फेडरर हरला!

0
79

>> अँडरसनने उपांत्यपूर्व फेरीत नमविले

विद्यमान विजेत्या रॉजर फेडरर याचे विंबल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील आव्हान काल बुधवारी आटोपले. दोन सेटच्या आघाडीनंतर ‘मॅच पॉईंट’ दवडल्याचा फटका त्याला पराभवाच्या रुपाने बसला. पाच सेटपर्यंत व चार तास १४ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या आठव्या मानांकित केविन अँडरसनने अव्वल मानांकित फेडररला २-६, ६-७ (५-७), ७-५, ६-४, १३-११ असे पराभूत करत यंदाच्या स्पर्धेतील सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद केली. या पराभवामुळे नवव्यांदा विंबल्डन विजेतेपद पटकावण्याचे फेडररचे स्वप्न अधुरेच राहिले.

पहिले दोन सेट जिंकल्यानंतर फेडररला अँडरसनकडून प्रतिकाराची अपेक्षा नव्हती. परंतु, अँडरसनने किल्ला लढवताना फेडररची दमछाक केली. अँडरसनने तब्बल २८ बिनतोड सर्व्हिस करताना ६५ विजयी फटके लगावले. केविन करन (१९८३) याच्यानंतर विंबल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा अँडरसन हा पहिलाच खेळाडू ठरला. दुसर्‍या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सर्बियाच्या नोवाक जोकोविचने जपानच्या केई निशिकोरीला ६-३, ३-६, ६-२, ६-२ असे पराभूत केले.