फोंडा व साखळी पालिकांची निवडणूक जाहीर

0
164

>> फोंड्यात २९ एप्रिलला तर साखळीत ६ मे रोजी मतदान

>> मतमोजणी ७ मे रोजी

गोवा राज्य निवडणूक आयोगाने फोंडा आणि साखळी या दोन्ही नगरपालिकांचा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर केला आहे. फोंडा नगरपालिकेसाठी २९ एप्रिल आणि साखळी नगरपालिकेसाठी ६ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. दोन्ही पालिकांची मतमोजणी ७ मे रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त आर. के. श्रीवास्तव यांनी निवडणूक अधिसूचना काल जारी केली.

फोंडा नगरपालिकेच्या १५ प्रभागांसाठी ६ ते १३ एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. ८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. १६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. १७ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. २९ एप्रिल रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेण्यात येणार आहे. ७ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी फोंडा उपजिल्हाधिकार्‍यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मामलेदार कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात मतमोजणी केली जाणार आहे.

साखळी नगरपालिकेच्या १३ प्रभागांसाठी १२ ते २० एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. सकाळी १० ते दुपारी १ यावेळेत अर्ज स्वीकारण्यात येतील. १४ आणि १५ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. २१ एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. २३ रोजी सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. त्याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. ६ मे रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ यावेळेत मतदान घेण्यात येणार आहे. ७ मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी डिचोलीच्या उपजिल्हाधिकार्‍यांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मतमोजणी सर्वण येथील नारायण झांट्ये बहुउद्देशीय क्रीडा संकुलात केली जाणार आहे.

फोंडा पालिकेचे राखीव प्रभाग
नगरविकास खात्यातर्फे फोंडा पालिका निवडणुकीसाठी महिला व ओबीसी राखीव प्रभागांची घोषणा करण्यात आली आहे. महिलांसाठी १,४,९, १२,१३ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ओबीसीसाठी १,८,११ आणि १३ प्रभाग राखीव ठेवण्यात आले आहेत.