फोंड्यात चालत्या मालवाहू ट्रकमध्ये चालकाचा मृत्यू

0
151

मालवाहू ट्रकाच्या चालकाला ट्रक चालवत असताना हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू होण्याची घटना काल सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास खांडेपार, फोंडा येथील पुलावर घडली. दुर्दैवी चालकाचे नाव झेबीला अफझल खान पठाण (५०, डिचोली) असे असून झटका येण्यापूर्वी त्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेतल्याने मोठा अपघात टळला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए-०४-टी-५३०९ क्रमांकाचा मालवाहू ट्रक फोंडा येथे जात होता. खांडेपार पूल ओलांडताना चालकाला अचानक त्रास होऊ लागल्याने त्याने ट्रक पुलाच्या बाजूला कडेला पार्क केला. त्यामुळे वाहतूक खोळंबली. यावेळी तिथे असलेल्या पोलिसांनी ट्रक जवळ जाऊन पाहणी केली असता चालक आपल्या सीटवर कोसळल्याचे दिसून आले. त्वरित १०८ रुग्णवाहिका बोलवून चालकाला उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले. मात्र, इस्पितळात पोचण्यापूर्वी चालकाचे निधन झाले.

फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी पंचनामा करून मृतदेह गोमेकॉत पाठवून दिला. संध्याकाळी डॉक्टरांनी दिलेल्या अहवालात चालकाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे निष्पन्न झाले. ट्रक पुलावर थांबविल्याने पुलाच्या दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र, वाहतूक पोलिसांनी बारावीचे विद्यार्थी वेळेवर पोहचावे म्हणून खासगी बसेस फोंड्याच्या दिशेने सोडल्या. त्यामुळे विद्यार्थी वेळेवर परीक्षेल पोहचले.