बाबूश, वाल्मिकी यांचे उमेदवारी अर्ज दाखल

0
211

गोवा विधानसभेच्या पणजी पोटनिवडणुकीसाठी कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात तसेच आपचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍याकडे काल दाखल केले.

पणजी पोट निवडणुकीसाठी १९ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी येथील चर्चमध्ये जाऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन श्रींचे दर्शन घेतले.
मोन्सेरात यांच्या समवेत विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे, आमदार रवी नाईक, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, आमदार आंन्तोनियो फर्नांडिस, आमदार नीळकंठ हर्ळणकर, आमदार विल्फेड डिसा, आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर व इतरांची उपस्थिती होती.

दरम्यान, आपचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनीही उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी आपचे राज्य समन्वयक एल्वीस गोम्स, डॉ. ऑस्कर रिबेलो यांची उपस्थिती होती.
पणजी मतदारसंघातील अनेक समस्या सोडविण्यात भाजपच्या नेत्यांना गेल्या कित्येक वर्षात यश प्राप्त झालेले नाही. नागरिकांना पाणी, कचरा, पार्किंग व इतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आम आदमी पार्टीकडून समस्या सोडविण्यावर भर दिला जाणार जाणार आहे, असे आपचे उमेदवार नाईक यांनी सांगितले.

बाबूश यांचा विजय निश्‍चित ः कॉंग्रेसचे
सरकार सत्तेवर येणार ः प्रतापसिंह राणे

पणजी शहराचा विकास आणि रोजगार हेच आपले प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत, असे कॉंग्रेसचे उमेदवार मोन्सेरात यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. पणजी पोट निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांच्या विजय निश्‍चित असून कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर येणार आहे, असा विश्‍वास कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार प्रतापसिंह राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

आपण निवडणूक रिंगणात उतरल्याने विरोधकांकडून आपल्या विरोधात मोठ्या प्रमाणात अपप्रचार केला जाणार आहे. आपल्या विरोधातील गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत. न्यायालयाकडून आपणाला योग्य न्याय मिळणार आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले. न्याय व्यवस्थेवर आपला विश्‍वास असल्याचे ते म्हणाले.

पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो, यतीन पारेख उमेदवारी अर्ज सादर करताना आपल्यासोबत का नाहीत? या प्रश्‍नावर बोलताना मोन्सेरात म्हणाले की, मतदानाला आणखी चोवीस दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कुणी काळजी करण्याचे कारण नाही. येणार्‍या दिवसात सर्व काही ठीक होईल, असा दावा मोन्सेरात यांनी केला.
पणजी मतदारसंघासाठी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. मागील वीस ते पंचवीस वर्षात पणजी विकासाच्या बाबतीत मागे आहे.

मतदारसंघातील युवा वर्ग रोजगाराच्या प्रतीक्षेत आहे, असेही मोन्सेरात यांनी सांगितले.
कॉंग्रेसचा मुख्यमंत्री कोण होणार याची काळजी करू नका, कॉंग्रेसचे सर्व आमदार मुख्यमंत्र्याची निवड करतील, असे आमदार रवी नाईक यांनी एका प्रश्‍नावर बोलताना सांगितले.