फेडररच्या गुणांत घट

0
117

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने काल सोमवारी जाहीर केलेल्या एटीपी क्रमवारीत ‘टॉप २०मध्ये मोेठे फेरबदल दिसून आले. रॉजर्स कप स्पर्धा जिंकून स्पेनच्या राफेल नदालने आपले अग्रस्थान अधिक भक्कम करताना दुसर्‍या स्थानावरील रॉजर फेडरर याच्यावर ३७४० गुणांची मोठी आघाडी घेतली आहे. नदालने १० हजार गुणांचा टप्पा ओलांडताना १०,२२० गुण आपल्या खात्यात जमा केले आहे. दुसरीकडे फेडररच्या खात्यात ६४८० गुण आहेत. मागील आठवड्यापेक्षा त्याच्या गुणांत ६०० ची घट झाली आहे. अर्जेंटिनाच्या युआन मार्टिन डेल पोट्रो याने जर्मनीच्या आलेक्झांडर झ्वेरेवला चौथ्या स्थानी ढकलत तिसरे स्थान प्राप्त केले आहे.

रॉजर्स कप स्पर्धेच्या उपविजेत्या स्टेफानोस त्सित्सिपास याने १२ स्थानांची मोठी मजल मारत १५वे स्थान आपल्या नावे केले आहे. भारतीय खेळाडूंचा विचार केल्यास युकी भांब्री (+ २, ९७वे स्थान), प्रज्ञेश गुणेश्‍वरन (+ १०, १६१वे स्थान) यांनी प्रगती केली आहे. एका क्रमाने घसरताना रामकुमार ११८व्या स्थानी पोहोचला आहे. दुहेरीतील भारताचा सर्वोत्तम खेळाडू रोहन बोपण्णा (-४, ३२वे स्थान) याची घसरण झाली आहे. टेनिसपासून दूर असलेला सानिया मिर्झा (-१, ३९वे स्थान) भारताची महिला दुहेरीतील सर्वोत्तम खेळाडू आहे. एकेरीत अंकिता रैना (+ ६, १८७वे स्थान) व करमन थंडी (+ १, १९७वे स्थान) यांनी सकारात्मक दिशेने वाटचाल केली आहे.

स्पेनचा राफेल नदाल रॉजर्स कप चॅम्पियन
स्पेनच्या ३२ वर्षीय राफेल नदालने स्टेफानोस त्सित्सिपास याचा ६-२, ७-६ असा पराभव केला. त्याचे हे ८०वे वर्ल्ड टूर जेेतेपद आहे. त्याने यंदाच्या वर्षातील आपले पाचवे व चौथे रॉजर्स कप विजेतेपद पटकावले. २००५, २००८ व २०१३ सालीसुद्धा त्याने ही स्पर्धा जिंकली होती. या विजयासह नदालने पुढील आठवड्यात होणार्‍या सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय देखील जाहीर केला.आगामी युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी तंदुरुस्त राहण्याच्या उद्देशाने त्याने हा निर्णय घेतला.