फॉर्मेलीन प्रश्‍नावर कॉंग्रेसकडून जनतेची दिशाभूल : आरोग्यमंत्री

0
109

कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी मासळीतील फॉर्मेलीनच्या प्रश्‍नावर नागरिकांमध्ये दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नये. सरकार राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहे, असे प्रतिपादन आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत काल केले.

अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) परराज्यातील येणार्‍या मासळीची दोन्ही तपासणी नाक्यांवर योग्य प्रकारे तपासणी केल्यानंतर मासळीची वाहतूक करण्यास मान्यता दिली जात आहे. कॉंग्रेस पक्षाकडे काहीच मुद्दे नसल्याने केवळ जनतेची दिशाभूल करणारी वक्तव्ये केली जात आहेत, असा दावा आरोग्यमंत्री राणे यांनी केला.

सरकार नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर आहे. मासळीतील फॉर्मेलिनच्या प्रश्‍नावरून नागरिकांत पसरलेले भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तर, कॉंग्रेस पक्षाचे नेते बेजबाबदार वक्तव्ये करून फॉर्मेलिनच्या प्रश्‍नावरून लोकांच्या मनातील भीती आणखीन वाढविण्याचे काम करीत आहेत. एफडीएची दोन वेगवेगळी पथके पत्रादेवी आणि पोळे येथील तपासणी नाक्यांवर तैनात करण्यात आलेली आहेत, ते म्हणाले.