चिन्ह म्हणून मी ढगामध्ये सप्तरंगी धनुष्य ठेवीन, दाखवीन. म्हणून पावसाळ्यात सप्तरंगी मेघधनुष्य दिसते, असे बायबल सांगते.
पाचवा सिद्धान्त ः
(जगात बोलल्या जाणार्‍या सात हजार भाषा) परमेश्‍वराला येशूची जन्मभूमी म्हणून इस्राएल राष्ट्राची निर्मिती करायची होती. म्हणून पृथ्वीवर मानवांचे स्थलांतर होणे आवश्यक होते. कारण नोहाचे वंशज एकाच ठिकाणी वस्ती करून करून राहत होते. त्यांची भाषाही एकच होती. म्हणून तेव्हा परमेश्‍वराने मानवांच्या भाषेचा घोटाळा केला आणि हजारो भाषा उत्पन्न केल्या. तेव्हा समभाषिक लोक एकत्र राहू लागले. त्यामुळे अनेक राष्ट्रे तेव्हा मातृभाषेप्रमाणे अस्तित्वात आली. आज जगातील विविध भाषिक राष्ट्रे पाहता, परमेश्वराने भाषाभिन्नता ठेवली, हे बायबलचे कथन आहे.
सहावा सिद्धान्त ः
(इस्राएलची निर्मिती) तेव्हा भाषेप्रमाणे अनेक राष्ट्रे अस्तित्वात आल्यावर, ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये मुख्य नायकाचा लक्षवेधी प्रवेश होतो. अगदी तशाच प्रकारे पृथ्वीच्या रजतपटावर इस्राएलचा प्रवेश झाला. तेव्हा तांबडा समुद्र त्याच्यापुढे दुभंगला, जॉर्डन नदी मागे हटली, जेरिकोचा चिरेबंदी तट आपोआप कोसळला. सूर्य-चंद्र काही काळ थांबले, किंवा पृथ्वी फिरण्याची काही काळ थांबली व तिरपी झाली. आजही हा नायक अनेक खलनायकांना ठोशे देताना दिसतोय.
सातवा सिद्धान्त ः
(विविध भाषिक ख्रिस्ती राष्ट्रे) येशू मृतामधून पुन्हा जिवंत झाल्यावर त्याने शिष्यांना दर्शन दिले आणि सर्व जगात जाऊन त्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी त्यांना आज्ञा केली, परंतु शिष्यांना जगातील विविध भाषांचा अडथळा होऊ नये म्हणून त्याने शिष्यांना अनेक भाषा बोलण्याचे वरदान दिले. म्हणून जगातील विविध भाषिक राष्ट्रांत वैविध्य आढळते..
आठवा सिद्धान्त ः
(इस्राएलची पुनर्स्थापना) तब्बल दोन हजार वर्षं परागंदा झालेले यहुदी पुन्हा एकत्र येऊन इस्राएलची पुनर्स्थापना करतील हे बायबलचे भविष्य १९४८ मध्ये खरे ठरले. इस्राएल स्वतंत्र राष्ट्र म्हणून पुन्हा अस्तित्वात आला. त्याचे नाव ‘इस्राएल’ हेच ठेवण्यात आले. यहुदी लोक तीन हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये (मिसर) चारशे तीस वर्ष गुलामीत होते. तेव्हा त्यांनी बांधलेल्या पिरॅमिडचे भग्नावशेष आजही अस्तित्वात आहेत. तसेच ते इराक (बाबीलोन) व इराण (पर्शिया)मध्ये सत्तर वर्षे गुलामीत होते. तेव्हा हे दोन राष्ट्रांचे एकच विशाल राष्ट्र होते. तेव्हा यहुद्यांनी झुलते बगीचे व बाबीलोन शहर बांधले व इराणमधील ‘शुशन’ राजवाडा बांधला. हे सर्व अजूनही अस्तित्वात आहे. यावरून तेव्हा यहुदी गुलामीत होते हे बायबलचे कथन खरे आहे हे सिद्ध होते. जेव्हा त्याने इस्राएलचा संदेष्टा मोझेसला दर्शन दिले व म्हटले आहे ‘मी आहे’.