बरसती मृगधारा, मृद्गंध आला…

0
397
  • प्रकाश क्षीरसागर

भर उन्हाळ्याने सृष्टी हैराण होते. वैशाख वणवा जिवाला जाळतच असतो. अशा वेळी मन आळवत असते मृगधून. वैज्ञानिक त्याला मान्सून म्हणतात. खरा पाऊस मृगाचाच. तोच पहिला पाऊस. तो झेलून घेतला की तन आणि मन कसं प्रसन्न होतं…

दिवाळी झाली की थंडी ओसरू लागते आणि ऊन तापू लागते. शिशिराची पानगळ थांबून वसंताचे आगमन होते आणि चैत्रपालवी फुटून सृष्टी उत्साहित होत असते. परंतु वरून तापणारा सूर्यनारायण जिवाची काहिली करीत असतो. त्याच्या या उग्र रूपाने धरतीदेखील तापू लागते हा उन्हाळा किती अनावर. काही विचारू नका. सगळी देहाची अन् जिवाची घालमेल. झाडं सारी उन्हं सोसून आपल्याला थंड सावली मात्र देत असतात. त्यांच्या खाली विसावलं की मनही शीतल बनतं. काही वेळ आपल्याला उन्हाचा आणि संसारतापाचाही विसर पडते.

चैत्र सरतो, वैशाख येतो. हा वैशाखवणवा सृष्टीला जणू जाळून टाकतो की काय, असे भय वाटू लागते. तेव्हाच कवी ग्रेसही म्हणून गेले असतील भय इथले संपत नाही. हा उन्हाचा ताप सर्वांनाच हैराण करतो. मुक्या प्राण्यांचीही तगमग सुरू होते. ‘पाण्यासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदिशा’ असे म्हणायची वेळ येते. आपल्या गोव्याला नाही, तर भारतातील इतर अनेक ठिकाणी ही पाणीटंचाई डोळ्यांतून पाणी काढते. या सर्वांसाठी मनात एक आशा असते. ती मृगागमनाची. मृगाची पहिली सर येईल आणि धरणीची तहान मिटेल, अशी आशा सार्‍याच सृष्टीला असते. साधारणपणे सात जूनला मृग नक्षत्राची सुरुवात होते. म्हणजे काय होते तर सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश होतो.

अकबराने दरबारात एक प्रश्‍न विचारला होता, सत्तावीस उणे नऊ किती यावर कुणी १८, कुणी २० अशी उत्तरे दिली. बिरबलाला बादशहाने तोच प्रश्‍न विचारला त्यावेळी बिरबलाने शून्य हे उत्तर दिले. त्यावर सगळचे चकित झाले. त्याचा खुलासा विचारला असता एकूण नक्षत्रे २७. त्यातून पावसाची नऊ गेली तर उरते काय? दुष्काळ, म्हणजेच शून्य असा अर्थपूर्ण खुलासा बिरबलाने केला होता. त्याच धर्तीवर नऊ उणे मृग असा विचार केला तर शून्य हेच उत्तर येईल.

खरीप पिकाच्या पेरणीसाठी शेतकर्‍याला मृगावर अवलंबून राहावे लागते. मृग नक्षत्र कोरडे गेले तर पिकाचा एक हंगाम हातून गेल्यासारखेच असते. मृगाच्या आधी वळवाचा पाऊस पडतो. त्याला अवकाळी पाऊस म्हणतात पण हा पाऊस नुकसानदायकच असतो. आंबा, फणस, काजू अशा नगदी पिकांना तो घातक ठरतो. हा गडगडतच येतो. कडाडत येतो. जणू काही उन्हाची शिक्षा कमी असते म्हणून तो आसूड मारून सृष्टीला आणखी बेजार करीत असतो.

वैशाखाच्या प्रखर उन्हाने तापलेल्या भूमीला शांत करण्यासाठी मृगाचा पहिला पाऊस बरसतो आणि त्या धारांत आपणही शांत शांत होतो. धरणी तर शांत आणि थंड होते. उन्हाने तापलेली ढेकळे फुटून माती मऊ होते. त्यामुळे शेतकरी पेरण्याची तयारी सुरू करतो. पहिल्याच पावसाने न्हाऊन घेत आहे अशी स्थिती माझ्या मनाची होते. तशीच ती कुणाच्याही मनाची होईलच.

मृग नक्षत्राचा पाऊस बरसला की शेतीला बरकत येणार आपण आता पेरणी केली आणी मृगाचे चार सडाके पडले की भरपूर पीक येईल, अशी आशा पल्लवीत होते. शेतकर्‍यांच्या दृष्टीनेच नव्हे तर सर्वांसाठीच मृग नक्षत्राचा पाऊस महत्त्वाचा असतो.
माझ्याच एका कवितेत मी म्हणतो –
मृग गेला बसरून
माती गंधाळली तेव्हा
बीज घेऊन पोटात
भुई मोहरली तेव्हा
अशीच माझीही भुईप्रमाणेच अवस्था होते. कवींना पावसाने भुरळ घातली नाही तरच नवल.
कुणी कुणी उपहासाने म्हणतात सुद्धा. आता पाऊस आला. कवितांचे पीक भरपूर येईल. बाकीबाब म्हणजेच बा. भ. बोरकरांनी देखील गोव्यातील पावसाचे वर्णन असेच केले आहे. सृष्टी समृद्ध होते. सर्वत्र मंद मंद पावसाच्या धारा असतात. झाडे सुस्नात होतात. मस्तमौला होतात. सगळीकडे हिरवेगार होते. हिरवे हिरवे गार गालिचे हरिततृणाच्या मखमलीचे असे वातावरण असते.

साधारणतः आषाढ-श्रावणातच मृगाचा बहर येत असतो. आषाढ संपून श्रावण सुरू होतो. श्रावण हा भारतीय पंचांगातील पाचवा महिना. याच महिन्यात सगळीकडे पाने फुले यांनी नटलेली सृष्टी असते. त्याला अनुसरूनच बाकीबाब आनंदाने म्हणतात, सृष्टीला पाचवा म्हैना, समुद्र बिलोरी ऐना जणु समुद्राच्या ऐन्यात आकाश आपले रूप न्याहाळते. सभोवताली किनार्‍यालगतची झाडे आणि समग्र निसर्गसृष्टी आपले विलोभनीय रूप जणू या समुद्राच्या बिलोरी एैन्यात न्याहाळते आणि खूष होऊन समग्र जीवसृष्टीला खाद्य देते. पशु गवत खातात, पक्षी आणि पाखरे फुलांचा आणि मकरंदाचा आस्वाद घेतात. सुंदर अशा वातावरणात कवी धुंद न होतील तरच नवल. त्यामुळे हा मृगाचा पाऊस कवींना आणि सृष्टीला भुलवतो. भुरळ घालतो. मन त्याच्या भोवती रुंजी घालू लागते.

मृग नक्षत्राने पावसाळ्याची सुरुवात होते. मृगाच्या पावसाने सुरू होणारा पावसाळा आल्हाददायक, शेतीस पूरक आणि मुख्य म्हणजे सृष्टीला न्हाऊ घालणारा असतो. मुख्य म्हणजे शेतीचे उत्पन्न घेण्यासाठी सज्ज व्हा असे शेतकर्‍यांना सांगत असतो. याच काळात पावशा पक्षी ‘पेरते व्हा पेरते व्हा’ म्हणून आळवून परत परत सांगत असतो. कवी अनिल (आत्माराम रावजी देशपांडे) यांनीही पेरते व्हा या कवितेत तेच सांगितले आहे.

रान मशागतीने तयार असते. धरणी बीज पोटात घेण्यासाठी आतूर असते. त्या बिजाला जगवणारा, तरारून कोंभ आणणारा मृग कधी येणार याची वाट धरणी पाहत असते. माणसाला कसे मनमुराद आवडीचे खायला – प्यायला मिळाले की अत्यानंद होतो, तसाच वसुंधरेलाही आपल्याला खुलवणारा, फुलविणारा मृग सवे जलधारा घेऊन आला की अमृतपानाचा आनंदच मिळत असतो. मृगाचे थेंब पडले की वसुंधरा पुलकित होते. गंधित होते. त्याचा परिमळ सर्व सृष्टीत पसरतो. हा मृदगंध की मृगगंध असा मनाला प्रश्‍न पडतो. वारा आनंदित होऊन मृगगीत गाऊ लागतो.