बायंगिणीत कचरा प्रकल्पासाठी लवकरच जमीन : महापौर

0
130

बायंगिणी येथे कचरा प्रक्रीया प्रकल्प उभारण्यासाठी पणजी महापालिकेच्या मालकीची जी जमीन घनकचरा व्यवस्थापन महामंडळाला हवी आहे ती महापालिका लवकरच ह्या महामंडळाकडे हस्तांतरीत करणार असल्याचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी काल सांगितले. या संदर्भात येत्या एक-दोन दिवसात महापालिका आयुक्त घनकचरा व्यवस्थापन महामंडळाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे फुर्तादो यांनी काल ह्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी पणजी महापालिकेने आपल्या मालकीची जमीन घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे हस्तांतरीत करावी, अशी मागणी सरकारने केले आहे. सुरुवातीला महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी महापालिका आपल्या मालकीची जागा घनकचरा व्यवस्थापन महामंडळाकडे हस्तांतरीत करणार नाही अशी भूमिका घेतली होती. सरकारने कचरा प्रकल्प उभारावा, मात्र जमिनीची मालकी आपल्याकडेच रहायला हवी, अशी भूमिका फुर्तादो व त्यांच्या सहकारी नगरसेवकानी मंडळाच्या बैठकीतून घेतली होती. मात्र, सरकारकडून जमीन हस्तांतरीत करण्यासाठी दबाव आल्यानंतर दुसर्‍या दिवशी घेतलेल्या मंडळ बैठकीत महापालिकेने काही अटींसह जमीन हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यासाठीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याचे फुर्तादो यांनी स्पष्ट केले.