बाजार …

0
182

गौरी भालचंद्र कुलकर्णी (मालपे-पेडणे)

‘‘दानसुद्धा गुप्त असावं म्हणतात. पण काहीजण आपण देवाला किती दिलं याचा हिशेब जगाला सांगत फिरतात. अरेऽऽ हे सारं त्या परमेश्‍वराचंच आहे. त्याला आपण त्याने दिलेल्यातलेच काही दिले तर कसला आलाय मोठेपणा? करायचीच तर माणसातल्या देवाला मदत करावी… विना मोबदला..!’’ साहेब तळमळीने बोलत होते.

… आणि आजही शामू रंगू पानवाल्याच्या टपरीवर उभा राहून पेपर वाचीत होता. उन्हाच्या तिरीपी त्याच्या चेहर्‍यावर पडत होत्या. एक एक पान तो सावकाशीने परतत होता. इतक्यात एका बातमीकडे पाहात त्याने खिशातील पेनाने त्यावर सर्कल केले नि अचानक आपल्याच विचारात पुढे निघाला.

‘‘हे शामू… असो काय … पेपर दिय नासतानाच सो वाटेक लागलंय…’’ रंगू पानवाल्याने बसल्या जाग्यावरून उठत आवाज देत विचारलं.
‘‘आणून दितंय नंतर, खय घेवन जानय नाय … एक अर्जंट काम करूचा आसा…’’ असं आपल्याच नादात मोठ्याने बोलत तो लांब टांगा टाकीत घराच्या दिशेने निघाला.
‘‘दर वेळाक काय ना काय घोळ होता… अशान् मी फाटीच रवतलंय कायमचो… काय तरी करूक व्हया…’’ त्याच्या चेहर्‍यावर विचारातून उमटणारे सूक्ष्म बदल भिशे काकींच्या दृष्टीस पडले.
‘‘काय रे… इतको कसलो विचार धावताहा मनात..?’’
‘‘आगे ऽ ऽ तुका नाय कळूचा… आता मी कमवतो होतलंय … दरवेळाक तुका शेजार्‍यापाजार्‍यांचा ऐकूचा लागता. बिनकामाचो पोर म्हणान् … यापुढे तसा व्हवचा नाय … बग सांगतंय…’’ शामू तिच्याकडे पाहून खात्री देत बोलत होता.
‘‘काय सांगतसय… खय नोकरी बिकरी मेळयलंय का काय… कितको पगार आसा..?’’ पदर खांद्यावरून घेत भिशेकाकी मान वरती करून विचारीत होत्या.
‘‘आगे नाय गे… तू पण ना… अजून नाय मेळाक… पण आता वेळ लागूचो नाय… ह्या वेळाक मी पुरो तयारीन् जातलंय’’. शामू आत्मविश्‍वासाने बोलत होता.
‘‘शंबर एक इंटरवू दीलंय तुया… अजूनपतुर काय नाय… नि हेवेळेक असा काय होतला?’’ त्या चमत्कारीकपणे त्याला पाहून विचारत होत्या.
‘‘तू बघत रव फक्त… हा आणि बाबा खय आसत्?’’ इति शामू.
‘‘ते आसत मागल्या दाराक… नारळ फोडीत बसलेयत्’’. तिचे शब्द ऐकून तो भराभर घरात शिरत मागल्यादारी पोचला. भिशेकाकीही त्याच्या पाठोपाठ आत आल्या.’’
‘‘ओ बाबानू…! माका तुमची ती बँकेची पासबुका व्हयी होती.’’
शामूचे शब्द ऐकून त्यांचा नारळ फोडणारा हात थबकला…
‘‘कशाक…?’’ त्यांनी मान वरती करीत प्रश्‍न केला.
‘‘दीया तरी… मगे सांगतसय… तुमी पण ना बाबा..! मी काय खातलंय पैशे..? दामदुपटीनं परत करीन. व्याजासकट…’’ शामू बाबीकाकांच्या विस्फारलेल्या नजरेकडे पाहात उद्गारला.
‘‘लाकडी टेबलाच्या ड्राव्हरात आसत… घे.. जा..’’ असं म्हणत त्यांनी एक उसासा टाकीत आपला हात चालवायला सुरुवात केली.
शामूने धावतच बाहेरच्या खोलीत येत ड्राव्हर उघडून पासबूक मिळवले. भिशेकाकीही पुन्हा त्याच्या पुढ्यात येऊन उद्गारल्या…
‘‘पोरा ऽ ऽ ईचार काय आसा तुजोे..?’’ त्यांच्या मनात गोंधळ चालला होता.
‘‘सगळा तुका मगे सांगतसय… म्हाका एक कप चा करून हाड जा… माका लगोलग भायर जावचा आसा…’’ पासबूकावरील एन्ट्री तपासत शामूने सांगितले.
भिशेकाकी न बोलता स्वयंपाकखोलीत जायला वळल्या… ‘‘काय करताहा पोरगो जाणा कोण…’’ त्यांचे हे उद्गार शामूच्या कानावर पडले.
त्याने त्याकडे दुर्लक्ष करीत रंगू पानवाल्याकडून आणलेलं वर्तमानपत्र उघडलं. जाहिरातीचं पृष्ठ काढून आपण केलेल्या सर्कलवर पुन्हा एकदा नीट नजर फिरवली.
‘‘मीया क्रिष्णाकाकाकडे जावन येतसय…’’असं म्हणत तो पासबूकसकट बाहेर पडला.
‘‘अरे ऽ ऽ चा तरी पीयान जा…’’ भिशेकाकी चहाचा कप घेऊन बाहेर येत म्हणाल्या.
‘‘मगे ईल्यार पीतय… झाकून ठेव… आता घाईत आसय जरा…’’ असं बोलतच शामू घराच्या पांदणीतून बाहेर येत उजव्या बाजूला वळला.
दुपारची वेळ असल्याने बँकेत जोराची गर्दी होती. पासबूक हातात घेऊन शामू रांगेत उभा राहिला. भली मोठी रांग पाहून तो जाम कंटाळल्यागत झाला होता.
‘‘पैशे काढूचे आसत…’’ त्याचा नंबर येताच बाबीकाकांकडून चेकवर सही करून आणलेल्या कागदासकट पासबूक खिडकीतून आत सरकवीत तो उद्गारला, ‘‘किती करायचे आहेत..?’’ खिडकीच्या आतील माणसाने चष्मा सारखा करीत विचारले.
‘‘शंभर रुपये ठेवान बाकीचे सगळे काढतलंय.’’ शामूने त्याच्याकडे पाहात म्हटले.
‘‘पासस्ट हजार आहेत.. सगळे हवेयत ना..!’’ त्या साहेबांनी पुन्हा चष्म्याच्या कडांना नीट करीत विचारले.
‘‘होय… सगळे काढूचे आसत..’’ तो विचार करीत म्हणाला.
‘‘थोडावेळ बसा. नाव पुकारलं की या…’’ तो म्हणाला.
समोरच्या कोचावर बसत तो पैसे मिळण्याची वाट बघू लागला.
कायय करून यावेळात आपण मागे पडता नये. दर वेळाक नशीब मागे फिरयता. या जगाचे कायदेच येगळे आसत, त्याका ता तरी काय करतला..? खयय जा सगळीकडे फक्त पैशाक मेलेसत लोक! पदांचो लिलाव, चललोसा नुसतो..! बाजार मांडलोसा… देवळापासून काम मेळयपर्यंत सगळीकडे पैसो सरकवक व्हयो… काम होवक… पैसो नाय तो फाटी पडता… पैसो असलेलो लायकी नसानय फुढे सराकता… आपशीकच…’’ तो एकटाच बडबडत चालला होता.
हळुहळू आवाज वाढत होता. आजूबाजूला बसलेले, उभारलेले लोक त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहात होते.
‘‘अरे शामू, तू बँकेत सो…’’ क्रिष्णाकाकांचा आवाज ऐकून शामूने मान वर केली.
‘‘तुमच्याकडेच येणार होतो. बरं झालं इथेच भेटलात ते..! एक काम होतं तुमच्याकडे… जरा थांबा… हे काम झालं की जाऊया… थंडबिंड घेवया जरा…’’
शामू त्यांना चढवत मराठी शब्द जुळवत उद्गारला.
‘‘शामू भिसे ऽ ऽ..’’ नाव पुकारलं गेलं.
‘‘अरे जा लवकर… तुझं नाव पुकारताहेत…’’ क्रिष्णाकाका पाठीवर हात ठेवत म्हणाले.
पासस्ट हजाराची कॅश मोजून घेत त्याने ती नीट कापडी पिशवीत भरली. ‘‘इतके पैशे ऽ ऽ, लग्न बीग्न करतोय की काय!’’ क्रिष्णाकाकांनी पैशाच्या पिशवीला न्याहाळत विचारले.
‘‘नाही हो… तसं काही नाही… हे वेगळ्याच कामाक हवेहत…’’ असं म्हणत तो क्रिष्णाकाकांना घेऊन कोल्ड ड्रिंक हाऊसमध्ये पोचला.
‘‘तुमच्या ओळखीचे ते संस्थेचे अध्यक्ष आसत ना… त्यांना जरा कॉल करा… नि माझी मिटींग करून द्या त्यांच्याशी! बोलायचं होतं जरा..’’ असं म्हणत जाहिरातीबद्दल शामूने त्यांच्या कानावर घातलं.
‘‘अरे बाबा, मी शब्द टाकीन पण ठाम सांगू शकणार नाही. भेटतील का ते…’’ क्रिष्णाकाकांचं लक्ष पिशवीकडे लागलं होतं.
शामूच्या ते लक्षात यायला वेळ लागला नाही. त्याने पिशवीत हात घालीत शंभराची करकरीत नोट त्यांच्या पुढ्यात धरली.
‘‘अरे का नाही जमायचं…? तसं पण कठीण नाहीये… उद्या जाऊया…’’ त्याच्या हातातील शंभराची नोट खिशांत ठेवीत क्रिष्णाकाका उद्गारले.
घरी येऊन जेवणखाण आटपून शामू दुसरा दिवस उजाडण्याची वाट पाहू लागला.
क्रिष्णाकाका सकाळी सकाळी लगबगीने पांदणीतून आत येताना दिसले. ‘‘अरे शामाऽऽ, काका ईलेसत…’’ भिशेकाकींनी त्यांना पाहून आत वळत आवाज दिला.
तो तयारीतच होता. लगबगीने बाहेर येत तो त्यांच्यासोबत जायला निघाला.
‘‘संध्याकाळी येयन…’’ असं पुसटसं म्हणत एसटी पकडून दोघंही ऑफीसमध्ये येऊन पोचले.
ऑफीसमध्ये पोचताच क्रिष्णाकाका थबकले… ‘‘आता तू आत जा… मी इथेच थांबतो.’’
त्याने दारावर नॉक केलं.
‘‘तुमच्या संस्थेत शिपायाची जागा खाली आहे असं कळलं म्हणून आलो होतो.
‘‘हं … बसा … इंटरव्ह्यू दोन दिवसांनी आहे पण…’’ ते त्याच्याकडे पाहात म्हणाले.
‘‘हो, मला माहीत आहे.’’ त्याने मराठी शब्द जुळवत नीट उत्तर दिलं.
‘‘शिक्षण काय झालंय आपलं?.. आधी कुठे नोकरी केलीय का?’’
‘‘दहावीपर्यंत झालंय… आधी कुठे नोकरी केली नाही. सगळीकडे हेच आहे.’’ त्याने हाताच्या दोन बोटांनी पैशाच्या खुणा करत म्हटले.
अध्यक्षांच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली.
‘‘म्हणून यावेळी घेऊन आलो’’, तो कापडी पिशवी मांडीवर ठेवत उद्गारला.
‘‘असं का वाटतं तुम्हाला की आम्ही पैसे घेऊन कामं करतो…?’’ अध्यक्षांनी सरळ प्रश्‍न केला.
‘‘मी तुमका दोष नाय दितय… आताचा जगच तसा… खयय पैशाशिवाय काम नाय… संस्थेच्या नावावर डोनेशन घेतत… कोण गरीब असेल जमाचा नाय… कसो दीयत ह्यो विचार नाय… फायली सरकंवक पैसो लागता… मोठमोठ्या ऑफिसानी..! हाताखालच्या मानसाका सायबाची उठबस करूची लागता..; देवाच्या दर्शनाकय रांग तोडून बेगीना पुढे जावचा झाला तर पैसो व्हयो भटाक… नाय तर मधले अजंटांका..; हल्ली तर खून, चोरी, गुंडगिरी, वायट वायट धंदे करानय लोक निर्दोष सुटतत … कशे? पैसे चारून? पैशामुळे व्हयाता करुचो लायसन्सच मेळल्यागत वावरतत… गावात नाव खराब व्हवनंय पुना मानान मिरवतत… रूबाबात… पैशाच्या जोरार! साधी हातगाडी रस्त्याक लावची झाली तरी पैसो काडचो लागता. आमच्या रंग्या पानवाल्याकडून घेतल्यानी… सगळीकडे हाली टेबलाकालचा काम झालासा… पैसो सरकवचा…’’ तो आपल्या भाषेत स्पष्टपणे सांगत होता.
‘‘अरे पण आम्ही त्यातले नाही. तू चुकीच्या ठिकाणी आलायस…’’ साहेबांनी ठामपणे सांगितले.
‘‘सायबानू माका निराश करू नकात… मीया पासस्ट हजार आणलेसत… शंभर रुपये कमी आसत.. त्ये क्रिष्णाकाकाक दिले. तुमची भेट घडवक…’’ तो सहजपणे बोलत होता.
माका ही शिपायाची नोकरी दिवन माझ्या आयुष्याक घडवक मदत करा… पाया पडतंय तुमच्या… आनखी न्हये तर जमीन ईकून दितय’’. तो पायावर कोसळत म्हणाला.
‘‘ह्यो शिपायाचो जागो विकलो जावक नाय मा अजून… माका गरज आसा हो…’’ शामूचे डोळे पाण्याने डबडबले.
‘‘म्हाजी म्हातारी आय आसा… बापूस आसा.. त्यांचे नजरो माजेर टीकान् आसत… कधी माजी उदरगत व्हयत म्हनान हो पैसो त्यांनी आयुष्यभर हाल काडून उभो केल्लेलो आसा…’’
‘‘अरे.., मला पैसे नको आहे’’, साहेबांनी शामूकडे पाहात म्हटले.
‘‘असा नको करू… घ्या हो… मीया स्वखुशीन् दीतयसय…’’ तो विनंती करीत म्हणाला.
‘‘हे बघ, मी त्यातला नाही. सगळेजण पैसे घेऊन काम करीत नाहीत. निदान मी तरी त्यातला नाही. सगळेच वाईट नसतात. काही प्रामाणिकही असतात. त्यांना विनाकारण दूषण लागतं टेबलाखालून पैशांचा बाजार करणार्‍यांमुळे…! हे कलियुग आहे, सत्ययुग नव्हे! बरेचजण फक्त आपल्यापुरता … आपल्या कुटुंबापुरता विचार करतात नि पैशापायी चुकीच्या माणसालाही पाठींबा द्यायला कमी करीत नाहीत. पण त्यात काही चांगलीही माणसं असतात… ज्यांना दुसर्‍याच्या कष्टांची जाणीव असते. परिस्थितीची कल्पना असते. दुसर्‍यांना मदत करून त्यांना समाधान वाटतं… त्याची किंमत पैशात नाही करता येत… त्या गरीबांचे आशीर्वादच त्यांना बळ देत असतात… मोठं बनवत असतात. पण अशी माणसं पडद्याआड राहूनच आपलं कार्य चालू ठेवतात’’, साहेबांनी काही क्षण थांबून पुन्हा बोलायला सुरुवात केली… ‘‘दानसुद्धा गुप्त असावं म्हणतात. पण काहीजण आपण देवाला किती दिलं याचा हिशेब जगाला सांगत फिरतात. अरेऽऽ हे सारं त्या परमेश्‍वराचंच आहे. त्याला आपण त्याने दिलेल्यातलेच काही दिले तर कसला आलाय मोठेपणा? करायचीच तर माणसातल्या देवाला मदत करावी… विना मोबदला..!’’ साहेब तळमळीने बोलत होते.
मीही गरीबीतनंच वरती आलोय. मला जाणीव आहे. तू ये इंटरव्ह्यूला! ही नोकरी तुलाच देईन मी…’’ असं म्हणत साहेबांनी त्याचा निरोप घेतला.
शामूही आपल्याच नादात ऑफिसमधून बाहेर येत… साहेबांच्या शब्दांनी भारावून एसटीच्या दिशेने पावलं टाकू लागला. कापडी पिशवीतील पैसे घट्ट धरीत… समाधानाने..!!