फॉर्मेलीन प्रकरणी सरकारने जनतेच्या आरोग्याशी खेळू नय

0
134

>> प्रदेश कॉंग्रेसाध्यक्षांचा इशारा

परराज्यातून येणार्‍या ट्रकांतील मासळीची तपासणी सीमेवर करणे शक्य नसून फॉर्मेलीन प्रकरणी गोवा सरकारने गोव्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ मांडू नये, असा इशारा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल येथे पत्रकार परिषदेत दिला. परराज्यातील मासळीवर सरकारने कायमची बंदी घालावी, अशी मागणीही त्यांनी केली.

एका ट्रकातील मासळीचे किती नमुने घेऊन तपासणी करणार असा सवाल त्यांनी केला. मध्यरात्रीच हे ट्रक गोव्यात दाखल होतात. ह्या ट्रकांची संख्या भरपूर असते व ट्रक मासळीने भरगच्च भरलेले असतात. अशा परिस्थितीत मासळीची तपासणी करणे अशक्य असल्याचा दावा त्यांनी केला. दर एका ट्रकातील वरवरच्या मासळीचे नमुने गोळा करून ते तपासता येतील. याला तपासणी म्हणता येणार नसल्याचे सांगून ह्या मासळीवर कायमची बंदी घाला. अन्यथा मासळीच्या कंत्राटदारांना रेफ्रिजरेटर युक्त ट्रकांतून मासळी पाठवण्याची अट घालावी, अशी मागणी चोडणकर यांनी केली.

मासळीची तपासणी करण्यासाठी सध्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे आवश्यक ती यंत्रणा नसल्याचे यापूर्वीच उघड झाले असल्याचे चोडणकर म्हणाले. फॉर्मेलीन प्रकरणी सरकारने अद्याप कुणालाच अटक कशी केली नाही, असा सवालही चोडणकर यांनी यावेळी केला. परराज्यातील मासळी माफियांविषयी सरकारला एवढे प्रेम का आहे, असा सवाल त्यांनी केला.