बंगलोरचा चेन्नईवर एका धावेने विजय

0
103

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने काल रविवारी इंडियन प्रीमियर लीगच्या १२व्या पर्वातील ३९व्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा एका धावेने पराभव केला. बंगलोरने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद १६१ धावा फलकावर लगावल्यानंतर चेन्नईचा डाव १६० धावांत रोखला. धोनीने विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले. परंतु शेवटच्या चेंडूवर आवश्यक दोन धावा चेन्नईचा संघ करू शकला नाही. ४८ चेंडूंत ५ चौकार व ७ षटकारांसह धोनीने नाबाद ८४ धावा केल्या.

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. बंगलोरकडून सलामीवीर पार्थिव पटेलने ३७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ५३ धावांची शानदार खेळी केली. त्याचा अपवाद वगळता बंगलोरच्या एकालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मधल्या फळीत डीव्हिलियर्स (२५), अक्षदीप नाथ (२४), मोईन अली (२६) यांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करताआले नाही. चेन्नईतर्फे दीपक चहर, रवींद्र जडेजा व ड्वेन ब्राव्हो यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना डेल स्टेनने वॉटसन व रैना यांना बाद करत चेन्नईला २ बाद ६ असे अडचणीत आणले. उमेशने यानंतर ड्युप्लेसी व त्यानंतर चहलने केदारला तंबूचा रस्ता दाखवून चेन्नईची ४ बाद २८ अशी दैना केली. अंबाती रायडू (२९) याच्यासह धोनीने पाचव्या गड्यासाठी ५५ धावा जोडत संघाचा कोसळता डोलारा सावरला. दुसर्‍या टोकाने गडी बाद होत असताना धोनीचे धावा जमवणे सुरुच होते. डावातील शेवटचे षटक उमेश यादव टाकणार हे टार्गेट करून धोनीने फलंदाजी केली. शेवटच्या षटकात २६ धावांची आवश्यकता असताना धोनीने पहिल्या चेंडूवर चौकार व पुढील दोन्ही चेंडूवर षटकार ठोकले.

चौथ्या चेंडूवर दोन धावा घेतल्यानंतर पाचव्या चेंडूवर धोनीने पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेबाहेर भिरकावला. शेवटच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता असताना चेंडू धोनीच्या बॅटला लागला नाही. ‘बाईज’ची एक धाव घेऊन सामना बरोबरीत सोडविण्याच्या प्रयत्नात पार्थिवच्या थेट फेकीवर शार्दुल ठाकूर धावबाद झाल्याने बंगलोरने एका धावेने थरारक विजयाला गवसणी घातली.