बांगलादेशला नमवून भारत चॅम्पियन

0
100

दहा खेळाडूंनिशी खेळून नऊ खेळाडूंसह खेळलेल्या बांगलादेशचा २-१ असा पराभव करत भारताने काल रविवारी साफ (दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ) अंडर १९ अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. २०१५ व २०१७ साली उपविजेतेपदावर समाधान मानावे लागल्यानंतर भारताने प्रथमच अंतिम अडथळा पार करत या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. विक्रम प्रताप सिंग (दुसरे मिनिट) याने भारताला आघाडीवर नेले. गुरकिरतच्या हेडरवर थोयबा सिंग याने दिलेल्या क्रॉसवर विक्रमने जोरदार फटका लगावून चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवत भारताला १-० असे पुढे नेले. यानंतर काही वेळातच विक्रमला धोकादायकरित्या पाडल्यामुळे खेळाडूंमध्ये बाचाबाची झाली. यावेळी भारताच्या गुरकिरतला रेड कार्ड दाखविण्यात आले. दुसर्‍या पिवळ्या कार्डमुळे या प्रकरणातील मोहम्मद फहीमलादेखील मैदान सोडावे लागले. यासिन अराफत (३८वे मिनिट) याने बांगलादेशला बरोबरी साधून दिली. परंतु, आनंदाच्या भरात टि शर्ट काढल्यामुळे त्याला दुसर्‍या पिवळ्या कार्डसह मैदानाबाहेरचा रस्ताधरावा लागला. रवी बहादूर राणा (९० + १) याने भारताकडून विजयी गोल केला. गिवसनच्या थ्रो ईनवर ३० यार्ड अंतरावरून त्याने फटका खेळात भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
प्रशिक्षक फ्लॉईड पिंटो यांनी या सामन्यासाठी संघात दोन बदल करताना विक्रम व रिकी शाबोंग यांना प्रारंभीच्या अकरा खेळाडूंत स्थान देताना अमन छेत्री व गिवसन सिंग यांना बाहेर बसविले. मालदिवने भूतानला नमवून तिसरा क्रमांक मिळविला. भारताचा निंथोई मितेई स्पर्धेतील सर्वांत मौल्यवान खेळाडू ठरला.