बदलते हवामान; थोडे आपणही बदलू!

0
460
  • सतीश स. प्र. तेंडुलकर
    (माजी संचालक, कृषी खाते, गोवा)

प्रत्येक शेतकर्‍याची व्यवस्थापनाची पद्धत किंवा त्याच्या जमिनीची ठेवण वेगवेगळी असते. त्यामुळे शेतमालकाचे त्या परिस्थितीमधले निर्णय त्याने घ्यायचे असतात. निसर्ग बदलतो आहे म्हणून त्रागा करण्यापेक्षा आपण निसर्गाच्या बदलाला कसं सामोरं जातो हे महत्त्वाचं असतं, आणि आपण त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. हवामानात बदल होतच राहणार. आपण पण त्याच्या बरोबरीने नवीन पद्धती वापरून आपली शेती-बागायती चालू ठेवूया…

सध्या अवेळी पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आपल्या तोंडचे पाणी पळते की काय या चिंतेत तो सापडला आहे. अगदी हातातोंडाशी आलेली पिके अशी डोळ्यांदेखत वाहून जाताना पाहून उद्याचे भविष्य त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले आहे. पण आज या बदलत्या हवामानाशी जुळवून घेणे अपरिहार्य ठरले आहे. हवामानातील बदल लक्षात घेऊन आपणालाही आपल्या शेतीत बदल करून निसर्गाशी एकरूप व्हावे लागेल. ही काळाची हाक आहे, त्याला ‘ओ’ देणे आता क्रमप्राप्त आहे.
आपली बहुतांश शेती-बागायती त्या-त्या हवामानामध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसुविधांवर अवलंबून आहे. आपली पिके ही खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांच्या चौकटीत बसलेली आहेत. आणि या चौकटीतला बदल शेतकर्‍याला संकटात टाकतो. गेल्या दशकामधील पावसाळा, हिवाळा व उन्हाळ्याच्या तर्‍हेचा आलेख बघितला तर अवकाशी पाऊस, अतिवृष्टी, अवकाळी गरमी व थंडी यांचे प्रमाण वाढते आहे. संशोधकांनी भले ते अल् निनो किंवा अल् निना किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असल्याचे सांगो, पण शेतकरी मात्र त्यामध्ये चिरडला जात आहे. या परिस्थितीमुळे ‘शेतीतून समृद्धी’ ही त्याच्यासाठी फार दूरची गोष्ट आहे. पण निरुपाय म्हणून तो त्याच व्यवसायात राहतो. त्याला सहसा वाटत नाही की, त्याच्या मुलांनी पण तसेच राहावे. डॉक्टरचा मुलगा डॉक्टरी शिकेल, वकिलाचा मुलगा वकिली पेशा पत्करेल; पण शेतकर्‍याचा मुलगा क्वचित अशाश्‍वत शेतीच्या व्यवसायात लक्ष देईल. म्हणूनच सध्याच्या परिस्थितीत बदलत्या हवामानाला सामोरं जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करणे फार गरजेचे आहे.
निसर्गातील बदल शेतकरी रोखू शकत नाही, पण बदलत्या हवामानाला सामोरे जायला ‘आले अंगावर घेतले शिंगावर’ या तत्त्वाने पर्यायी व्यवस्था शेतकर्‍याकडे असायला हवी. गोव्याच्या बाबतीत जर आपण बघितले तर आपण या बदलाला तोंड देण्यासाठी लागवड व व्यवस्थापन या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. पावसाळी पिकांमध्ये भातशेती, मिरची, डोंगराळ भागामध्ये भाजी ही आपली प्रमुख पिके. बागायतीमध्ये पण नारळ, सुपारी, काजू, ऊस या पिकांसाठी खत व इतर व्यवस्थापनाचा हा हंगाम.
भातशेती ही सगळ्या गोवा राज्यामध्ये केली जाते आणि त्याद्वारे घरात वर्षाला लागणारे तांदूळ शेतकर्‍याकडे पिकवले जातात. जर भातपीकच नष्ट झाले तर मोठा अनर्थ होतो. सद्यस्थितीमध्ये आपण परंपरागत लागवड बदलून त्याजागी जर ‘श्री’ पद्धत अवलंबिली तर बर्‍याच प्रमाणात हवामान बदलाला सामोरे जाऊ शकू. या पद्धतीमध्ये रोपलावण मशीनने करण्यात येते, म्हणून ठरावीक पद्धतीने रोपवाटिकेत रोपे तयार केली जातात. त्यामुळे पाऊस पडणार व त्यानंतर शेत नांगरून रोपे रुजत घालणार ही प्रथा बदलावी लागेल. या पद्धतीमध्ये शेताची नांगरणी व इतर तयारी करेपर्यंत रोपे तयार होतात. कारण यामध्ये १२ ते १५ दिवसांची रोपे लागवडीला वापरतात. या पद्धतीमध्ये रोपं ओळीने लावली जातात, त्यामुळे उगवणार्‍या तणाचा, नडणीचा कोळपणी यंत्राद्वारे बंदोबस्त करणे सोपे जाते. पावसाळ्यात जर पावसाने अधूनमधून उघडीप दिली तर नडणीचे प्रमाण फार वाढते. त्यावर या पद्धतीने मात करता येते. जास्त पाऊस झाला तर शेताला घातलेले खत मुख्यत्वे महागडे रासायनिक खत पाण्याबरोबर वाहून जाते. फार तर ३०-४० टक्केच खत शेतीला मिळते. तेच खत कोळपणी करून नंतर घातल्यास व त्यावर पायाने हलका दाब दिल्यास वाहून न जाता भातरोपास मिळते.
भातशेतीमध्ये सेंद्रीय खताचा वापर हवामानाच्या बदलाला टक्कर देण्यास फार महत्त्वाचा आहे. जमिनीत ओलाव्याची कमतरता, वाढलेली गरमी, पावसामुळे होणारी मातीची धूप व सूक्ष्मद्रव्यांची कमतरता या बाबींसाठी सेंद्रीय खत फार प्रभावकारी आहे. सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो व त्याचबरोबर पिकाची रोगप्रतिकारकशक्ती पण वाढते. मुख्य म्हणजे, ज्यावेळी पाऊस अकस्मात उसंत घेतो त्यावेळी सेंद्रीय खत भातपिकाला तारून ठेवते. भातपीक फुलोर्‍यावर येण्याच्या वेळी जर पाऊस बंद झाला तर कणसे सुकून जाऊन फार मोठे आर्थिक नुकसान होते. त्यासाठी सेंद्रीय खताचा वापर तर करणे गरजेचे आहेच, पण जमल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून हलवता येणारे छोटे पाण्याचे पंप नेऊन शेतीला पाणी देणे फार फायदेशीर ठरते. सध्या उपलब्ध असलेले पी.व्ही.सी. पाईप यासाठी फार सोयिस्कर असतात. एका वाड्यावर एक तरी असा पंप पर्यायी व्यवस्थेसाठी उपलब्ध असायला हवा. शेतीच्या कुठल्याही कोपर्‍यात जे थोडेफार पाणी मिळते ते या कामासाठी वापरता येते.
सध्या गोव्याला सतावतोय तो भरपूर पाऊस व त्यामुळे साचलेले पाणी. तयार झालेले वा होत आलेले पीक यामध्ये सापडले आहे. बर्‍याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेत जमिनीवर लोळते आहे व थोड्या ठिकाणी तर ते चक्क पाण्याखाली गेलेले आहे. हे पीक वाचवण्यासाठी शक्य त्या जागी शेतात चर काढून पाण्याला बाहेर घालणे गरजेचे आहे. पण अशावेळी ‘श्री’ पद्धतीने लावलेली शेती चांगली तग धरू शकते. ‘श्री’ पद्धतीमध्ये एका रोपावर भरपूर फुटवे येतात व त्यामुळे ते एकसंध एकमेकांना धरून ठेवतात. जमिनीवर लोळण घेत नाहीत. त्यामुळे आपले तयार पीक पावसाच्या तडाख्यातून निसटते. पण तरीसुद्धा पीक तयार झाले तर ते पावसात न ठेवता कापून आणून वाळवावे लागतेच, नाहीतर ते एक तर कुजून किंवा त्याला अंकूर येऊन ते खराब होण्याचा धोका असतो. अशावेळी हे पीक व्यवस्थित कापून आणून मळून घ्यावे. सध्या बाजारात पारदर्शक प्लास्टिकचा कपडा मिळतो. पावसापासून संरक्षण करीत भात वाळवण्यासाठीही याचा फार चांगला उपयोग होतो. एक साधी लांबलचक झोपडी करून त्यावर हे प्लॅस्टिक आच्छादन घातले तर या झोपडीमध्ये तापमान भरपूर वाढून त्यात भात वाळवता येते. हे भात अधूनमधून ढवळून घेणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे ही झोपडी दोन्ही बाजूनी एकदम बंद करून न घेता थोडी उघडी ठेवावी लागते. त्याद्वारे गरम, दमट हवा बाहेर फेकली जाते. ही वाळवण्यासाठी केलेली झोपडी भाताप्रमाणे इतर शेतीउत्पन्न जसे पिकलेल्या मिरच्या, सुपार्‍या, जायफळं वगैरेसाठी पण वापरता येते. सध्याच्या बदलत्या हवामानात ही यंत्रणा भातशेती किंवा बागायती करणार्‍यांकडे असणे आवश्यक आहे.
पावसाळ्यामध्ये गोव्यात बर्‍याच ठिकाणी डोंगराच्या उतरणीवर वेलवर्गीय काकडी, दोडकी यांसारखी पिके घेतली जातात. सगळी मेहनत, मांडवाचा खर्च वगैरे करून जर अकस्मात पावसाने दगा दिला तर या मळेवाल्यांचे फार नुकसान होते. या समस्येला तोंड देण्यासाठी रोपे लावताना भरपूर सेंद्रीय खताचा वापर केला तर आपण पावसाच्या लहरीपणाचा थोडा सामना करू शकतो. जर फक्त रासायनिक खतांचा वापर केला तर मात्र पाऊस दोन दिवस बंद झाला तर तिसर्‍या दिवशी मुळे सुकू लागतील. सेंद्रीय खताप्रमाणे या रोपांना पाल्यापाचोळ्याचे आच्छादन घालणे गरजेचे असते. याला गोव्यामध्ये ‘सावळ घालणे’ म्हणतात. या ‘सावळी’मुळे सूर्यप्रकाश सरळ जमिनीवर न पडल्यामुळे रोपाची मुळे थंड राहतात व त्याचबरोबर जमिनीमध्ये असणारा ओलावा बाष्फीभवन होऊन नष्ट होत नाही. त्यामुळे असलेल्या ओलाव्याचा पुरेपूर उपयोग होतो. या आच्छादनामुळे फालतू गवत किंवा नडणी उगवत नाही, त्यामुळे जमिनीमध्ये घातलेल्या खताचा पुरेपूर उपयोग होतो.
पाल्यापाचोळ्याचे आच्छादन डोंगरावर केलेल्या मिरची, भेंडी किंवा इतर भाज्यांच्या लागवडीला पण फारच उपयोगी ठरते. या आच्छादनामुळे जोरजोराने पडणार्‍या पावसापासूनसुद्धा जमिनीची होणारी धूप थांबते व पडणारा पाऊस सावकाश जमिनीमध्ये मुरून जातो. बर्‍याच ठिकाणी डोंगरावर किंवा इतर भागांत केलेल्या बागायती लागवडीमध्ये पाण्याच्या ताणामुळे उत्पादनावर होणार्‍या दुष्परिणामावर या आच्छादनापासून फायदा होतो. सध्या तर जमिनीवर पसरविण्याच्या प्लॅस्टिकच्या आच्छादनाचा रोलच मिळतो. त्याचा पण आपण फायदा घेऊ शकतो. प्लॅस्टिक आच्छादनामुळे जमिनीला सेंद्रीय खत मात्र मिळत नाही.
डोंगराळ भागामध्ये पाण्याची व्यवस्था म्हणून जलकुंडाची स्थापना केल्यास १५ दिवस जरी पाऊस गायब झाला तरी पिकाला त्रास होत नाही. आपल्या पिकाच्या गरजेनुसार आपण डोंगरावर पाहिजे त्या आकाराचे जलकुंड बनवू शकतो. या तंत्रामध्ये जमिनीत आपल्याला पाहिजे त्या आकाराचा खड्डा खोदून त्याला आतमध्ये जाड प्लॅस्टिक घालावे लागते व या प्लॅस्टिकमध्ये पाणी साठवले जाते. गरजेच्या वेळी हे साठवलेले पाणी काढून मुख्यतः वेलवर्गीय भाज्यांना दिले तर पाऊस नसलेल्या मध्यकाळात आपण पीक सावरू शकतो व संभाव्य नुकसान टाळू शकतो.
बागायती पिकांमध्ये नारळ, सुपारी, केळी व त्याचबरोबर मिरी, अननस वगैरे आंतरपिके गोव्यात प्रामुख्याने घेतली जातात. या पिकांना पावसाळ्यात खत व्यवस्थापनाची गरज असते. पिकाप्रमाणे जरी आपण खताची व्यवस्था केली तरी दिलेल्या खताचा पुरेपूर उपयोग होण्यासाठी डोंगराळ भागाकरिता सुचविण्यात आलेल्या पाल्यापाचोळ्याचे आच्छादन करणे महत्त्वाचे आहे. खताची धूप किंवा नासाडी या आच्छादनामुळे आपण रोखू शकतो. तसेच बागायतीमधील कसदार वरवरची मातीची धूप या पद्धतीमुळे रोखली जाते. बागायतीमधील पडलेल्या झावळ्या, उगवलेलं गवत, जंगली झाडाच्या फांद्या यासारख्या गोष्टीचा आपण उपयोग करू शकतो. नारळ, सुपारी या पिकांमध्ये जास्त पाऊस झाल्यास कच्ची फळे अवकाळी गळायला लागतात व त्यामुळे उत्पन्नात बरीच घट होते. यासाठी आपल्या बागायतीत चांगली हवा खेळेल असं पोषक वातावरण तयार असायला हवं. भरपूर सूर्यप्रकाश येण्यासाठी जर जुने मोठे वृक्ष अडथळा करत असतील तर त्यांची छाटणी करणे गरजेचे असते. हवा खेळती असेल तर फळांची गळ कमी होते. पावसाळ्यात बर्‍याच ठिकाणी जास्त पाऊस पडल्यास पाणी साचून राहते. यामुळे बागायतीतल्या झाडांच्या मुळांना श्‍वासोच्छ्‌वास घेणे कठीण बनते व परिणामी फळगळती होते. बागायतीमध्ये यासाठी थोड्या थोड्या अंतरावर चर खोदून पाणी बाहेर जाण्यास जर मार्ग केले तर पाणी तुंबून राहणार नाही व फळगळती कमी होईल. तरीसुद्धा जर गळती झाली तर औषध फवारणीला दुसरा पर्याय नाही. बागायतीमध्ये जर पावसाने उसंत घेतली तर नडणी, गवत वगैरे जरा जास्तच उगवते. हे रोखण्यासाठी आच्छादनाचा उपयोग होतोच, पण जर नियंत्रण झाले नाही तर तणनाशकाचा वापर करूनही समस्या सोडवता येते. तरीसुद्धा नडणी किंवा इतर गवत पाऊस संपता संपता फुलोर्‍यावर येण्याच्या वेळी काढणे चांगले असते. यामुळे जमिनीची धूप होणे टाळले जाते व याचबरोबर अनावश्यक रोपे फुलण्याच्या अगोदर उपटल्यामुळे त्यांचा प्रसार कमी होतो.
प्रत्येक शेतकर्‍याची व्यवस्थापनाची पद्धत किंवा त्याच्या जमिनीची ठेवण वेगवेगळी असते. त्यामुळे शेतमालकाचे त्या परिस्थितीमधले निर्णय त्याने घ्यायचे असतात. निसर्ग बदलतो आहे म्हणून त्रागा करण्यापेक्षा आपण निसर्गाच्या बदलाला कसं सामोरं जातो हे महत्त्वाचं असतं, आणि आपण त्यानुसार निर्णय घ्यावे लागतात. हवामानात बदल होतच राहणार. आपण पण त्याच्या बरोबरीने नवीन पद्धती वापरून आपली शेती-बागायती चालू ठेवूया…