‘बंद’चा मार्ग देशाचे नुकसान करणारा…

0
182
  • देवेश कु. कडकडे(डिचोली)

राजकीय नेते ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हणून आपली पाठ थोपटून घेतात; परंतु हा नि:संशय त्यांचा भ्रम असतो. वास्तविक शेकड्यातून एखादा बंद जो जनतेच्या गंभीर प्रश्‍नावर पुकारला जातो त्याला मनापासून प्रतिसाद मिळतो. बाकीच्या बंदला प्रतिसाद देणे हा सामान्य जनतेचा नाईलाज असतो.

आज आपला देश आर्थिक, शैक्षणिक विकासात भलेही बराच पुढे गेला असेल, तरीही राजकीयदृष्ट्या अजूनही आपण अत्यंत मागासलेले आहोत. सभेत चिथावणीखोर विधाने करून आपण अनेकवेळा आपल्या राजकीय मागासलेपणाचे दर्शन घडवीत असतो. आपला समाज प्रगत आहे, पुरोगामी आहे, अशी शेखी मिरवतो; परंतु अजूनही समाजातील सुशिक्षित, अशिक्षित असे दोन्ही वर्ग ‘बंद’ या संकल्पनेला धरून आहेत.

सरकारच्या जनतेविरोधी धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी विरोधकांकडून संपूर्ण ‘बंद’ची घोषणा केली जाते. आरोग्य सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवांवर बंदचा परिणाम होतो. पूर्वी हे ‘बंद’ शांततेत पार पडत असत; परंतु सध्या या बंदचा सामान्य लोक धसका घेत आहेत. एवढे या ‘बंद’चे परिणाम जनतेला भोगावे लागतात. खरे तर नेत्यांनी जनतेला ‘बंद’च्या जंजाळातून बाहेर काढणे आवश्यक आहे. आपण फाशी या शिक्षेला रानटी असे म्हणून कुचेष्टा करतो. मग बंद पुकारणे हे कोणते सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे?
ज्यांनी संयम बाळगून जनतेला मार्गदर्शन करावे, अशी आपली भावना असते त्याच नेत्यांकडून अशा चिथावण्या दिल्या जातात, हे खरोखरच दुर्दैवी आहे. या नेत्यांच्या इभ्रतीपुढे हजारो गरीब भाबड्या जनतेच्या मालमत्तेचे नुकसान होऊन ते कंगाल होतात. धर्मराजाला राजधर्माचा उपदेश करीत भीष्म म्हणाला – गर्भिणी स्त्री आपल्या आवडीचा आहार-विहार सोडून गर्भाला हितकर होईल अशाच आहाराचे सेवन करते, तसेच धर्मशील राजाने आपल्या आवडीच्या गोष्टी सोडून ज्या गोष्टी लोकहितकारक असतील त्या नि:संशय प्रचारात आणाव्यात. दारू, सिगरेट, जुगार या व्यसनांच्या गंभीर दुष्परिणामांची कल्पना असूनही काहीजण त्यांच्या आहारी जातात. तसेच ‘बंद’च्या भीषण परिणामांची पूर्ण जाणीव असूनही राजकीय पक्ष, संघटना बंद पुकारतात हेच मुळी कल्पनेपलीकडे आहे.
लोकांनी लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून चालवलेले राज्य अशी व्याख्या असलेल्या आपल्या लोकशाही राज्यात आपल्याच लोकांकडून लोकांवर अन्याय आणि शोषण होत असते. दोन समाजात द्वेष भावना निर्माण होऊन एकमेकांच्या जिवावर उठतील, असे विष पसरवत राहायचे. ज्यांनी समाजाला योग्य दिशा दाखवावी, त्या जाणत्या पक्षाचे जाणते नेतेही कधी कधी ‘वाचाळवीर’ बनतात. देशातील समस्यांना भिडणे, आर्थिक व्यवस्थेला जाग्यावर आणणे हे मुद्दे गौण झाले आहेत.

बंदमुळे चारही बाजूंनी सामान्य जनतेचा कोंडमारा होतो आणि असहाय परिस्थिती निर्माण होते. बंदच्यावेळी काही अदृश्य शक्ती आपले हात धुवून घेतात, तसेच अफवा पसरवून आगीत तेल ओतले जाते. त्यामुळे हिंसा भडकते, आंदोलक प्रक्षुब्ध होतात. पोलिसांना लाठीमार करावा लागतो. परिस्थिती हाताबाहेर गेली तर हवेत बंदुकीच्या फैरी झाडाव्या लागतात. मालमत्तेचे नुकसान होते. अगदी वस्त्याही जाळल्या जातात. या नुकसानीला जबाबदार असलेले घटक क्वचितच जनतेसमोर येतात. ते आपले कुकर्म साधून गडप होतात.

यासारखा हिंसक घटनांनी लोकांच्या मनावर जबरदस्त प्रहार होतो व त्याची आठवण अनेक वर्षे बुजणे शक्य नसते. त्याचे दीर्घकालीन परिणाम सामान्य जनतेला भोगावे लागतात. हिंसक घटनेने मने दुभंगतात. जे वेगवेगळे समाज शेकडो वर्षापासून एकत्र नांदत आलेले असतात तेच परस्परांना संशयाने पाहतात.

राजकीय नेते ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला म्हणून आपली पाठ थोपटून घेतात; परंतु हा नि:संशय त्यांचा भ्रम असतो. वास्तविक शेकड्यातून एखादा बंद जो जनतेच्या गंभीर प्रश्‍नावर पुकारला जातो त्याला मनापासून प्रतिसाद मिळतो. बाकीच्या बंदला प्रतिसाद देणे हा सामान्य जनतेचा नाईलाज असतो. त्यात उत्स्फूर्त हा भाग निश्‍चितच नसतो. लोक भीतीपोटी घरातून बाहेर पडण्यासाठी धजावत नाही. आपल्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून दुकानदार दुकाने बंद करून घरी बसतात. खासगी वाहने रस्त्यावर धावत नाहीत. यात सर्वात जास्त नुकसान सोसावे लागते ते रोजंदारीवर काम करणारे आणि दिवसभराच्या विक्रीच्या नफ्यावर आपली रोजीरोटी चालवणार्‍या सर्वसामान्य विक्रेत्यांना.

शाळा, कॉलेजचे बंद होतात, त्यामुळे विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होते आणि शिक्षकांच्या मनस्तापात भर पडते. रस्त्यांवरची झाडे तोडून रस्ते अडवले जातात. त्यामुळे रुग्णवाहिकांना वाट मिळत नाही. दिरंगाईमुळे रुग्ण दगावतात. सरकारचे हजारो कोटींचे नुकसान होते. भडकलेल्या गर्दीला डोके असते, पण मेंदू नसतो, छाती असते, परंतु ह्रदय नसते. म्हणऊन गर्दी जमा झाल्यामुळे आंदोलने यशस्वी होतातही, मात्र त्यातून जबाबदारी येत नाही. गर्दीला नियंत्रण नसते त्यामुळे एखाद्यावेळी संचारबंदी लागू करावी लागते. अर्ध सैनिक दलाचे जवान तैनात करावे लागतात, ही गोष्टी नक्कीच भूषणावह नाही. मात्र, ज्यांनी हा बंद पुकारला ते आपल्याच धुंदीत असतात. त्यांच्यामध्ये ‘यशस्वी बंद’चे श्रेय उपटण्यासाठी स्पर्धा लागते. कुठल्याही समाजावर अन्याय होत असेल, तर त्याचा विरोध व्हायलाच हवा. कुठल्याही समाजाविषयी द्वेष पसरवणे हे आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे. कायदा मोडला किंवा ज्यांनी दंगल घडवली त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, त्याचा निषेध करण्यासाठी अनेक शांततामय मार्ग आहेत. आपण वर्तमानातील समस्यांशी भिडण्यापेक्षा भूतकाळातील घटनांवरून अधिक जोडलेलो आहोत. सोशल मीडियामधून पसरवलेल्या अफवांची खातरजमा न करता आपण त्यांच्यावर डोळे झाकून विश्‍वास ठेवतो. घटनेने सर्वांना समान हक्क दिलेले आहेत. तरीही आपण पूर्वपरंपरांगत उच्च-नीचतेला कवटाळून बसलो आहोत.

अन्यायाविरोधात लढा देणे हा प्रत्येकाचा धर्म आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणीने सर्वांनाच पुढे जायचे आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेल्या बंदचा मार्ग अवलंबणे निषेधार्ह आहे. यातून केवळ राजकीय गदारोळ माजविता येतो. सार्‍या व्यवस्था कोलमडू देत, जनतेचे हाल होऊ देत, परंतु आपण अशा उठाठेवी करीत राहणार ही काहींंची वृत्ती बनलेली आहे.
आज देशाच्या प्रत्येक नागरिकाने मग तो कोणत्याही पक्षाचा असो, आपण सर्वप्रथम संपूर्ण समाजाचा घटक आहोत, हे विसरता कामा नये. प्रत्येकाचे हे कर्तव्य आहे की, स्वतःचे हित साधताना दुसर्‍याचे साधणे हित सोडा, निदान दुसर्‍याचे नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. प्रगतिशील असणारा आपला देश अशा प्रतिगामी वातावरण निर्मितीतून मागे खेचला जातो. पक्षाचे झेंडे घेऊन नाचणार्‍यांनी याची जाणीव ठेवली पाहिजे.