बायणा समुद्रात मच्छिमार बुडाला

0
79

खोल समुद्रात मासेमारी करून काल सकाळी ९ वा. परतत असताना काटे बायणा येथे समुद्र किनार्‍यालगत अवघ्या २० मीटर अंतरावर समुद्री लाटांच्या तडाख्यात सापडलेल्या एका डिंगी मच्छिमारी नौकेवरील नऊ पैकी दोघे पाण्यात फेकले गेले. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आले. मात्र श्रीकांत यादव (वय २५) हा मच्छिमार बेपत्ता झाला.
प्राप्त माहितीनुसार काल पहाटे ६ वाजता नागा तांडेल हे आपली डिंगी व मच्छिमारी साहित्य घेऊन काटे बायणा येथून खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेले. यावेळी डिंगी मालक नागा तांडेल यांच्या समवेत आणखी नऊ मच्छिमारी कामगार होते. दरम्यान सकाळी ९ वा. च्या दरम्यान सदर डिंगी मासेमारी करून परतत असताना समुद्र किनार्‍यावर पोचण्यास अवघ्या २० मिटरचे अंतर असताना अचानक खवळलेल्या समुद्राच्या लाटा या डिंगीला आदळल्या असता या डिंगीत असलेल्या नऊ मच्छिमार्‍यांपैकी दोघे जण पाण्यात फेकले गेले.
हा प्रकार घडताच या डिंगीवरील अन्य मच्छिमार्‍यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यात एकजण म्हणजे या डिंगी मालकाचा भाऊ त्यांच्या हाताला लागला. त्याला लागलीच वर काढले. तर श्रीकांत यादव हा प्रवाहात नाहीसा झाला. यावेळी समुद्र किनार्‍यावरील अन्य मच्छिमार्‍यांना तसेच दृष्टी जीवरक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी शोध कार्य सुरू केले. संध्याकाळी उशिरापर्यंत दृष्टी, गोवा सागरी पोलीस तसेच कोस्ट गार्डच्या शोध पथक शोधकार्यात मग्न होते. पण उशिरा पर्यंत तरी त्याचा पत्ता लागला नव्हता.