फोंडा पोलिसांत आणखी १४ पॉझिटिव्ह

0
191

>> कोरोनाबाधितांची संख्या १८ वर

>> मुख्यालयाकडून दखल

फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे बुधवारी स्पष्ट झाल्यानंतर काल गुरुवारी एका गृहरक्षकाबरोबर एकूण चौदा पोलिसांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसेच एका रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांशी संबंधित एकूण आकडा अठरावर गेला आहे. फोंडा तालुक्याबरोबरच लगतच्या तालुक्यातील रुग्णांचा त्यात समावेश असून माशेलमध्ये तीन रुग्ण सापडले आहेत.

फोंडा पोलीस स्थानकातील अजून पंचेचाळीस जणांचा अहवाल येणे बाकी आहे. फोंडा पोलीस स्थानकाशी निगडित घटकांची चाचणीही करण्यात आली असून हा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे. दरम्यान, कोरोनासंबंधी उगाच कुणी भीती बाळगू नये, कोरोनाशी लढा देण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच अफवा पसरवू नये असे आवाहन फोंड्याचे आमदार रवी नाईक व इतरांनी केले आहे.

पोलीस मुख्यालयाकडून दखल
फोंड्यातील पोलीस स्थानकात कोरोना रुग्ण सापडल्याची गंभीर दखल पोलीस मुख्यालयाने घेतली आहे. सकाळी पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य यांनी फोंड्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. फोंडा पोलीस स्थानक इमारत सॅनिटाईज करण्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या जवानांनी इमारत व परिसरात निर्जंतुकीकरणासाठी फवारणी केली. जनतेचा जास्त संपर्क फोंडा पोलीस स्थानकाशी येऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी अशी सूचनाही परमादित्य यांनी केली. फोंडा पोलीस स्थानक सध्या लोकांसाठी बंद करण्यात आले आहे. काही अत्यावश्यक बाबी तसेच तक्रारींसंबंधी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.