बदलती नाती

0
449
  •  सरिता नाईक
    (फातोर्डा-मडगाव)

हा संसार आणि आपलं आयुष्य म्हणजे चांगल्या-वाईटाची भेसळ आहे. यातील जे वाईट आहे ते काढून टाकून चांगलं जो स्वीकारतो तोच खरं जीवन जगतो. आपल्या जीवनात असलेली नाती टिकवणे, नवी नाती निर्माण करणे; माणुसकीची नाती जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण यातूनच आपल्याला खरा आनंद मिळतो.

मी, विशेषतः फोनवर कोणाशी जास्त वेळ बोलत नाही. शक्य तितक्या कमी वेळेत मला फोनवरचं बोलणं संपवायचं असतं. याला अपवाद म्हणजे माझी बहीण आणि माझी मुलगी.

जेव्हा फोन वापरात नव्हते तेव्हा मी आणि माझी बहीण एकमेकांना कमीत कमी महिन्यातून दोन तरी पत्रे लिहीत असू. तीही कशी? एखाद्या दीर्घ कथेसारखी. लांबच्या लांब. माझ्या शाळेच्या पत्त्यावरच तिची पत्रे यायची. माझी अर्ध्या तासाची मधली सुट्टी मला ते पत्र वाचायलाच लागायची. माझ्या बाकीच्या सहकार्‍यांना ती पत्रे पाहूनच आश्‍चर्य वाटायचं. त्या म्हणायच्या, ‘असं काय लिहिलेलं असतं गं या पत्रात? ’ मला त्यांना ते काही सांगता यायचं नाही. पण माझ्यासाठी मात्र त्या पत्रातील शब्दन् शब्द मायेनं, प्रेमानं ओथंबलेला असायचा. त्यामध्ये मी चिंब भिजून जायची. ते पत्र परत परत वाचावंसं वाटायचं. तिचं पुढचं पत्र येईपर्यंत या पत्राची कितीतरी पारायणं व्हायची. मी पण तिला पत्रं लिहायची पण तिच्याप्रमाणं दीर्घ पत्र लिहिणं मला जमलं नाही. पुढे तिची टेलीफोन एक्स्चेंजमध्ये बदली झाली. आमच्याकडे पण फोन आला आणि पत्रं हळुहळू कमी होत गेली. पत्रांमधला संवाद आता फोनवर होऊ लागला. पण पत्रांची जशी पारायणं करता येत तशी फोनवरच्या बोलण्याची पारायणं करता येत नसल्यामुळे चुकल्या चुकल्यासारखं होऊ लागलं. एक मात्र बरं झालं, पत्र महिन्यातून दोन-तीनच यायची पण आता दूरध्वनीमुळे आमची भेट नेहमीच होऊ लागली. आता मी नोकरीतून निवृत्त होऊन बरीच वर्षे झाली. बहीणही वर्षापूर्वी निवृत्त झाली. हातात स्मार्ट फोन आले. त्यामुळे आमच्यामधील कम्युनिकेशन बर्‍यापैकी वाढलं. पूर्वी पत्राद्वारे एकतर्फी बोलणे व्हायचे. आता दीर्घपत्रांऐवजी दीर्घकाल सुसंवाद घडतो.

एकमेकींशी बोलताना आम्हाला कोणत्याही विशिष्ट विषयाची गरज नसते. जगातील कोणताही विषय आम्हाला वर्ज्य नसतो. आता त्या विषयाचे पूर्ण ज्ञान असो वा नसो त्यावर बोलताना आम्हाला कोणतीही अडचण येत नाही. माझं आणि माझ्या बहिणीचं सर्वांत जवळच्या मैत्रिणीचं नातं आहे. माझ्या नशिबाने मला खूप चांगल्या बहिणी मिळाल्या. माझी आक्कासुद्धा खूप प्रेमळ होती. (दुर्दैवाने ती आता या जगात नाही) तीही माझ्यावर खूप प्रेम करायची. माझ्या आणि त्यांच्या स्वभावात खूप फरक होता. मी फटकळ स्वभावाची. जरा काही मनाविरुद्ध झालं की फटकन् बोलायची, वाद घालायची. पण माझ्या बहिणींनी मला खूप सांभाळून घेतलं. आक्का असेपर्यंत गोव्यात माझ्याकडे येताना त्या दोघी मिळून यायच्या, त्या इकडे असेपर्यंत रात्री दोन-अडीचपर्यंत आमच्या गप्पा चालायच्या. नंतर माझे मिस्टर म्हणायचे, ‘‘इतकं रोज रात्रभर तुम्ही बोलता तरी काय?’’ आता त्यांना काय सांगणार आमचे विषय! बालपणापासून आतापर्यंतच्या सगळ्या आठवणींची उजळणी व्हायची. दर खेपेला तेच विषय आम्ही नव्या चवीने चघळायचो. दरवेळी त्यामध्ये थोडी थोडी भर पडत असेच पण त्या रवंथाचा कधीच कंटाळा येत नसे.

मी पुण्याला जायची असले की ज्या बहिणीकडे मी मुक्कामाला उतरे तिथं दुसरी माझ्याआधी हजर असे. बहिणींची घरं माझ्यासाठी माहेर होती. तिथून मग आम्ही तिघीमिळून भावांना भेटायला जात असू. कधी एखादी छोटी ट्रीप ठरवत असू. सुट्टीचे दिवस कसे आनंदाचे पंख लावून भुर्रकन् उडून जात. आक्का गेली आणि माझं एक माहेर संपलं. आता सुद्धा मी पुण्याला गेले की भाचरं येतात भेटायला. आपुलकीने चौकशी करतात. पण आक्का असताना जो हक्क जतवता येत होता; हक्कानं हट्ट करणं, सणं, रागावणं, मनवून घेणं सारं संपलं. आम्हा दोघीही बहिणींना तिच्या नसण्याची पोकळी खूप जाणवते. आता आम्ही उरलेल्या दोघी एकमेकांना धरून आहोत. एकमेकीशी फोनवरून बोलतो. अधूनमधून भेटतो. देवाजवळ प्रार्थना करते की माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमचं नातं असंच राहो. एवढं मात्र खरं की (मला तरी वाटतं) बहिणी बहिणीच्या नात्याची वीण जितकी घट्ट असते तितकी इतर कोणत्याही नात्याची नसते. हे नातं तर मुलांपेक्षाही जुनं आणि जास्त मुरलेलं असतं ना!
बहिणीनंतर माझी जवळची मैत्रीण बनली ती माझी मुलगी. तिला बहीण नाही याचं मला खूप वाईट वाटतं. कारण अगदी जवळच्या जिवाला जीव देणार्‍या नात्याला ती मुकली आहे. एक मात्र बरं आहे रक्ताचं नातं नसलं तरी बहिणीप्रमाणे प्रेम करणार्‍या मैत्रिणी तिने मिळवल्या आहेत.

ती रोज फोन करून माझी चौकशी करतेच पण फक्त चौकशीसाठीच तिचे फोन नसतात तर माझ्या बहिणीप्रमाणेच आमचा संवाद दीर्घकाळ चालतो. एकदा मी आणि माझी मैत्रीण टूरवर गेलो होतो त्यावेळी माझे व मुलीचे फोनवर चाललेले बोलणे ऐकून ती म्हणाली, ‘‘तुम्ही नेहमी इतका वेळ फोनवर कसं बोलू शकता? आमचं कधीच असं बोलणं होत नाही.’’ खरंच, मला तिची कीव कराविशी वाटली. मुलगी मोठी झाली की तिचं आणि आपलं नातं मैत्रिणीचं असलंच पाहिजे. इतकंच नव्हे तर आपल्या वृद्धापकाळात ती आपली आईही बनते. ती आपली सगळ्या प्रकारे काळजी घेते. तिच्या बारीकसारिक वागण्यातून तिची आपल्याविषयीची आत्मियता जाणवते. फक्त ते जाणण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे.

काहींच्या बाबतीत ही रक्ताची नातीही आपलं नातं टिकवत नाहीत. एकाच आईबाबांच्या पोटी जन्मलेली भावंडं मोठेपणी एकमेकांशी वैर्‍याप्रमाणे वागताना दिसून येतात. छोट्याशा कारणांवरून मनात अढी ठेवून वितुष्ट वाढवणार्‍या बहिणी-बहिणी, भाऊ-भाऊ दिसून येतात. प्रॉपर्टीच्या वादातून एकमेकांशी मारामारी करणारे; इतकेच नव्हे तर भावंडांच्या जिवावर उठणारेही आहेत. समजत नाही माणसं अशी का वागतात? सर्वांनाच माहीत असतं की आपण या जगात येताना एकटेच रिकाम्या हाताने आलो आहोत आणि जातानाही एकटेच बरोबर काहीही न घेता जाणार आहोत. तरीही संपत्तीच्या लोभापायी माणसं नात्यांचाही विचार करत नाहीत.

हल्ली तर सारी नातीही लुप्त होत चालली आहेत. कुटुंब छोटं होत चाललं आहे. आम्ही दोन आणि आमचं एक.. असं इन-मिन-तीन लोकांचं कुटुंब बनलंय. भावाला बहीण नाही; बहिणीला भाऊ नाही. आजी-आजोबा जवळ नाहीत. काका-काकी, मामा-मामी, आत्या-मावशी यांची ओळखसुद्धा आता आपल्या मुलांना करून द्यावी लागणार.
पूर्वीच्या एकत्र कुटुंबात संस्कार मुद्दाम शिकवावे लागत नसत. ते आपसुकच एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पोहोचत असत. असं असूनही नात्यांमध्ये वादविवाद, भांडणं, हेवेदावे असायचेच ना! एकूण काय माणूस अशिक्षित असो वा सुशिक्षित, त्याच्या वर्तनाचं गूढ त्याच्या मूळ जनुकांमध्येच (जीन्स) असतं, हेच खरं. नाहीतर धर्मग्रंथांचा अभ्यास करणारे आसाराम बापूंसारख्या व्यक्ती यांच्याकडून वाईट वर्तन का घडले असते? काही प्रसिद्ध मंदिरातील पुरोहिताकडून जी भक्तांची, दर्शनाळू लोकांची लूट चाललेली असते ती चालली असती का? बँक अधिकार्‍यांनी ग्राहकांना लुटलं असतं का? राजकारण्यांनी जनतेला लुटलं असतं का?
अशा खूपशा घटना आहेत ज्यामध्ये स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे माणुसकीची नाती विसरून फक्त आपला गल्ला भरण्याचं काम करत असतात आणि शेवटी सगळी मिळकत इथेच ठेवून लोकांचे शाप आणि आपलं कुकर्म बरोबर घेऊन जगाचा निरोप घेतात.

दुसरीकडे रक्ताचं नातं नसतानाही दुसर्‍यांशी चांगलं वागणारी, त्यांना मदत करणारी, कोणताही स्वार्थ न बाळगता आनंदाची पखरण करणारी माणसेही आहेत. मग यातलं आपलं जवळचं नातं कोणतं म्हणावं बरं!
हा संसार आणि आपलं आयुष्य म्हणजे चांगल्या-वाईटाची भेसळ आहे. यातील जे वाईट आहे ते काढून टाकून चांगलं जो स्वीकारतो तोच खरं जीवन जगतो. आपल्या जीवनात असलेली नाती टिकवणे, नवी नाती निर्माण करणे; माणुसकीची नाती जपणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण यातूनच आपल्याला खरा आनंद मिळतो. आणि आनंदात जगणे… यालाच जीवन ऐसे नाव!!