फेड कप फायनल्स होणार पुढील वर्षी

0
165

 

नवीन स्वरुपातील फेड कप फायनल्स स्पर्धेचे पहिले सत्र पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफ) काल शुक्रवारी जाहीर केले. १२ देशांचा समावेश असलेली ही स्पर्धा एप्रिल महिन्यात बुडापेस्ट येथे होणार होती.
परंतु, कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व टेनिस कोर्टस् बंद करण्यात आल्यामुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. पुढील वर्षी १३ ते १८ एप्रिल या कालावधीत हंगेरीच्या राजधानीतील लाझलो पाप एरिनावरील इनडोअर क्ले कोर्टवर ही स्पर्धा होणार आहे.
यंदाच्या शेवटच्या सहामाहीत लाझलो पाप एरिना स्पर्धा आयोजनासाठी उपलब्ध नव्हते. स्पर्धा झाली असती तर प्रेक्षकांविना ती खेळवावी लागली असती. १२ देशांतील जवळपास ६० खेळाडू व साहाय्यक पथकातील सदस्य एकत्र येणार होते. त्यामुळे कोरोना संक्रमणाचा धोकादेखील होता. त्यामुळे स्पर्धा पुढे ढकलणे सोयीचे ठरणार असल्याचे ‘आयटीएफ’ने म्हटले आहे. बुटापेस्टमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्पर्धेचे पहिले सत्र यशस्वी होईल, असा विश्‍वास आयटीएफचे अध्यक्ष डेव्हिड हागेर्ती यांनी व्यक्त केला आहे.
ऑस्ट्रेलिया, बेलारुस, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, फ्रान्स, जर्मनी, यजमान हंगेरी, रशिया, स्लोवाकिया, स्पेन, स्वित्झर्लंड व अमेरिका हे देश या स्पर्धेत खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत.