बांगलादेशचा ३३३ धावांनी पराभव

0
209

कगिसो रबाडा व केशव महाराज यांच्या तिखट मार्‍याच्या जोरावर द. आफ्रिकेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशवर ३३३ धावांनी विजय मिळविला. विजयासाठी ४२४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव केवळ ९० धावांत आटोपला. बांगलादेशतर्फे दुसर्‍या डावात ईमरूल काईसने सर्वाधिक ३२ धावा केल्या. यजमानांकडून केशव महाराजने २५ धावांत ४, कगिसो रबाडाने ३३ धावांत ३ व मॉर्नी मॉर्कलने २ गडी बाद केले. सामन्याच्या चौथ्या दिवशी बांगलादेशने १५.३ षटकांत ३ बाद ४९ धावा केल्या होत्या. काल पाचव्या दिवशी केवळ १८.१ षटकांच्या खेळात त्यांनी शरणागती पत्करली. द. आफ्रिकेने पहिला डाव ३ बाद ४९६ धावा तर दुसर्‍या डावात ६ बाद २४७ धावा करत डाव घोषित केला होता. बांगलादशने पहिल्या डावात ३३० पर्यंत मजल मारली होती.

मालिकेतील दुसरा सामना ६ ऑक्टोबरपासून ब्लूमफोंतेन येथे खेळविला जाणार आहे. बांगलादेशचा प्रमुख फिरकीपटू मेहदी हसन याला या सामन्यात २४७ धावा मोजून एकही गडी बाद करता आला नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१२ साली द. आफ्रिकेच्या इम्रान ताहीरला २६० धावा खर्च करूनही बळी मिळविण्यात यश आले नव्हते.

मॉर्कलला सहा आठवडे विश्रांती
पोटाजवळील स्नायू फाटल्यामुळे द. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्कल याला चार ते सहा आडवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. या दुखापतीमुळे त्याला ३ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या टी-२० ग्लोबल लीगच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. क्रिकेट साऊथ आफ्रिकेने बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीसाठी मॉर्कलच्या जागी डॅन पीटरसन याची निवड केली आहे.

केशव महाराजचे
५० कसोटी बळी
डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५० बळी पूर्ण केले. मुस्तफिझर रहमान हा त्याचा अर्धशतकी बळी ठरला. केवळ १२ कसोटींत त्याने बळींचे अर्धशतक पूर्ण केले. द. आफ्रिकेच्या कसोटी क्रिकेटमध्ये केवळ ह्युज टेफिल्ड व बर्ट व्होगलर (११ कसोटी) यांनी महाराजपेक्षा कमी सामन्यांत बळींचे अर्धशतक पूर्ण केले आहे.