फुलपाखरू

0
1130
40725911 - closeup butterfly on flower (common tiger butterfly)

ही कविता आपल्याला तिसरीत होती नं बहुतेक? हल्ली कधीतरी कळलं की ती ग. ह. पाटील यांची कविता आहे.
आमच्या माळवदे बाई सांगायच्या, ‘‘मराठीची पुस्तकं काढा रेऽऽ’’ बाईंनी असं सांगितलं की मराठीचा तास सुरू! छान चालीत आपण ही कविता म्हणायचो. कवितेला दिलेलं फुलपाखराचं चित्रही खूप गोड होतं. त्याच्या पंखांना हात लावावासा वाटे…
पुढे या कवितेतल्या एका ओळीचं मजेशीर विडंबन झालेलं. ‘पंख चिमुकले निळे जांभळे’ ही ओळ एक बोबडा मुलगा अशी म्हणतो- ‘पंतचि मुतले निले ज्यांभले हालवुनि झ्युलते फुलपाखलू…’ असा विनोद तेव्हा कवितेएवढाच सर्वश्रुत होता, आठवतोय?
फुलपाखराचं दुसरं नाव कोमल
फुलपाखराचं तिसरं नाव मृदुल
चौथं नाव हळूऽऽ, पाचवं नाव अळूमाळूऽ
सहावं नाजूक, सातवं साजूक
आठवं अलवार, नववं नक्षीदार
दहावं रंगीत; आणि फुलपाखरू म्हणजे
वार्‍याने रंगांना दिलेलं संगीत!
कविता मॅड असते. ती असली काहीही व्याख्या करते! पण आपण खरंखुरं बघायचं तर पुस्तकात जायला हवं. आपल्या दुसरी-तिसरीच्या सामान्यविज्ञानाच्या पुस्तकात चित्र असायचं. अंडी, अळी, कोष व कीटक अशा फुलपाखराच्या जन्माच्या चार अवस्था दाखवलेल्या असत. पण बारीक तुसांसारखी लव असणारा आणि अंगाची विळविळीत गुटली करणारा जळ्ळा तो कुसरुंड्यासारखा सुरवंटऽऽ.. ईऽऽऽऽ… मला त्याची खूप कीळस येई. पण करणार काय? फुलपाखरासाठी हे सर्व सहन करणं भाग आहे!
बरेचदा आपण पूजेची फुलं काढताना पानांच्या खाली मोहरीएवढी पांढरट अंडी दिसतात, ती फुलपाखराची. ती हाताला लागतात न् शिसारीच येते. सातवेळा हात धुतला तरी तो बुळबुळीत स्पर्श जात नाही.
या बारीकशा अंड्यांतून अळ्या किंवा सुरवंट बाहेर पडतात. ते खूप खादाड असतात. बाहेर पडल्या पडल्या आपल्या बुडाला चिकटलेलं पानच खायला सुरुवात करतात. मग काही दिवसांतच सुरवंट एक सुरक्षित जागा बघतात. आपली त्वचा, मुख सगळं सोलवटून टाकतात. एका जागी स्थिर होतात व स्वत:भोवती कोश विणू लागतात. काही दिवसांतच कोशातून एखाद्या पहाटे फुलपाखरू जन्मास येते. ओले पंख दुमडलेले असतात. ते किरणात पंख वाळवतं न् लगेच तासा दोन तासांत उडायला सुरुवात करतं. कोशातून मादी बाहेर पडणार असेल तर नर कोशाभोवती घुटमळत राहतात. जन्माला आल्यावर लगेचच त्यांचं मादीशी मीलन होणार असतं. ही सगळी जन्मप्रक्रिया एखाद दुसरा आठवडाभरच चालते. कमीत कमी आठ दिवस ते जास्तीत जास्त २-३ महिने एवढंच हे फुलपाखराचं अल्पायुष्य!
जगभरात फुलपाखराच्या लाखोंनी जाती आहेत. पश्चिम घाटातली व गोव्यातली जैव विविधता फुलपाखरांनी समृद्ध केलीय. नवीन पिढीचे आश्वासक परिसर अभ्यासक पराग रांगणेकर गेली अनेक वर्षे गोव्यातल्या फुलपाखरांच्या मागे धावताहेत. त्यांनी म्हादईच्या रानातले पक्षी व फुलपाखरांचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केलंय. विविध वृक्षांच्या परागीभवनातलं फुलपाखराचं योगदान व जीवनसाखळीचा पहिला दुवा बनण्याचं काम व त्याविषयीचं संशोधन पराग रांगणेकरांनी जगाच्या नकाशावर नेऊन ठेवलंय. साधारणपणे व्यक्ती किंवा गावाच्या नावाला पुढे ळळ जोडून किंवा नावाला शपीळी लावून नव्या जातीचं नामकरण करण्याची पद्धत आहे. जसं रिीसळळ किंवा ॠेरशपीळी असं नामकरण केलं जाऊ शकतं. इथल्या गर्द रानात अथकपणे भटकंती करून पराग यांनी पक्षी व फुलपाखरांच्या नव्या स्पिसीसचा शोध लावलाय. ड्रॅगन फ्लाय शोधून काढलंय. नव्या जातीला ॠेारपींरज्ञरशपीळी असं नाव दिलंय. राजेंद्र केरकरांसारखे त्यांचे मार्गदर्शकही गेली अनेक वर्षे प्रयत्नांचं रान पालथं घालत फिरताहेत. इथे बागडणारे पक्षी, प्राणी व शेकडो जातीचे कीटक व फुलपाखरं ही म्हादईच्या रानाची श्रीमंती आहे…
आता मला पुन्हा फुलपाखरांचे रंगीत संगीत दिवस आठवतायत की जे आपल्या आयुष्याचीच श्रीमंती बनून राहिले आहेत. पिवळी पिवळी छोटुली फुलपाखरू सगळ्यात आधी माझ्या नजरेसमोर उडू लागतात. एकेरी पाकळ्यांची केशरी झेंडूची फुलं- आपण त्याचे ठसे वहीत काढायचो. त्या केशरी फुलांमध्ये, गवताच्या तुर्‍यांवर, तगरी-अनंतावर, कुंद-कोरांटीवर सगळीकडे इवल्या इवल्या पिवळ्या फुलपाखरांचा अखंड वावर असे. मधेच एखादं काळं पांढर्‍या ठिपक्यांचं फुलपाखरू उडत येई. जरा वेळ पिवळ्यांशी गप्पा मारी व निघून जाई. मधूनच एखादं निळं ठिपकेवालं फुलपाखरू झोकात येई. कुठेतरी मधुमालतीला बहर आल्याची खबर देऊन जाई. जांभळं पट्टेवालं केशरी टिकल्यावालीच्या गळ्यात गळा घालून फिरे. एखादं पांढरं फुलपाखरू सदोदित वैराग्य आल्यासारखं फिरे…
जरा मोठं झाल्यावर शाळा व मग कॉलेजमध्ये जाऊ लागलो तसतशी आपली फुलपाखरंही जरा धीट झाली होती. नाजूक मिशांनी वास ओळखत होती. पायांनी-सोंडेने मधुरस पिऊ लागली होती. गुलाबी रंगरंगिल्या भावविश्वात आपली फुलपाखरं तरंगू लागली होती… दिवस कसे फुलपाखरासारखे उडत चालले होते. रंग माळत, मध चाखत, गंधाने न्हाऊन जात होते. अल्पायुषी फुलपाखरू आपल्या इवल्या आयुष्यात समग्र जीवनाचं दर्शन घडवत होतं…
एखाद्या रात्री लाईट जात. चिमण्या पेटवून कोंडाळं करून आम्ही अभ्यासाला बसलो की पुस्तक-वह्यांवर टुचुक टुचुक उडणारे जीव नि केंबरी पडू लागत. एखादं भलंमोठ्ठं काळं फुलपाखरू वाट चुकल्यागत खिडकीतून आत शिरे व दिव्यावर आपटायलाच येई. घरातलं मांजर नेमकं त्याला पकडायचा प्रयत्न करीत आमच्यामधून उड्या मारी… आणि तो रॉकेलचा ढणढण ‘दिया’ और त्याच्यावर जान देणारी ही ‘शम्मा’ अशा दोघांनाही वाचवता वाचवता आमच्या नाकी नऊ येत! दिवा व मांजर दोघांपासूनही वाचवून आम्ही हुश्श् करतोय तोपर्यंत ते बापडं कॅलेंडराच्या खिळ्यावर जाऊन बसे. तिथून आणखी कुठे कुठे फिरत राही…
रात्री उशिरा अगदी झोपताना लाईट येई. अंथरुण घालून आडवं पडण्याचा अवकाश, इतक्यात बरोब्बर समोर नजर जाई. अरेरे! हे बघ काय… हे सापडलंच शेवटी मेलीला… खिडकीवर एक पाल नि ते काळं फुलपाखरू यांची झटापट चाललेली दिसे. आम्ही उठून धावेपर्यंत फुलपाखरू तिने तोंडात गच्च पडकलेलं असे. त्याला गिळण्याची तिची कसरत नि तोंडात शिरता शिरता काळे पंख तेवढे हलत राहत… जेव्हा काळ्या पंखावरचा शेवटचा पांढरा ठिपका पालीच्या तोंडात शिरताना दिसे तेव्हा खरी चुटपुट लागे… काळजात खड्डा पडे न् हरल्यासारखं वाटे!
आयुष्य खूप मोठं, पण उडून जातं फुलपाखरासारखं. जगतोय जगतोय म्हणेपर्यंत जगण्याची वाट संपून गेलेली असते. धरतोय धरतोय म्हणेपर्यंत इच्छांची फुलपाखरं निसटून गेलेली असतात. हाती येतायत येतायत म्हणेपर्यंत सुखाचे क्षण फुलपाखरासारखी हुलकावणी देऊन उडून गेलेले असतात. हाताला लागलेल्या रेशमी मऊशार रंगांसारख्या फुलपंखी आठवणी तेवढ्या आपल्या हाती उरतात… आणि डोळ्यांच्या बागेत, पापण्यांच्या आड, जिवाच्या फुलावर स्वप्नांची फुलपाखरं पुन्हा पुन्हा भिरभिरत राहतात…