फेडरर, बार्टीची विजयी सलामी

0
113

स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर व महिला एकेरीतील अव्वल मानांकित ऍश्‍ले बार्टी यांनी ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत काल सोमवारी विजयी सलामी देताना दुसरी फेरी गाठली.

फेडररने अमेरिकेच्या स्टीव जॉन्सन याचा सरळ तीन सेटमध्ये ६-३, ६-२,६-२ असा पराभव केला तर बार्टीने डळमळीत सुरुवातीनंतर युक्रेनच्या लेसिया सुरेंकोला ५-७, ६-१, ६-१ असे पराजित केले.

महिला एकेरीत जपानच्या तृतीय मानांकित नाओमी ओसाका व अमेरिकेच्या आठव्या मानांकित सेरेना विल्यम्स यांना विजयासाठी अधिक घाम गाठावा लागला नाही. ओसाकाने झेक प्रजासत्ताकच्या मेरी बुझकोवा हिला ६-२, ६-४ अशी तर सेरेनाने रशियाच्या अनास्तिसिया पोटापोवाला ६-०, ६-३ अशी धूळ चारली. अमेरिकेच्या २४व्या मानांकित स्लोन स्टीफन्स हिला बाहेरचा रस्ता धरावा लागला. चीनच्या बिगरमानांकित शुआय झांगने स्टीफन्सला २-६, ७-५, ६-२ असे हरविले. सर्बियाच्या द्वितीय मानांकित नोवाक जोकोविचला जर्मनीच्या जॉन लिनार्ड स्ट्रफ याने चार सेट झुंजवले. २ तास १६ मिनिटे चाललेला हा सामना जोकोविचने ७-६, ६-२, २-६, ६-१ असा जिंकला.

कॅनडाच्या १३व्या मानांकित डॅनिस शापोवालोव याला मात्र पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. इटलीच्या मार्टन फुकसोविच याने शापोवालोवला ६-३, ६-७, ६-१, ७-६ असे अस्मान दाखवून दिवसातील सर्वांत धक्कादायक निकालाची नोंद केली.
अन्य महत्त्वाचे निकाल ः पुरुष एकेरी ः पहिली फेरी ः स्टेफानोस त्सित्सिपास (६) वि. वि. साल्वातोर कारुसो ६-०, ६-२, ६-३, माटिओ बार्रेटिनी (८) वि. वि. अँडी हॅरिस ६-३, ६-१, ६-३, ग्रिगोर दिमित्रोव (१८) वि. वि. युआन इग्नासियो लोंडेरो ४-६, ६-२, ६-०, ६-४, बेर्ना कोरिक (२५) पराभूत वि. सॅम क्वेरी ३-६, ४-६, ४-६