फुलांवर उडती फुलपाखरे

0
1248

अवतीभवती उडणारी फुलपाखरे पाहिली की शाळेतले फुलपाखरांसारखे रंगीबेरंगी दिवस आठवतात. काहीजणांना फुलपाखरू दिसताच लहानपणी अभ्यासलेल्या कवितेतली ‘फुलपाखरू| छान किती दिसते’ ही पहिली ओळ आठवते. मला या कवितेबरोबरच ‘धरू नका ही बरे’ ही फुलपाखरांवरची आणखी एक कविता आठवते.
तिसरीच्या ‘बालभारती’ पाठ्यपुस्तकात ही कविता होती. उडत्या फुलपाखरांमागे धावण्याचे ते मजेचे दिवस. पहिल्या-दुसर्‍या इयत्तेपासूनच फुलपाखरांविषयी कमालीचं आकर्षण वाटत होतं. मला आठवतं, दुसरीच्या पाठ्यपुस्तकात कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता होती- ‘हळूच या हो हळूच या!’ या कवितेतली फुलं कोणाला तरी बोलावीत आहेत. गोड सकाळी दवबिंदूंचे सडे पडलेले आहेत अन् हिरव्या पानांतून फुलं वर आलेली आहेत. त्यांची हृदयं इवलीशीच आहेत. पण ती गंधांच्या राशींनी भरलेली आहेत. आपण उधळीत असलेला सुगंध सेवन करण्यासाठी फुलं आपल्यालाच तर बोलावीत आहेत. या कवितेत फुलपाखरांचा कुठंच उल्लेख नाही. पण हे आमंत्रण आम्हा माणसांसाठी नव्हे तर फुलपाखरांनाच असावं, असं सारखं वाटत होतं. या फुलांची हृदयं इतकी इवलीशी अन् निर्मळ, सुंदर होती की तिथं धसमुसळेपणा अजिबात चालणार नव्हता.
पुढे तिसरीच्या वर्गात पोहोचलो अन् पाहातो तो काय ‘बालभारती’ पाठ्यपुस्तकात चौथ्या क्रमांकावर कविता होती- ‘फुलपाखरे.’ दुसरीच्या पाठ्यपुस्तकातल्या फुलांचं आमंत्रण तिसरीच्या पाठ्यपुस्तकातल्या फुलपाखरांनी स्वीकारलेलं दिसलं. कारण ही फुलपाखरं फुलांवर उडत होती. त्यावेळी असं वाटत होतं की ‘हळूच या हो हळूच या’ ही कविता मुलांसाठी होती, तर ‘फुलपाखरे’ ही कविता आमच्यासाठी होती. या कवितेतली पहिलीच ओळ ही अशी होती- ‘धरू नका ही बरे| फुलांवर उडती फुलपाखरे|’
लहानपणी वाचताना आलेल्या फुलपाखरांवरच्या दोन कविता कधीच विसरता येणार नाहीत. एका कवितेचं शीर्षक आहे ‘फुलपाखरू’ तर दुसरीचं ‘फुलपाखरे.’ ‘फुलपाखरू’ या ग. ह. पाटील यांच्या जोडाक्षरविरहित कवितेनं लहान मुलांना भुरळ घातली. या कवितेतल्या मुलाला फुलपाखरू पकडण्याचा मोह होतो. फुलपाखराला धरायला गेलो तर ते हातालाच येत नाही, ते दूर उडतं; अशी या मुलाची गोड तक्रार आहे. तिसरीच्या पुस्तकातल्या ‘फुलपाखरे’ या कवितेच्या पहिल्याच ओळीत कवी सांगतो- ‘धरू नका ही बरे.’
पहिल्या-दुसर्‍या इयत्तेत असताना चतुर्थीची सुट्टी संपून दसरा जवळ आला की सगळीकडे फुलपाखरं उडायला लागतात. त्यांचे ‘पंख चिमुकले निळे जांभळे’ न्याहाळणं हा त्याकाळच्या मुलांना जडलेला एक छंद होता. ढग, पाऊस, ओहोळ, इंद्रधनुष्य, झाडं, पक्षी, फुलपाखरं यांव्यतिरिक्त आणखी तरी काय होतं लहानपणी? त्याकाळी आपण निसर्गाशी समरस होऊन जायचो. म्हणूनच तर फुलपाखरं वेलीवर, फुलांबरोबर गोड कशी हसतात, हे आम्हाला वर्गात शिकवावं लागलं नाही; आम्ही वर्गाच्या बाहेर नेहमीच ते दृश्य पाहात होतो.
तिसरीच्या पाठ्यपुस्तकातल्या ‘फुलपाखरे’ या कवितेनं आम्हाला बरंच काही शिकवलं. ही कविता आ. ज्ञा. पुराणिक नावाच्या कवीची आहे, हे अलीकडेच काही वर्षांपूर्वी कळलं. ‘फुलपाखरू’ कविता लिहिणार्‍या ग. ह. पाटील यांच्या काही कविता चौथ्या इयत्तेपर्यंत अभ्यासल्या असतील. परंतु पुराणिक यांच्या कविता पुढे कधी अभ्यासल्याचं आठवत नाही. शिवाय या कवीविषयी फारसं कुठं वाचायला मिळत नाही. काही कवी विपुल प्रमाणात काव्यलेखन करतात, परंतु त्यांच्या कविता पाठ्यपुस्तकात येत नसल्यामुळे ते कवी विद्यार्थ्यांपासून दूर राहातात. आ. ज्ञा. पुराणिकांसारखे कवी मात्र पाठ्यपुस्तकातल्या एकाच कवितेनं अजरामर होतात.
कुणीतरी म्हटलं आहे की, फुलपाखरं म्हणजे ईश्‍वरानं पृथ्वीला पाठवलेली प्रेमपत्र आहेत. फुलपाखरांचे रंग इतके मनमोहन आहेत की त्यांच्याविषयी कोण कसल्या कल्पना करतील याचा नेम नाही. मला पुराणिकांची ही कल्पना फारच आवडली- फुलपाखरं म्हणजे उमलून उडू लागलेल्या फुलांच्या पाकळ्या. ते म्हणतात ः
काल पाकळ्या रात्री निजल्या
सकाळ होता सगळ्या उठल्या
आणि त्याच का उडू लागल्या
पंख फुटून गोजिरे|
फुलांवर उडती फुलपाखरे
बालकवींच्या कवितेतलं चैतन्याचं गोड कोवळ ऊन या कवितेतल्या फुलपाखरांवरही पडलेलं असावं. त्यांच्यावरचं ऊन कोवळं आहेच, अन् ते हासरंदेखील आहे. त्यामुळे त्यांचे रंग ‘मजेमजेचे’ दिसू लागले आहेत. संध्याकाळच्या ढगांसारखे. फुलपाखरं फुलाफुलांशी जणू पिंगा घालीत आहेत. नयनमनोहर असं हे दृश्य. ही निसर्गाची किमया आहे. कवी आम्हाला सांगतो की, फुलपाखरांची गंमत जरा दुरूनच बघा. जवळ गेल्यावर ती ‘उडती’ फुलपाखरं उडून जातील. निसर्गसौंदर्याचा आस्वाद कसा घ्यावा, याची शिकवण या अशा कवितांमधून आम्हाला मिळत होती.
त्या नकळत्या वयात फुलपाखरं पकडून त्यांना दोरा बांधण्याचा मोहदेखील व्हायचा. तिसरीच्या वर्गात येण्याअगोदर आम्ही फुलपाखरांना स्पर्श करीत होतो आणि त्यांच्या पंखांचा बोटांवर उमटणारा रंग एकमेकांना दाखवीत होतो. तिसरीच्या पाठ्यपुस्तकातल्या कवितेतल्या या ओळी वाचल्या अन् फुलपाखरांना पकडण्याचं वा त्यांना स्पर्शदेखील करण्याचं सोडून दिलं-
हात लावता पंख फाटतिल
दोरा बांधुन पायहि तुटतिल
घरी कशी मग सांगा जातिल?
दूर तयांची घरे| फुलांवर उडती फुलपाखरे
एका वेगळ्या विश्‍वात वावरत होतो आपण त्याकाळी. त्या विश्‍वात आई-वडील, भावंडं, शिक्षक, शेजारी-पाजारी अन् फुलपाखरंदेखील होती. आपली जशी घरं असतात तशी फुलपाखरांचीही घरं असावीत, असं खरोखरच वाटायचं. आपण त्यांना पकडलं, त्यांना इजा झाली तर ती घरी कशी परततील? त्यात आणखी त्यांची घरं दूरवर आहेत… आम्हाला शाळेत मुद्दामहून कुणी ‘सहृदयता’ हे मूल्य शिकवलं नाही. ‘फुलपाखरे’सारख्या कवितांनी अशी मूल्यं आमच्यामध्ये बिंबवली. आपणाकडून फुलपाखरांनाच नव्हे तर इतरांनाही सहृदयतेची वागणूक मिळाली पाहिजे किंवा स्वतःइतकंच इतरांचं स्वातंत्र्यही आपण जपलं पाहिजे अशी शिकवण पाठ्यपुस्तकातल्या या फुलपाखरांनी आम्हाला दिली. शाळेतल्या या फुलपाखरांमुळेच आजवरच्या आयुष्यात माणुसकीचं अमानुषतेत कधी रूपांतर झालं नाही.
आजकालची मुलं हळुवार व तरल वृत्तीनं निसर्गाकडे पाहात नाहीत, अशी अनेकांची तक्रार असते. फुलपाखरं आहेत पण त्यांच्या विविध विलसितांकडे पाहाणारी निरागस वृत्ती आज हरवली आहे. शालेय पाठ्यपुस्तकातल्या ‘फुलपाखरे’ यांसारख्या कवितांमुळे आमच्यामध्ये थोडीफार संवेदनशीलता आली. त्यामुळे निसर्गाकडे अन् भोवतालच्या समाजाकडे पाहाण्याची संवेदनक्षम दृष्टी आम्हाला लाभली. म्हणूनच तर ‘फुलपाखरे’ अभ्यासल्यानंतर फुलपाखरांना कधी धरलं नसेल, पण आमच्यावर संस्कार करणारी ही कविता मात्र इतकी वर्षं झाली तरीही घट्ट धरून ठेवलेली आहे. केशवसुतांच्या कवितेतली ओळ आठवते- ‘फुलपाखराचे मरण पाहिले आहे का कोणी?’
‘फुलपाखरे’ या कवितेलाही मरण नाही!