बंगळुरू अंतिम फेरीत

0
141
Sunil Chhetri of Bengaluru FC celebrates scoring from the penalty during the first semi final 2nd leg of the Hero Indian Super League between Bengaluru FC and FC Pune City held at the Sree Kanteerava Stadium, Bengaluru, India on the 11th March 2018 Photo by: Ron Gaunt / ISL / SPORTZPICS

इंडियन सुपर लीगमध्ये चौथ्या मोसमात पदार्पण करणार्‍या बंगळुरू एफसीने अंतिम फेरीत धडक मारली. येथील श्री कांतीरवा स्टेडियमवर उपांत्य फेरीतील दुसर्‍या टप्यात एफसी पुणे सिटीविरुद्ध बंगळुरूने ३-१ असा भारदस्त विजय मिळविला.
घरच्या मैदानावर कर्णधार सुनील छेत्री बंगळुरूच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने शानदार हॅट्‌ट्रिक नोंदविली. छेत्रीने १५व्या मिनिटाला खाते उघडले. दुसर्‍या सत्रात एकूण ६४व्या मिनिटाला पुण्याच्या सार्थक गोलुईने गोलरेषेपाशी छेत्रीला पाडले.

रेफ्रींना हे नीट दिसल्यामुळे त्यांनी बंगळुरूला तात्काळ पेनल्टी बहाल केली. त्यावर स्वतः छेत्रीने शानदार गोल करत आपल्या दुसर्‍या गोलाची नोंद केली. डावीकडे झेपावलेल्या कैथच्या डोक्यावरून त्याने चेंडू नेटमध्ये मारला. दोन गोलांनी पिछाडीवर पडल्यानंतरही पुण्याने अथक प्रयत्न केले. ७१व्या मिनिटाला दिएगो कार्लोस याच्याऐवजी बदली खेळाडू म्हणून जोनाथन ल्युका याला पाचारण करण्यात आले. त्याने ८२व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर बरोबरी साधली असती तर पुण्याला संधी होती, पण मग एक मिनिट बाकी असताना (८९वे मिनिट) छेत्रीने दिमास दाल्गादो याच्या पासवर हॅट्‌ट्रिक पूर्ण केली. छेत्रीने या कामगिरीसह पुण्याच्या आशा धुळीस मिळविल्या. उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील पुणेच्या होम ग्राऊंडवर झालेला बंगळुरु व पुणे यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. त्यामुळे कालच्या सामन्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते.