बलात्कारप्रकरणी भाजप आमदाराला अटक

0
222

उन्नाव येथील एका १७ वर्षीय मुलीवरील बलात्कारप्रकरणी काल अलाहाबाद उच्च न्यायालयाने कडक भूमिका घेताना संशयित आरोपी असलेले भाजपचे आमदार कुलदिप सेंगार यांना ताबडतोब अटक करण्याचे सीबीआयला आदेश दिले. त्यानंतर रात्री उशिरा सीबीआयने सेंगार यांना अटक केली. त्यांची अनेक तास चौकशी झाली. त्याआधी पहाटे सीबीआयने आमदार सेंगार यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. बी. भोसले व न्या. सुनीत कुमार यांच्या खंडपीठाने आमदार सेंगार यांच्या अटकेचे आदेश देताना याआधी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सर्वांना जामीन दिला जाऊ नये यासाठी अर्ज करण्याचे निर्देशही सीबीआयला दिले. तसेच २ मे पर्यंत याप्रकरणाचा अहवाल सादर करण्यासही सीबीआयला आदेश देण्यात आला.

याप्रकरणी ज्येष्ठ वकील गोपालस्वरुप चतुर्वेदी यांनी या न्यायालयाला पत्र लिहून न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचे तपासकाम करण्याची विनंती केली होती. हे पत्र जनहीत याचिका म्हणून स्वीकारून न्यायालयाने कारवाई केली.
दरम्यान, सीबीआयने या प्रकरणाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तीन वेगवेगळी प्रकरणे नोंद केली व आमदार सेनेगर यांना काल पहाटे जबानीसाठी ताब्यात घेतले. १७ वर्षीय मुलीवरील बलात्कार, सदर मुलीच्या वडिलांचा मारहाणीमुळे कोठडीत झालेला मृत्यू व त्यांच्यावर त्याआधी घालण्यात आलेले शस्त्रास्त्रविषयक प्रकरण अशी प्रकरणे सीबीआयने नोंद केली आहेत.

कोणाचीही गय
करणार नाही ः पंतप्रधान
दरम्यान, कठुआ व उन्नाव या दोन्ही बलात्कार प्रकरणांसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रथमच भाष्य करताना या घटना अत्यंत लज्जास्पद व घृणास्पद असल्याचे म्हटले आहे. सुसंस्कृत समाजासाठी हेलांच्छनास्पद असून यामुळे आम्ही सर्व लज्जित आहोत. पीडितांना न्याय दिला जाणार असून कोणाही दोषीची गय केली जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.