बंदमुळे कर्नाटकात जनजीवन विस्कळीत

0
178
Bengaluru : Kannada activists take out a protest rally during Karnataka Bandh in Bengaluru on Thursday. Pro-Kannada organisations have called a day-long statewide bandh on the issue of Mahadayi water sharing between the states of Karnataka and Goa. PTI Photo by Shailendra Bhojak (PTI1_25_2018_000095B)

>> म्हादई पाणीतंटा

>> गोव्यातील वाहनांवर दगडफेक

>> कदंबला आर्थिक फटका

म्हादई पाणीतंटा प्रश्‍नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी करीत कर्नाटकातील कन्नड संघटना आणि शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदला काल चांगला प्रतिसाद लाभला. कर्नाटक परिवहन मंडळाची बससेवा, बहुसंख्य शाळा, बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्याने जनजीवनावर परिणाम झाला. बंदच्या काळात गोव्यातील काही खासगी वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याचे वृत्त आहे. या बंदमुळे कदंब प्रवासी वाहतूक महामंडळाला अंदाजे तीन ते चार लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या म्हैसूर दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर कर्नाटक बंदचे आयोजन करण्यात आले होते. येत्या ४ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बंगलोर दौर्‍याच्या वेळी बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक बंद शांततेत पार पडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

मलप्रभा खोर्‍यामध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विजापूर, हुबळी या भागातील बाजारपेठा, शाळा बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंगलोर, म्हैसूर येथील व्यापारी आस्थापने, मॉल्स, शाळा, सरकारी कार्यालये बंद ठेवण्यात आली होती. कर्नाटक राज्य प्रवासी वाहतूक मंडळाची बससेवा बंद होती. कर्नाटक आयएमएशी संलग्न डॉक्टरांनी हाताला काळ्या पट्‌ट्याबांधून काम करीत बंदला पाठिंबा दर्शविला.

गोव्याच्या वाहनांवर दगडफेक
गोव्याचे नोंदणी क्रमांक असलेल्या गाड्यांवर दगडफेकीचे प्रकार घडल्याचे वृत्त आहे. परंतु, गाड्यांचा तपशील उपलब्ध होऊ शकला नाही. बंगलोर आयटी वसाहतीतील औद्योगिक आस्थापने बंद ठेवण्यात आले होती. काही जिल्ह्यांत प्रवासी बससेवा बंद होती. ऑटो रिक्क्षा आणि खासगी वाहनांची तुरळक वाहतूक सुरू होती. आंदोलकांकडून पुतळ्याचे दहन, घोषणाबाजी केली जात होती. बंदच्या पार्श्‍वभूमीवर जादा पोलीस कुमक तैनात करण्यात आली होती.

हुबळीत रेल रोकोचा प्रयत्न
हुबळी येथे आंदोलकांचा सीटी सेंट्रल रेल्वे स्टेशनवर रेल रोकोचा प्रयत्न रेल्वे सुरक्षा पथकाने हाणून पाडला. चित्रदुर्ग येथे करनाडू रक्षण सेनेने गांधी पुतळ्याजवळ जोरदार निदर्शने केली. गोव्याच्या मुख्यमंत्र्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येथे कर्नाटक एसटी बससेवा बंद होती. खासगी बससेवा आणि काही दुकाने सुरू होती.

बेल्लारीत जोरदार निदर्शने
बेल्लारी येथे कर्नाटक रक्षण वेदीकेने जोरदार निदर्शने केली. आंदोलकांनी शहरात येणारी कलबुर्गी एक्सप्रेस रोखून धरली. विजयापुरा खासगी बससेवा सुरू होती. धारवाड येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. गोव्याचे जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांच्याविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. येथील बससेवा बंद होती. दुकाने, शाळा बंद होत्या. आंदोलकांनी अनेक ठिकाणी निदर्शने केली. पोलिसांनी अनेकांंना प्रतिबंधात्मक अटक सुध्दा केली.

शिर्शीत बंद फसला
भाजपचा प्रभाव असलेल्या उत्तर कर्नाटकातील शिर्शी जिल्ह्यात बंदचा प्रभाव जाणवला नाही. बससेवा सुरळीत सुरू होती. शाळा, महाविद्यालये सुरू होती. रायचूरमध्ये बंदला प्रतिसाद मिळाला नाही. फक्त हुबळी येथे जाणार्‍या बसगाड्या बंद होत्या.
कन्नड संघटनांचे प्रमुख व्ही. नागराज यांनी बंदची पाहणी केली. म्हादई प्रश्‍नी पंतप्रधान मोदी यांनी लक्ष न घातल्यास दिल्ली येथे संसद भवनासमोर निदर्शने करण्याचा इशारा नागराज यांनी दिला. म्हादईच्या पाण्यावर आमचाही हक्क आहे, असा दावा अभिनेता प्रकाश राज यांनी केला.

कॉंग्रेसकडून बंदचे राजकारण : येडीयुरप्पा
कर्नाटक बंद राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचा आरोप विरोधी भाजपने केला आहे. भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी गोवा व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हादई प्रश्‍नी लवाद बाह्य तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. म्हादईचे पाणी कर्नाटकला मिळणार आहे, असा दावा येडियुरप्पा यांनी केला. भाजपचे राज्य शाखेचे अध्यक्ष येडियुरप्पा यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू केलेल्या परिवर्तन यात्रेमुळे कॉँग्रेस पक्षात भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यात्रा रोखण्यासाठी बंदच्या माध्यमाचा वापर केला जात आहे, असा आरोप शहा यांनी म्हैसूर येथे सभेत बोलताना केला.