बंधूप्रेमात अडकले, ते राजकारणात संपले

0
214

>> गडकरींचा सुदिन ढवळीकरांवर हल्लाबोल

मगोने कॉंग्रेस पक्षाबरोबर केलेली युती विचारांची नसून फक्त स्वार्थापुरती आहे. मगोला बंधूप्रेम बाधले आहेत. आपला इतिहास सांगतो की, बंधू प्रेमामध्ये किंवा नात्यागोत्यात अडकलेली व्यक्ती राजकारणामध्ये संपते. मगो नेते सुदिन ढवळीकर हे त्याच दिशेने गेल्याची टीका केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल मांद्रे येथे भाजपच्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केली.

गडकरी म्हणाले, सुदिन ढवळीकरांना सांगितले होते की तुम्हांला आमच्या बरोबर राहायचे असेल तर युतीचा धर्म पाळावा लागेल. मगोने लग्न आमच्याबरोबर केले. मात्र, घरातच राहायला ते तयार नाहीत. मी त्यांना समजून सांगितले की तुम्ही एकतर युतीत राहत असाल तर सगळ्या ठिकाणी भाजपला पाठिंबा द्या. युतीच्या विरोधात राहिलात तर मग आम्ही तुम्हांला रामराम करू. पण ते बंधूप्रेमात अडकले आणि त्याच दिशेने गेल्याचे गडकरी म्हणाले.

गोव्यातील सरकारामागे आपले स्वत:चे लक्ष आहे. हे सरकार चांगले चालले पाहिजे. गोव्याच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे. गोवा सुशिक्षित, सुसंस्कृत लोकांचे राज्य आहे. पर्रीकरांच्या स्वप्नातला गोवा, त्यांनी सुरू केलेली कामे पूर्ण करणे आणि ती पूर्ण होणे हीच पर्रीकरांना सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरणार आहे, असे गडकरी म्हणाले.

गोव्यात अस्थिरतेचे सावट भाजपने दूर केले आहे. गोव्याच्या विकासासाठी स्थिर सरकार गरजेचे आहे, असे ते म्हणाले.