बाजारातील रसायनयुक्त मासळी जप्तीचे संकेत

0
134

>> मच्छीमार मंत्र्यांकडून ठोस पावले

गोव्यातील मासळी मार्केटमध्ये विक्रीसाठी आणली जाणारी मासळी ताजी रहावी यासाठी घातक रसायने वापरली जात असल्याची माहिती आपल्या हाती आली आहे. या पार्श्‍वभूमीवर खात्यातील अधिकार्‍यांना अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने छापे मारून रसायनयुक्त मासळी जप्त करण्याचे तसेच या मासळीचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मच्छीमारी खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी काल सांगितले.
ते म्हणाले की, विशेष करून परराज्यातून येणारी मासळी ताजी रहावी म्हणून ‘फॉर्मालिन’ सारख्या घातक रसायनात मिसळली जाते. या मासळीवर घातक अशा किटकनाशकांचाही फवारा मारला जातो. हे सगळे आरोग्याच्या दृष्टीने घातक असून त्यावर नियंत्रण आणावे लागेल. त्यासाठी वेळोवेळी मार्केटमधील मासळीवर आकस्मिक छापे मारून मासळी जप्त करण्यात येईल. त्यासाठीची सगळी तयारी केलेली असून जे कोण मासळी ताजी ठेवण्यासाठी वरील घातक गोष्टींचा अवलंब करीत असतील त्यांना दंड ठोठावण्यात येईल. तसेच त्यांच्यावर गुन्हाही नोंद केला जाणार असल्याचे पालयेकर यांनी स्पष्ट केले. राज्यभरात मासळी विक्रेत्यांकडून कुजकी मासळी विकून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारीही आपणाकडे येऊ लागलेल्या आहेत. अशा मासळी विक्रेत्यांची मासळीही जप्त केली जाणार असल्याचे पालयेकर यांनी स्पष्ट केले. मासळी अव्वाच्या सव्वाफ दरात विकली जात असल्याच्याही वाढत्या तक्रारी असल्याचे पालयेकर यांनी सांगितले. गोमंतकीयांचे भात व मासळीचे कालवण हे मुख्य अन्न असल्याने गोमंतकीयांना मासळी स्वस्तात उपलब्ध व्हायला हवी असे गोंय, गोंयकार व गोंयकारपणफ हे घोषवाक्य असलेल्या गोवा फॉरवर्डफच्या पक्षाचा नेता या नात्याने आपणाला वाटत असल्याचे ते म्हणाले. काही भागांत बेकायदेशीररित्या मच्छीमारी केली जात असून या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालयेकर यांनी यावेळी सांगितले.