फोंडा पालिकेसाठी ७६.४३ टक्के मतदान

0
150

>> रवी नाईक – केतन भाटीकर यांच्यात बाचाबाची

>> ७ मे रोजी मतमोजणी

फोंडा पालिकेच्या १५ प्रभागांसाठी काल झालेल्या निवडणुकीत एकूण ७६.४३ टक्के मतदान झाले असून दि. ७ मे रोजी मतमोजणी होणार आहे. कॉंग्रेस व मगो समर्थकांमध्ये काही ठिकाणी झालेले किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत पार पाडले. प्रचारावेळी भाजप व मगो नेत्यांनी एकमेकांवर चिखलफेक करून प्रचाराची रंगत वाढविली होती. मात्र, मतदानावेळी कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक व मगोचे केतन भाटीकर यांच्यात झालेली बाचाबाची परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

काल सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत मतदान झाले. एकूण १५,९७५ मतदारांपैकी १२,२०९ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. ६१४८ पुरुष तर ६०६१ महिला मतदारांनी मतदान केले. सर्वाधिक मतदान प्रभाग १४ मध्ये (८२.७५) तर कमी मतदान प्रभाग १२ मध्ये (६८.३३) टक्के झाले आहे. मतदानावेळी सेंट मेरी हायस्कूल केंद्रावर मोठी गर्दी होती. काही प्रभागांमध्ये कॉंग्रेस व मगोच्या समर्थकांमध्ये वाद झाला. मात्र, पोलीस व भरारी पथक असल्याने वाद वाढला नाही. मतदानासाठी विविध केंद्रात काही वेळ मतदारांच्या रांगा होत्या.

रवी नाईक – भाटीकर वाद
आमदार रवी नाईक सकाळी १० वाजण्याच्या सुमारास पंडितवाडा येथे गेले असता केतन भाटीकर यांनी तिथे जाऊन आमदारांना माघारी परतण्याची विनंती केली. मात्र, आमदार असल्याने कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आपणाला कोणीच रोखू शकत नसल्याचे सांगताच दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी भरारी पथक तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. तसेच राजेश वेरेकरसुद्धा त्याठिकाणी पोचल्याने आमदार रवी नाईक व त्यांच्यात शाब्दिक चकमक झडली. शेवटी भरारी पथकाच्या अधिकार्‍यांनी व पोलिसांनी मध्यस्थी करून सर्वांना बाजूला केले.
आमदार रवी नाईक यांनी फोंड्यात पालिका निवडणुकीत मोठे परिवर्तन होणार असल्याचा धसका विरोधकांनी घेतला असल्याने सदर नाट्य घडले असल्याचे सांगितले. आमदार म्हणून मतदारसंघात फिरण्याचा अधिकार असून केतन भाटीकर आपल्याला कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी रोखू शकत नाही. पंडितवाडा येथे मतदान केंद्र नसल्याचेही आमदार रवी नाईक यांनी सांगितले.

७४ जणांचे भवितव्य सीलबंद
फोंडा पालिकेच्या निवडणुकी पूर्वी भाजप व मगो समर्थकांमध्ये संघर्ष सुरू होता. मात्र, निवडणुकीच्या दिवशी मगोचे केतन भाटीकर व आमदार रवी नाईक यांच्यात वाद झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. एकूण ७४ उमेदवारांचे भवितव्य काल मतपेटीत सीलबंद झाले. रिंगणात म. गो. च्या रायझिंग फोंडा, भाजपच्या फोंडा नागरिक समिती, कॉंग्रेसच्या फोंडा नागरिक प्रागतिक मंच या मुख्य पॅनलसह स्वाभिमानी फोंडेकर पॅनलचे मिळून ४७ तर २७ स्वतंत्र उमेदवार उतरले आहेत. मतमोजणी दि. ७ मे रोजी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांबरोबरच मतदारांना निकालाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.