‘बंजारा’ला एसटी दर्जा वक्तव्यप्रश्‍नी लोबोंवर टीका

0
162

>> गाकुवेधकडून आंदोलनाचा इशारा

परराज्यातून गोव्यात आलेल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार, असे एका कार्यक्रमातून जाहीर करणारे गोव्याचे उपसभापती मायकल लोबो यांच्यावर काल ‘गाकुवेध’ने पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. तसेच लोबो यांनी तसा प्रयत्न केल्यास गाकुवेध आंदोलन छेडेल, असा इशारा दिला.

बंजारा समाज हा गोव्यातील नव्हे
त्या समाजातील लोक हे गोव्यात राहत असले तरी ते कर्नाटक व राजस्थान ह्या राज्यातून गोव्यात आलेले आहेत ही गोष्ट नजरेआड करता येणार नाही, असे पत्रकार परिषदेत बोलताना ऍड. सुरेश पालकर, रामकृष्ण जल्मी, राम काणकोणकर व रुपेश वेळीप यानी सांगितले.

लोबो यानी बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचा जर प्रयत्न केला तर गाकुवेधतर्फे संपूर्ण गोवाभर मोठे आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा वरील नेत्यांनी दिली.

लोबो यानी बंजारा समाजाला नव्हे नतर मूळ गोमंतकीय असलेल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. लोबो यांनी प्रयत्न केले तरी बंजारा समाज गोव्यात अनुसूचित जमातीचा दर्जा मिळू शकत नसल्याचे वरील नेत्यांनी स्पष्ट केले.