फ्रान्सच्या ‘१२० बिट्‌स पर मिनिट’ला सुवर्ण मयूर

0
159

>> इफ्फीचा शानदार समारोप

>> महानायकाचा पर्सनॅलिटी ऑफ द इयरने सन्मान

काल झालेल्या इफ्फीच्या शानदार समारोप सोहळ्यात ‘१२० बिट्‌स पर मिनिट’ ह्या फ्रेंच चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयूर पुरस्कार प्राप्त झाला. सुवर्ण मयुराबरोबरच रोख ४० लाख रु. व प्रशस्तीपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. रोख रक्कम चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांना विभागून देण्यात येणार आहे. रॉबीन कांपिलो यांनी ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. उत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयुर व १५ लाख रु.चा पुरस्कार चीनचे दिग्दर्शक व्हिवियान क्यू यांना त्यांच्या ‘एंजल्स विअर व्हाईट’ ह्या चित्रपटासाठी प्राप्त झाला.

उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार नेह्युएल पेरेझ बिस्कारयत यांना त्यांच्या ‘१२० बिट्‌स पर मिनिट’ ह्या चित्रपटातील एड्‌स रुग्णाच्या भूमिकेसाठी मिळाला तर उत्कृष्ट अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार अभिनेत्री पार्वथी टी. के. यांना ‘टेक ऑफ’ ह्या चित्रपटातील परिचारिकेच्या भूमिकेसाठी मिळाला. उत्कृष्ट अभिनेता व उत्कृष्ट अभिनेत्री यांना प्रत्येकी रौप्य मयुर व १० लाख रु. पुरस्कार रूपात देण्यात आले.
मनोज कदम यांच्या ‘क्षितीज अ होराईझन’ ह्या मराठी चित्रपटाला आय्‌सीएफ्‌टी युनेस्को गांधी पुरस्कार प्राप्त झाला. महेश नारायणन् यांना त्यांच्या ‘टेक ऑफ’ ह्या मल्याळम् चित्रपटासाठी पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक हा विशेष ज्युरी पुरस्कार प्राप्त झाला. १५ लाख रु. व प्रमाणपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे. दिग्दर्शकाचे उत्कृष्ट फिचर फिल्म यासाठीचा रौप्य मयुर पुरस्कार ‘डार्क स्कल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक किरो रुसो या बोलिव्हियन दिग्दर्शकाला मिळाला.

इगोयान यांना जीवनगौरव
कॅनडाचे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ऍटोम इगोयान यांचा ह्यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. १० लाख रु. रोख, प्रमाणपत्र, शाल व गौरवपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
समारोप सोहळ्याचे सूत्रसंचालन करण जोहर, सोनाली बेंद्रे व झायरा वसीम यांनी केले. समारोप सोहळ्याचा शुभारंभ सुप्रसिद्ध पार्श्‍वगायक पापॉन यांच्या गाण्याने झाला. तद्नंतर सुप्रसिद्ध अभिनेते सलमान खान व त्यांच्या ‘ट्युबलाईट’ ह्या चित्रपटातील बाल कलाकाराने रंगमंचावर विनोद सादर केले.

सिध्दार्थ मल्होत्राचे नृत्य
सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते सिद्धार्थ मल्होत्रा यांचा नृत्याचा कार्यक्रम हेही समारोप सोहळ्याचे एक आकर्षण ठरले. ह्या वर्षाचा उत्कृष्ट अभिनेत्यासाठीचा पुरस्कार प्राप्त झालेले अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांच्या काही गाण्यांवर नृत्य सादर करून सिध्दार्थ मल्होत्रा यांनी अमिताभ बच्चन यांना यावेळी मानवंदना दिली.समारोप सोहळ्यासाठी उभारलेला विशेष रंगमंच व त्यावरील खास रोषणाई ही नेत्रदीपक होती. संपूर्ण कार्यक्रमात भाषणांना फाटा देण्यात आला. फक्त पुरस्कार प्राप्त कलाकारांनी तेवढे आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री स्मृती इराणी, गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, अन्य नेते व हिंदी व प्रादेशिक चित्रपटांतील कलाकार मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

 

... अन् अक्षय कुमारच्या गोष्टीने ‘बिग बी’चे डोळे पाणावले
अमिताभ यांना पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी अभिनेते अक्षय कुमार यांनी रंगमंचावर बच्चन यांची सांगितलेली एक गोष्ट ऐकून महानायकाचे डोळे पाणावले. बच्चन यांचे काश्मीर येथे चित्रीकरण सुरू होते. आपण आपल्या वडिलांना घेऊन चित्रिकरण पहायला गेलो होतो. १९८० सालची ती गोष्ट. त्यावेळी माझे वय १२ वर्षे होते. मी बच्चन यांचा ऑटोग्राफ घ्यायला गेलो. ते त्यावेळी द्राक्षे खात होते. त्यांनी ऑटोग्राफ दिला. पण माझे लक्ष द्राक्षांवर होते. एक द्राक्षं खाली पडलं होतं. ते मी उचललं. बच्चन यांनी जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यांनी मला मुठभर द्राक्षं दिली. त्यांच्या त्या कृतीचा माझ्या मनावर खोलवर परिणाम झाला. अमिताभ बच्चन यांच्याकडून आपण खूप काही शिकलो. चित्रीकरणासाठी वेळेवर येणे, जीव तोडून काम करणे हे काही गुण आपण त्यांच्याकडून घेतल्याचे त्यांनी यावेळी नम्रपणे सांगितले.

आपल्या हृदयात गोव्याला
विशेष स्थान : अमिताभ
आपल्या कारकिर्दीचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्थानी’ हा गोव्याच्या क्रांती लढ्यावर आधारित होता व त्याचे चित्रीकरणही गोव्यातच झाले होते. त्यामुळे आपल्या हृदयात गोव्याला विशेष स्थान आहे, असे अमिताभ बच्चन यांनी काल पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले. महानायक अमिताभ बच्चन यांचा काल इफ्फीच्या समारोप सोहळ्यात चित्रपट क्षेत्रातील दीर्घकालीन सेवेबद्दल या वर्षासाठीचा व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री स्मृती ईराणी यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. १० लाख रु. रोख व प्रमाणपत्र त्यांना पुरस्काराच्या रूपात देण्यात आले.

बच्चन यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याने त्यांच्या चाहत्यांनी काल समारोप सोहळ्याला गर्दी केली होती. आकर्षक सूटमधील बच्चन यांनी शामाप्रसाद स्टेडियममध्ये प्रवेश करताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला. अमिताभ बच्चन यांना प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याने त्यांच्या पत्नी जया बच्चन, पुत्र अभिषेक, कन्या श्वेता, स्नुषा ऐश्‍वर्या राय बच्चन असे त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सोहळ्याला हजर राहतील अशी अपेक्षा होती. मात्र, अमिताभ बच्चन हे सोडल्यास त्यांच्या कुटुंबातील एकही व्यक्ती यावेळी हजर नव्हती.

अन् अमिताभ भावूक बनले
काल अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार प्रदान करण्याच्या प्रसंगी त्यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव झाल्याने तसेच त्यांच्या चित्रपटातील गाण्यांवर सिध्दार्थ मल्होत्रा यांनी नृत्याचा कार्यक्रम केल्याने सूत्रसंचालकांसह सर्वच लोकांनी अमिताभ यांच्या नावाचा जयघोष केल्याने ते कधी नव्हे एवढे भावूक बनले. तद्पूर्वी बच्चन यांच्या चित्रपट कारकिर्दीचा आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली.