फुशारकी

0
87

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पोरबंदरच्या समुद्रात दहशतवाद्यांचे जहाज आढळल्याच्या प्रकरणात वादाची नवी ठिणगी पडली आहे. तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक बी. के. लोषाली यांच्या फुशारक्या आणि त्यावर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची सफाई यातून नाहक या जहाज प्रकरणाभोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे आणि अर्थातच त्याचा फायदा पाकिस्तानला भारताविरुद्ध रान पेटवण्यासाठी मिळणार आहे. तटरक्षक दलासाठी एल अँड टी कंपनीने बनवलेल्या जहाजाच्या जलावतरण कार्यक्रमात लोषाली यांनी या फुशारक्या मारल्या होत्या. आपल्याला ३१ डिसेंबरची ती रात्र आठवत असेल. ते जहाज स्फोटात उद्ध्वस्त करायचे आदेश आपण दिले होते. आपल्याला त्यांना बिर्याणी खिलवायची नव्हती, असे वक्तव्य लोषाली यांनी त्या कार्यक्रमात केले आणि त्यांच्या कोण्या हितशत्रूने त्याचा व्हिडिओ बनवून तो वृत्तपत्राकडे पाठवून वादाला तोंड फोडले. मुळात लोषाली यांचे हे वक्तव्य अत्यंत बेजबाबदारपणाचे आहे. त्या जहाजासंदर्भात संरक्षण मंत्रालयाकडून अधिकृत निवेदन आलेले असताना त्या निवेदनातील माहितीशी पूर्ण विसंगत असे वक्तव्य हे लोषाली महाशय अत्यंत आवेशाने करताना दिसतात. बहुधा त्यावेळी ते मद्याच्या अंमलाखाली असावेत असे त्यांचा चेहरा पाहिल्यास दिसते. आपण असे बोललोच नाही, पत्रकारांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला, वगैरे नंतरची सारवासारव किंवा त्यांनी संरक्षणमंत्र्यांची माफी मागणे याला काही अर्थ नाही, कारण एक तर त्यांच्या त्या विधानाचा बळकट पुरावा व्हिडिओच्या रूपाने उपलब्ध आहे आणि दुसरे म्हणजे त्यांनी माफी मागितली काय किंवा न मागितली काय, देशाचे जे नुकसान व्हायचे ते होऊन गेले आहे. लोषाली यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत गंभीर आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. भारताने पकडलेले जहाज कोणतीही शहानिशा न करता स्फोटाद्वारे उडवून दिले आणि त्यावरील दहशतवाद्यांनी ते स्वतःच पेटवून दिले अशी खोटीच माहिती जगाला दिली असा त्यांच्या त्या वक्तव्याचा अर्थ होतो. मग त्या जहाजावर दहशतवादीच होते कशावरून हा प्रश्नही उपस्थित होतो. त्यामुळे आजवर संरक्षण मंत्रालयाने जी भूमिका घेतली होती ती टिकत नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांना बेंगलुरूतील पत्रकार परिषदेत जेव्हा या विषयावर उत्तर देण्यास भाग पाडले गेले, तेव्हा ते आपल्या मंत्रालयाने यापूर्वी प्रसृत केलेल्या निवेदनाला चिकटून राहिले आणि लोषाली असे जर काही बोलले असतील, तर त्यांना कारवाईला तोंड द्यावे लागेल याचेही त्यांनी सूतोवाच केले. परंतु लोषाली यांच्यावरील कारवाईचा अर्थ आता सरकार आपला बनाव उघड करणार्‍या अधिकार्‍याचे तोंड जबरदस्तीने बंद करते आहे असा होईल आणि तेही आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारच्या प्रतिष्ठेला मारक ठरेल. परंतु अशा कारवाईवाचून सरकारपाशीही दुसरा तरणोपाय नाही. त्यामुळे लोषाली यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई अटळ आहे. मात्र, सरकारला आपली बाजू सावरून धरण्यासाठी आता या सार्‍या प्रकरणातील पुरावे जगासमोर ठेवावे लागतील आणि त्या जहाजामध्ये पाकिस्तानी दहशतवादीच होते हे सिद्ध करावे लागेल. भारताची प्रतिमा सावरण्यासाठी संरक्षणमंत्र्यांनी आता यासंदर्भातील पुरावे उघड करणे आवश्यक आहे आणि येत्या मंगळवारी आपण ते उघड करू असे आश्वासनही मनोहर पर्रीकर यांनी दिलेले आहे. कराचीच्या केटी बंदरावरून हे जहाज निघाले तेव्हापासूनचे दूरध्वनी संभाषण एनटीआरओने ध्वनिमुद्रित केले असल्याचे संरक्षण मंत्रालयाने यापूर्वी जाहीर केले होते. ते आता प्रसृत करून त्या जहाजात दहशतवादीच होते या दाव्याला बळकटी देणे आवश्यक ठरते. लोषाली यांच्यासारख्या बेजबाबदार अधिकार्‍यामुळे भारताची नाचक्की तर झाली आहेच, शिवाय ते अतिरेकी नव्हते आणि भारताने नाहक आगळीक केली असा कांगावा करण्याची संधीही पाकिस्तानला प्राप्त झाली आहे. एकीकडे भारत पाकिस्तानशी पुन्हा चर्चा सुरू करू पाहत असताना त्यामध्ये लोषाली यांच्या बेजबाबदार विधानामुळे नवा खोडा पडला आहे. राष्ट्रीय सुरक्षेशी असा खेळ मांडणे परवडणारे नाही याचे भान जबाबदार अधिकार्‍यांना असायला हवे.