फ्रान्स सेमीफायनलमध्ये

0
106

>> उपांत्यपूर्व फेरीत उरुग्वेला २-० ने नमविले

फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या काल शुक्रवारी झालेल्या सामन्यात १९९८च्या विजेत्या फ्रान्सने उरुग्वेचा २-० असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. फ्रान्सकडून राफेल वाराने आणि एंटोइन ग्रीझमन यांनी प्रत्येकी एक गोल केला.

फिफा क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या फ्रान्सने चौदाव्या स्थानावरील उरुग्वेवर सामन्याच्या सुरुवातीपासून दबाव टाकला आणि आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना ४०व्या मिनिटाला झाला. ग्ग्रीझमनच्या फ्री किकवर गोल करत राफेल वाराने याने फ्रान्सला १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. तत्पूर्वी, फ्रान्सचा आघाडीपटू एम्बापे याने १५व्या मिनिटाला गोल करण्याची सोपी संधी दवडली. त्याने लगावलेला हेडर गोलबारवरून गेला. मध्यंतरापर्यंत फ्रान्सने १-० अशी आघाडी कायम राखली. उरुग्वेचा स्टार एडिन्सन कवानी हा दुखापतग्रस्त झाल्याने फ्रान्सविरुद्ध खेळू शकला नाही. याची जबर किंमत त्यांना मोजावी लागली.

मध्यंतरानंतर उरुग्वेने अनेकवेळा फ्रान्सच्या बचावाला भेदण्याचा प्रयत्न केला परंतु ते यात अपयशी ठरले. त्यानंतर फ्रान्सने उरुग्वेच्या गोलक्षेत्रावर हल्ला चढवला. ६१ व्या मिनिटाला गोलरक्षकाच्या चुकीमुळे फ्रान्सच्या ग्रीझमन याने मारलेला फटका गोलमध्ये गेला आणि फ्रान्सने आपली आघाडी दुप्पट केली. ग्रीझमन याने २५ यार्ड अंतरावरून मारलेला कमकुवत फटका गोलरक्षक मुसरेला सहज अडवेल असे दिसत असताना त्याच्या हातांमधून जाऊन चेंडू गोलजाळीत विसावला. ७१व्या मिनिटाला कॉरेंटिन टोलिसो याने व यानंतर ग्रीझमनने दिशाहीन फटके खेळत अधिक मोठा विजय साकार करण्याची संधी दवडली.

त्यानंतर सामन्यामध्ये एकही गोल झाला नाही. या दरम्यान, फ्रान्स आणि उरुग्वेच्या खेळाडूंमध्ये थोडी बाचाबाचीही झाली. अखेर मैदानावरील पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली आणि फ्रान्सच्या खेळाडूंसह प्रशिक्षक आणि उपस्थित प्रेक्षकांनी तुफान जल्लोष केला. फ्रान्सचे आक्रमण विरुद्ध उरुग्वेचा बचाव या स्वरूपाचा हा सामना होता. उरुग्वेने या सामन्यापूर्वी संपूर्ण स्पर्धेत केवळ एक गोल स्वीकारला होता. त्यामुळे मार्टिन केसेरेस, जोस मारिया गिमनेज, डीएगो गॉडीन आणि लक्झाल्ट या बचावफळीची तटबंदी भेदणे हा फ्रान्सच्या आक्रमण फळीपुढचे आव्हान होते. परंतु, याच बचावफळीने दगा दिल्याने उरुग्वेला परतीचा रस्ता धरावा लागला.