फोंड्यात दुसरे कोविड इस्पितळ सुरू : मुख्यमंत्री

0
193

>> कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात

फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाचे कोविड हॉस्पितळात रूपांतर करण्यात आले असून फोंडा परिसरातील नागरिकांना फर्मागुडी येथील दिलासा केंद्रात वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळाचे दुसर्‍या कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. फोंड्यातील कोविड इस्पितळात रुग्णांना दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णांमुळे कोविडसाठी नवीन साधनसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

फोंड्यातील वैद्यकीय
सुविधा दिलासा केंद्रात
फोंडा भागातील नागरिकांची वैद्यकीय सेवेअभावी गैरसोय होऊ नये म्हणून फर्मागुडी येथील दिलासा केंद्रात वैद्यकीय सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिलासा केंद्राने आपली जागा वैद्यकीय सेवेसाठी उपलब्ध करून दिली ही चांगली बाब आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळाचे कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर राजकीय नेत्यांनी नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करण्यासाठी फोंड्यात पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली होती.