बायंगिणीत दुर्गंधीमुक्त कचरा प्रकल्प

0
137

>> मंत्री मायकल लोबो यांचे विधानसभेत आश्‍वासन

>> २५० टन क्षमतेचा अत्याधुनिक प्रकल्प

बायंगिणी, ओल्ड गोवा येथील जागेत कचर्‍यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करणारा २५० टन क्षमतेचा अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या कचरा प्रकल्पातून विजेची निर्मिती केली जाणार आहे. या कचरा प्रकल्पामुळे स्थानिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही. दोन वर्षांत प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी काल विधानसभेत दिली. कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या लक्षवेधी सूचनेला मंत्री लोबो यांनी वरील उत्तर दिले.

विधानसभेत आमदार मडकईकर यांची नियोजित कचरा प्रकल्पाबाबतची लक्षवेधी सूचना आमदार दयानंद सोपटे यांनी मांडली. बायंगिणी येथील कचरा प्रकल्पाजवळील जागेत निवासी व व्यावसायिक आस्थापने सुरू करण्यात आली आहेत. ओल्ड गोव्याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा लाभलेला आहे. त्यामुळे सरकारने कचरा प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी कोणती उपाययोजना केली आहे, अशी विचारणा आमदार मडकईकर यांनी केली होती.

साळगावच्या धर्तीवर प्रकल्प
साळगावच्या धर्तीवर बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. तिसवाडीतील पाच मतदारसंघात कचर्‍याची समस्या निर्माण झालेली आहे. या ठिकाणी तिसवाडी तालुक्यातील पाच मतदारसंघांतील सर्व प्रकारच्या कचर्‍यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पाच्या आसपास स्थानिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही, असे मंत्री लोबो यांनी स्पष्ट केले.

दुर्गंधीमुक्त प्रकल्पाची ग्वाही
पणजी महानगरपालिकेने बायंगिणी येथे कचरा प्रकल्पासाठी २००८ मध्ये जमीन संपादित केली आहे. त्यानंतर सदर जागेला नगरनियोजन खात्याकडून मान्यता घेण्यात आली. सदर जागेच्या आसपास बङ्गर झोन जाहीर करण्यासाठी वर्ष २०१० मध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु, सरकारने प्रकल्पाच्या आसपास बांधकाम बंदीबाबत गंभीरपणे निर्णय घेतला नाही. २०११ च्या प्रादेशिक आराखड्यात बायंगिणी येथील जागा ही कचरा व्यवस्थापन जागा म्हणून नोंदणी करण्यात आली आहे. लोकवस्तीपासून प्रकल्पाची जागा २५० मीटर दूर आहे. प्रकल्पाची जागा पूर्णपणे बांधून काढण्यात येणार आहे. त्यामुळे लोकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागणार नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून कचरा प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

कुंडईत जैव वैद्यकीय
कचरा प्रक्रिया प्रकल्प
सरकारने विविध प्रकारच्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला असून कुंडई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये अंदाजे १२ कोटी रुपये खर्चून जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. घातक औद्योगिक आणि जुन्या बांधकाम साहित्याच्या विल्हेवाटीसाठी जागांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांनी काल दिली. विज्ञान व तंत्रज्ञान, बंदर कप्तान आणि ग्रामीण विकास खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला त्यांनी वरील उत्तर दिले. कुंडई येथील औद्योगिक वसाहतीमध्ये १० हजार चौरस मीटर जागेत जैव वैद्यकीय प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. जैव वैद्यकीय कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी इन्सिनरेटर बसविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सीएसआरच्या माध्यमातून साडेचार कोटींची मदत मिळणार आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

रस्त्याच्या बाजूला उघड्यावर कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी कायदा करण्याची गरज आहे. पर्यावरण खात्याने याबाबत कायदा तयार करावा, असे मंत्री लोबो यांनी सांगितले.

काकोडा येथील नियोजित कचरा प्रकल्पासाठी नार्बाडने २०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. सोनसडो येथील कचरा डंपची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी विदेशी तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे, असेही मंत्री लोबो यांनी सांगितले.

फेरविचार करा : विरोधक
ओल्ड गोव्याचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश होतो. तसेच कचरा प्रकल्पाच्या जागेच्या आसपास निवासी घरे, विद्यालय, आस्थापने उभारण्यात आलेली असल्याने तेथे कचरा प्रकल्पावर ङ्गेरविचार करण्याची मागणी विरोधी पक्षातील सदस्यांनी केली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार सुदिन ढवळीकर, लुईझीन ङ्गालेरो, चर्चील आलेमाव यांनी चर्चेत सहभाग घेतला.