बघ्याची भूमिका घेतल्याने पोलीस शिपाई निलंबित

0
143

सांतइनेज पणजी येथे निवडणूक कार्यालयाच्या गस्ती पथकातील अधिकारी आणि बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांत झालेल्या शाब्दिक चकमक प्रकरणी पोलीस शिपाई समीत जल्मी याला निलंबित करण्यात आले आहे.

निवडणूक अधिकारी आणि बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकातील शाब्दिक चकमक सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मोन्सेरात यांच्या दोघा समर्थकांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी लावलेले बॅनर निवडणूक अधिकार्‍याने हटविल्याने शाब्दिक चकमक उडाली होती. निवडणूक अधिकार्‍याने बॅनर लावण्यासाठी परवानगी घेतली नसल्याचे सांगून बॅनर हटविले. त्यानंतर बाबूश मोन्सेरात यांच्या समर्थकांनी गस्ती पथकातील अधिकार्‍यावर प्रश्‍नांचा भडिमार करून दमदाटी केली. आपण घराच्या बाहेर बॅनर लावणार तुम्ही काढून दाखवावा, अशी धमकी निवडणूक अधिकार्‍याला देण्यात आली. यावेळी पोलीस शिपाई समीत जल्मी त्या ठिकाणी उपस्थित होता. परंतु, त्याने बघ्याची भूमिका घेतल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. निवडणूक अधिका़र्‍यानी यासंबंधीचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस प्रमुखांना या प्रकरणी चौकशी करण्याचा आदेश दिला. या प्रकरणी पोलीस शिपाई जल्मी याला निलंबित करून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.