बाबूश यांचा नवा पक्षपसारा…

0
113

– गुरुदास सावळ
गोव्यात आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडणार आहे. ताळगाव-सम्राट बाबूश मोन्सेरात यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आल्याने नवा पक्ष काढण्याचा मनोदय त्यांनी जाहीर केला आहे. ‘बोले तैसा चाले’ अशी बाबूश यांची ख्याती असल्याने ते नवा पक्ष नक्कीच स्थापन करतील. बाबूश यांची राजकीय कारकीर्द नेहमीच वादग्रस्त राहिलेली आहे.
२००२ मध्ये त्यांनी प्रथम राजकारणात प्रवेश केला. सोमनाथ जुवारकर हे ताळगावचे आमदार असताना त्यांनी कॉंग्रेसकडे उमेदवारी मागितली. त्यासाठी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केले. सोमनाथ जुवारकर आमदार असल्याने बाबूश यांची डाळ शिजली नाही. कॉंग्रेसचे तिकीट मिळत नाही हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी यूजीडीपीकडे धाव घेतली आणि २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाले तेव्हा ते मंत्रीही बनले. पर्रीकर यांच्याशी बिनसल्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन कॉंग्रेसतर्फे २००५ मध्ये पोटनिवडणूक लढविली आणि विजयीही झाले. २००७ मध्ये त्यांनी आपली पत्नी श्रीमती जेनिफर मोन्सेरात यांना सांताक्रूझमधून कॉंग्रेस तिकीट मागितले. त्यांची ही मागणी कॉंग्रेसने नाकारल्याने त्यांनी परत यूजीडीपीकडे धाव घेतली. यूजीडीपीच्या नेत्यांनी लाज सोडून त्यांना परत पक्षात घेतले आणि बाबूश यांना ताळगाव व त्यांची पत्नी जेनिफरला सांताक्रूझमधून तिकीट दिले. दोन वर्षांपूर्वी यूजीडीपीचा त्याग करून कॉंग्रेसमध्ये जाणार्‍या बाबूश यांना यूजीडीपी नेत्यांनी तिकीट नाकारायला हवे होते. पण त्यांनी बाबूश आणि त्यांच्या पत्नीलाही तिकीट देऊन उपकृत केले. या तिकीट वाटपामागचे कारण जगजाहीर आहे.२००७ मध्ये बाबूश यूजीडीपीचे एकमेव आमदार होते. पक्षाचा आदेश धुडकावून ते कॉंग्रेस सरकारात मंत्री बनले. २०१२ च्या निवडणुकीत कॉंग्रेसनेही लाज सोडून त्यांना तिकीट दिलेच आणि बोनस म्हणून त्यांच्या पत्नीला ताळगावमध्ये तिकीट दिले. चर्चिल आलेमांव, रवी नाईक, आलेक्स सिकेरा अशा बड्या नेत्यांचे पानिपत झालेले असताना ताळगाव व सांताक्रूझमधून मात्र बाबूश पती-पत्नी आरामात निवडून आली. १० वर्षांत चारदा पक्ष बदलणार्‍या बाबूश यांच्या मनात स्वतःबद्दल अहंकाराची भावना निर्माण झाली आहे.
गोव्यात भाजपाची सत्ता असतानाही ताळगाव पंचायतीत बाबूश यांनी भाजपा समर्थक गटाचा पार धुव्वा उडविला. पणजी, ताळगाव व सांताक्रूझ या तीन मतदारसंघांत ‘मी करीन ती पूर्व दिशा’ असा गैरसमज बाबूश यांनी करून घेतला आहे. त्यामुळेच आमदारकीचा राजीनामा देऊन पणजीत पोटनिवडणूक लढविण्याची घोषणा त्यांनी केली. पणजीचे महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचे महापौरपद बाबूश यांच्या इच्छेवर अवलंबून असल्याने ते आपल्याला पाठिंबा देतील असे बाबूशना वाटले होते. मात्र ते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याने बाबूश यांचा नाईलाज झाला आणि निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली. कॉंग्रेस उमेदवारासाठी काम करणार नाही व भाजपासाठी काम करणार असे कॉंग्रेसश्रेष्ठी चेल्लाकुमार यांना मुर्दाडपणे सुनावण्याचे धैर्य त्यांनी दाखविले. धमकी देऊनच ते थांबले नाहीत तर प्रत्यक्ष त्यांच्याविरोधात काम केले. अर्थात त्यांनी फुर्तादोंसाठी काम केले असते तरी भाजपाचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकरच विजयी झाले असते.
मॉविन गुदिन्हो गेली तीन वर्षे भाजपाचे आमदार असल्याप्रमाणे वागत आहेत. त्यांच्याविरुद्ध कारवाई केली तर ते असंलग्न आमदार बनतील म्हणून कॉंग्रेस पक्ष त्यांच्याविरुद्ध कारवाई करत नव्हता. त्यामुळे आमदार बाबूश यांच्याविरुद्धही ते कारवाई करणार नाहीत असे वाटत होते. मात्र कॉंग्रेसने आता कारवाई करायला सुरुवात केली असून बाबूश यांची कॉंग्रेसमधून आजीवन हकालपट्टी करण्यात येणार आहे. अर्थात, एखाद्या नेत्याची आजीवन हकालपट्टी करण्याची कोणतीही तरतूद कॉंग्रेसच्या घटनेत नाही. त्यामुळे पक्षाचा विश्‍वासघात करून इतर पक्षात गेलेल्या असंख्य लोकांना पक्षात परत घेऊन मंत्रिपदे दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.
१९८९ मध्ये मॉविन गुदिन्हो, चर्चिल आलेमांव इत्यादींनी कॉंग्रेस फोडून प्रतापसिंह राणे यांचे सरकार निवडून आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांनी पाडले. चर्चिल आलेमांव यांनी किती वेळा पक्षत्याग केला आणि परत आले याची नोंद ठेवणेही कठीण होऊन बसले आहे. एक शांताराम नाईक सोडले तर बाकी सर्व कॉंग्रेसनेते हे ‘आयाराम गयाराम’च आहेत. सध्या राजकीय विजनवासात असलेले डॉ. विली डिसौझा यांनी तर किमान डझनवेळा बंड केले असणार. तृणमूल कॉंग्रेसचा आधार घेतल्यानंतर ते आपोआप राजकारणातून बाहेर फेकले गेले आहेत.
दीडशे वर्षांची परंपरा असलेला कॉंग्रेस पक्ष सध्या नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी १० वर्षे केंद्रात सरकारचे नेतृत्व केले, मात्र पक्षबांधणीत त्यांचा सहभाग नव्हता. श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे नेतृत्व पूर्णपणे अपयशी ठरले. भाजपाची जी घोडदौड चालू आहे ती पाहिल्यास कॉंग्रेसला नजीकच्या काळात भवितव्य दिसत नाही. देशातील अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चन धर्मीयांचा विश्‍वास संपादन करण्यात भाजपाने यश मिळविले तर पुढील १० वर्षे तरी नरेंद्र मोदींना कोणी हटवू शकणार नाही. दिल्लीत कॉंग्रेस कमकुवत असली तर गोव्यातील इतर आमदारही लुईझिन फालेरो किंवा प्रतापसिंह राणे यांना जुमानणार नाहीत. कॉंग्रेसचे इतर काही आमदार बाबूश यांच्याबरोबर गेले तर आश्‍चर्य वाटणार नाही. भाजपाला पाठिंबा देणारे नरेश सावळ व रोहन खंवटे हे अपक्ष आमदार सध्या मगोच्या वाटेवर आहेत. नरेश सावळ यांना भाजपात जाण्याची इच्छा होती, पण भाजपाची डिचोलीची उमेदवारी ठरलेली असल्याने सावळ यांना आता मगोशिवाय पर्याय नाही. पर्वरीत रोहन खंवटे यांना आज दोन्ही पर्याय खुले आहेत. भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा त्यांना विरोध असला तरी पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपाचे कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यात हयगय करणार नाहीत. मात्र बाबूश यांच्या स्थानिक पक्षात ते कदापि जाणार नाहीत.
दक्षिणेत चर्चिल आलेमांव सध्या नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहेत. गेली तीन वर्षे ते अधांतरी आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारांनी त्यांना झिडकारले. चर्चिलकन्या वालंकाचीही तीच गत झालेली आहे. लुईझिन फालेरो अध्यक्ष झाल्याने कॉंग्रेसचे द्वार त्यांना बंद झाले आहे. अशा परिस्थितीत यूजीडीपीचे पुनरुज्जीवन करण्याची तयारी त्यांनी चालविली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना एकही सक्षम उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांची मान्यता रद्द केली आहे. आता अनोंदणीकृत पक्ष म्हणूनच त्यांना काम करावे लागेल. गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मिकी पाशेको यांना नवा पक्ष काढायचा होता. मात्र नवा पक्ष काढणे आता बरेच जिकरीचे काम बनले आहे. त्यामुळे मिकींनी गोवा विकास पार्टी हा स्व. सीताराम फडते बांदोडकर यांचा पक्ष हायजॅक केला. बाबूश मोन्सेरात यांना नवा पक्ष काढायचा झाल्यास ते काम त्यांना कठीण नाही. नवा पक्ष काढण्यासाठी लागणारी सगळी यंत्रणा त्यांच्याकडे तयार आहे. हातात पैसा असला तर सगळ्या यंत्रणा पायाशी येतात, तशीच त्यांची परिस्थिती आहे. आगामी निवडणुकीस अजून दोन वर्षे असल्याने तोपर्यंत नवा पक्ष नोंद झालेला असेल.
बाबूश यांनी नवा पक्ष काढल्यास तो तीन मतदारसंघांपुरताच मर्यादित असेल. पणजी, ताळगाव व सांताक्रूझ या तीन मतदारसंघांत बाबूश यांचा जोर आहे हे मान्य करावेच लागेल. अर्थात या तिन्ही मतदारसंघांत तिरंगी लढत झाली तर भाजपाविरोधी मते बाबूश व कॉंग्रेस पक्ष अशी विभागली जातील. पणजी मतदारसंघात सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा तब्बल सहा हजार मतांनी विजय झालेला आहे. या दोन वर्षांत सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी मन लावून जनसेवा केली तर पणजीत त्यांना प्रचारही करावा लागणार नाही. जेनिफर मोन्सेरात यांना ताळगावात तिकीट दिले तर भाजपाचे उमेदवार दत्तप्रसाद नाईक यांचा विजय निश्‍चित आहे. सांताक्रूझमध्ये अनिल होबळे यांचे प्राबल्य वाढत आहे. कॉंग्रेस, भाजपा आणि बाबूश अशी तिरंगी लढत झाल्यास बाबूश यांची गच्छंती नक्की आहे. चर्चिल सांगतील ती पूर्व दिशा अशी परिस्थिती बाणावलीत होती. मात्र मिकी पाशेको यांनी त्यांचा पराभव केला. तीच गत बाबूश यांची व्हायला वेळ लागणार नाही. गेल्या तेरा वर्षांत चार-पाच वेळा पक्ष बदलूनही आपण निवडून आल्याने बाबूश यांच्या मनाला अहंकाराने ग्रासले आहे. या अहंकारामुळेच त्यांनी नवा पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. गोव्यात आज किमान सहा स्थानिक पक्ष आहेत. गेली अनेक वर्षे हे पक्ष आपापले उमेदवार उभे करीत आहेत. मात्र अनामत वाचविणेही त्यांना शक्य होत नाही. बाबूश यांच्या पक्षाची अशी गत होणार नाही, मात्र तिरंगी निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एकही उमेदवार यशस्वी होईल असे वाटत नाही. बाबूश यांनी खरोखरच नवा पक्ष काढला तर पणजीबरोबरच ताळगाव आणि सांताक्रूझ हे तिन्ही मतदारसंघ भाजपाच्या झोळीत पडू शकतात.