बाबू कवळेकर यांच्या जामिनावर उद्या निवाडा

0
206

>> मटका स्लिप्स प्रकरण

विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या बेतूल येथील घरात नऊ हजारांपेक्षा जास्त मटका जुगाराच्या स्लिप्स सापडल्या आहेत. बाबू कवळेकर व बाबल कवळेकर यांच्या घराचा प्राकार एकच असून बाबू कवळेकर यांचा हात आहे की नाही याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवणे आवश्यक आहे, असा युक्तीवाद पोलीस गुन्हा अन्वेषण विभागाचे वकील एल. एम. फर्नांडिस यांनी काल जिल्हा व सत्र न्यायालयात केला. काल दोन्ही पक्षकारांच्या वतीने वकीलांनी बाबू कवळेकर यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद केल्यानंतर शुक्रवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी निवाडा देण्याचे न्यायालयाने जाहीर केले. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश बा. पी. देशपांडे यांच्या न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी कवळेकर यांनी अर्ज केला होता.

बाबू कवळेकर यांच्या घरात मटक्याचे साहित्य सापडले आहे. त्याचे धागेदोरे महाराष्ट्रात आहेत की गोव्यात आहे याचा तपास करावयाचा आहे. तसेच बाबू कवळेकर यांची बेहिशेबी करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचे दिसून आले असून फार मोठा गुन्हा त्यांनी केलेला असल्याने सखोल तपासणी करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यक आहे. शिवाय दोघेही पोलिसांना तपासात सहकार्य करीत नाहीत असा युक्तीवाद ऍड. फर्नांडिस यांनी केला.

बाबू कवळेकर यांच्या वतीने युक्तीवाद करताना ऍड. सुरेंद्र देसाई यांनी सांगितले की, पोलिसांनी ज्या कलामांखाली गुन्हा नोंदविला आहे ती सर्व जामीनपात्र आहेत. एकच कलम जे लावले आहे ते या गुन्ह्याशी संबंधित नाही. शिवाय आपल्या अशिलाने वेळोवेळी तपास कार्यात सहकार्य केल्याने त्यांना पोलीस कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा असा युक्तीवाद केला.
बाबू यांचे बंधू बाबल कवळेकर यांच्यावतीने ऍड. राजीव गोम्स यांनी युक्तीवाद केला. दि. १६ सप्टेंबर रोजी धाड घातल्यानंतर सील लगावले होते. दि. १९ रोजी सील उघडताच मटका कागदपत्रे सापडल्याचे पोलिसांनी सांगितले. ते साहित्य तीन दिवसांत कोणी ठेवले हे सिद्ध झालेले नाही. शिवाय आपले अशील मडगाव येथे राहात असून, आठवड्यांतून एक दिवस तेथे जातात असा युक्तीवाद बाबल यांच्या वकीलांनी केला.